नवी मुंबई महानगरपालिका नेरूळ येथील डेब्रिज हटविणार का – वीरेंद्र म्हात्रे

नवी मुंबई: महापालिका प्रशासनाने स्वत:चे बांधलेले अनधिकृत मार्केट राजकीय दबावामुळे तोडण्याची घाई केली. पण आता ते डेब्रिज व अन्य कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासन कोणा ज्योतिषाकडून मुहूर्त शोधत आहे काय अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे बेलापुर विधान सभा युवा अध्यक्ष श्री. विरेंद्र ( गुरू ) म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. महापालिका प्रभाग ८६ मधील नेरूळ सेक्टर ६ परिसरात महापालिका प्रशासनाने अनधिकृतपणे बांधलेले मार्केट स्वत:च पाडले. या घटनेला १३ दिवसाचा कालावधी लोटला. तरी डेब्रिज अजून उचलले गेले नाही. यामुळे परिसराला बकालपणा आला असून साथीचे आजार निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृत भाजी मार्केट पाडण्यात जी तत्परता दाखविली, तीच तत्परता मार्केटचे डेब्रिज उचलण्यास दाखविण्याची लेखी मागणी युवा अध्यक्ष श्री. विरेंद्र ( गुरू ) म्हात्रे यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्‍यांकडे केली आहे. प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर ६ परिसरात सिडको वसाहतीमधील दत्तगुरू व वरूणा सोसायटीच्या मध्यभागी मैदानात सिडकोने मार्केट व सर्व्हिस स्टेशनसाठी आरक्षित असलेल्या भुखंडापैकी मार्केटच्या जागेवर महापालिका प्रशासनाने जवळपास २५ लाख रूपये खर्च करून मार्केट बांधले होते. तथापि आरक्षित भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट उभारले गेल्याने ते अनधिकृत ठरले. ते मार्केट शुक्रवार ८ जुन रोजी महापालिका प्रशासनाने पाडले. आज या घटनेला १३ दिवस उलटले तरी मार्केटचे डेब्रिज व लोखंडी सळ्या, पत्रे उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. लोखंडी सळ्या या वरूण सोसायटीलगतच्या पदपथासमीप असल्याने मुले पळताना अथवा रात्रीच्या अंधारात दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने स्वत:चे बांधलेले अनधिकृत मार्केट राजकीय दबावामुळे तोडण्याची घाई केली. पण आता ते डेब्रिज व अन्य कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाला कोणा ज्योतिषाकडून मुहूर्त शोधत आहे काय? असा प्रश्‍न युवा अध्यक्ष श्री. विरेंद्र ( गुरू ) म्हात्रे यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाला विचारला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. या डेब्रिजमुळे पाणी साचून साथीच्या आजाराची स्थानिक रहीवाशांना लागण होण्याची दाट शक्यता आहे. जे मार्केट तोडले, त्याचे डेब्रिज तात्काळ उचला. अन्यथा यातून साथीच्या आजाराला खतपाणी मिळून आजाराचा उद्रेक झाल्यास अथवा बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यामुळे दुर्घटना झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन आणि मार्केट पाडण्यासाठी आग्रही असणारे राजकारणीच जबाबदार असतील, याची आपण दखल घ्यावी. मार्केट पाडण्यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणणार्‍या राजकारण्यांना इतके दिवस झाले तरी डेब्रिज दिसत नाही, हे स्थानिक रहीवाशांचे दुर्देवंच म्हणावे लागेल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आपण शक्य तितक्या लवकर डेब्रिज उचलण्याचे, लोखंडी सळ्या हटविण्याचे आणि मैदानात पडलेले लोखंडी पत्रे उचलण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष नवी मुंबईचे बेलापुर विधान सभा युवा अध्यक्ष श्री. विरेंद्र ( गुरू ) म्हात्रे यांनी केली आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *