चेन्नईयीन एफसी, केरळा ब्लास्टर्स करणार दाक्षिणात्य संघर्षाचे नूतनीकरण

चेन्नई, दिनांक 28 ऑक्‍टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग स्पर्धेत स्टीव कोपेल यांचा केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक या नात्याने हा पहिलाच मोसम आहे आणि त्यांना आपला संघ, तसेच दाक्षिणात्य प्रतिस्पर्धी चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या इतिहासाची पुरेपूर जाणीव आहे. भूतकाळात केरळा ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात काही चुरशीच्या लढती झालेल्या आहेत. स्पर्धेच्या शुभारंभी वर्षी केरळाने उपांत्य लढतीत चेन्नईयीन एफसीला स्पर्धेबाहेर टाकले होते. कोपेल सर्वच प्रतिस्पर्ध्यांना समान लेखतात आणि शनिवारी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारी लढत इतर सामन्यासारखीच आहे, असे मानतात. “”इतिहासाची मला माहिती देण्यात आली आहे, पण माझ्यासाठी ती महत्त्वाची नाही. माझ्या दृष्टीने विचार करता, ही आणखी एक लढत आहे. हा वेगळा संघ आहे, वेगळे खेळाडू आहेत, वेगळे वर्ष आहे आणि वेगळा क्षण आहे. भविष्यात काय घडले याच्या तुलनेत आता सारे वेगळेच आहे. आणखी काही आठवड्यांनी आम्ही त्यांच्याशी पुन्हा खेळू. त्यामुळे सर्वोत्तम संघाची दोन्ही लढतीत सरशी होईल,” असे कोपेल यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. गोव्यात एफसी गोवाविरुद्ध पिछाडीवरून विजय मिळविल्यानंतर केरळा ब्लास्टर्सचा आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. त्या लढतीत केरळा संघ पूर्वार्धात एका गोलने पिछाडीवर होता, पण त्यांनी उत्तरार्धात जबरदस्त मुसंडी मारताना एफसी गोवास 2-1 असे हरविले आणि सहा सामन्यांतून आठ गुणांसह पाचव्या क्रमांकावर उडीही घेतली. कोपेल मान्य करतात की, मागील सामन्यात संघाने चांगली कामगिरी केली आणि संघाने प्रगती कायम राखण्याचा निर्धार केला आहे. “”या गटातील कोणताही विजय महत्त्वाचा आहे कारण गुणांचे अंतर खूपच कमी आहे. स्पर्धेच्या मध्यास, अव्वल स्थानावरील आणि तळाच्या संघातील गुणांत फारसा फरक नाही. आमचा गोव्याविरुद्धचा विजय, मानसिकदृष्ट्या आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे,” असे केरळा ब्लास्टरचे प्रशिक्षक म्हणाले. चेन्नईयीन एफसीला मागील लढतीत केरळाप्रमाणे नशिबाची साथ लाभलेली नाही आणि त्यांना एफसी पुणे सिटीविरुद्ध आघाडी घेऊनही एका गुणावर समाधान मानावे लागले होते. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या विजयामुळे गतविजेत्यांनी गुणतक्‍त्यात उडी घेतली होती, परंतु पुणेविरुद्धच्या बरोबरीमुळे त्यांची गती संथ झाली आहे. चेन्नईयीन एफसी आता पुढील दोन्ही सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि प्रशिक्षक मार्को माटेराझी यांनी गुण गमावण्याऐवजी विजय नोंदविण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहेत. “”दोन्ही सामने (घरच्या मैदानावरील) मूलभूत आहेत. साखळीत एक सामना जिंकणे कठीण असते आणि ओळीने दोन सामने जिंकणे तर अवघडच असते. आम्हाला माहीत आहे की, आम्ही खरोखरच चांगल्या संघाविरुद्ध खेळत आहोत, ज्यांचा बचाव भक्कम आहे आणि आक्रमण दर्जेदार आहे. जर आम्ही पुणेविरुद्ध जिंकलो असतो, तर आम्ही अव्वल स्थानी गेलो असतो, परंतु तसे घडले नाही. मानसिकदृष्ट्या आम्हाला पुन्हा बदलावे लागेल आणि (केरळला) आक्रमक मानसिकतेने सामोरे जावे लागेल. या साखळी फेरीत, तुम्ही थांबू शकत नाहीत,” असे माटेराझी म्हणाले. “सदर्न डर्बी’त कोणता संघ खेळवेल याबाबत माटेराझी यांनी संकेत दिलेले नाही, पण त्यांनी मार्की खेळाडू जॉन अर्न रिज याला खेळविण्याचे ठरविले, तर लिव्हरपूलचा दिग्गज खेळाडू इंग्लिश प्रीमियर लीगमधील ओळखीच्या प्रतिस्पर्ध्यांना सामोरा जाईल. दुसरीकडे केरळा ब्लास्टर्स संघात त्यांचा मार्की खेळाडू ऍरोन ह्यूज हा फुल्हॅमचा माजी बचावपटू (2007-08 कालावधीतील) इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रिज (तेव्हा लिव्हरपूल एफसी संघात) याच्याविरुद्ध खेळला आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *