पाणी पुरवठा, स्वच्छता, सुरक्षिततेवर भर द्या, विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना

पंढरपूर, दि.२० (श्रीकृष्ण देशपांडे) :- आषाढी वारीच्या कालावधीत पाणी पुरवठा, स्वच्छता, परिवहन आणि सुरक्षिततेवर भर द्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पंढरपूर येथे दिल्या. 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पंढरपूर येथील ६५ एकर पालखी तळ, नदी पात्र, पुंडलिक मंदिर परिसरात भेट देऊन पाहणी केली. त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी भोसले यांनी आषाढी वारी सोहळ्याबाबतच्या तयारीची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध चौदा विभागांना कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यांसाठी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ७४ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. 
विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी सांगितले की, वारीच्या कालावधीत स्वच्छतेवर भर द्या. त्यासाठी पुरेशी मोबाईल टॉयलेट  पालखी तळावर ठेवावीत. निर्मल वारीसाठी राष्ट्रीय सेवा योजनांच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. पालखी मार्गावरील रस्ते नीट करुन घ्यावेत. रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरून घ्यावेत. पालखी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचे नियोजन वेळेत करा.

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांची बैठक घेतली जावी. त्यासाठी पुरेसे अग्निशामक टैंकर, रुग्णवाहीका उपलब्ध करुन घ्याव्यात. त्या कोठे ठेवल्या जाणार याबाबत नियोजन केले जावे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.पालखी तळावरील वीज पुरवठ्याबाबत काळजी घेतली जावी, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपविभागीय अधिकारी शमा ढोक, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता रमेश वाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, विजय लोंढे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर  आदी उपस्थित होते.
आषाढी वारी सोहळ्यासाठीपाटोळे समन्वय अधिकारी

आषाढी वारी कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वारी सोहळा पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून जातो. या तीनही जिल्ह्यातील विविध अधिकारी आणि विभाग यांच्याशी समन्वय ठेवणे सोयिस्कर व्हावे यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *