सोलापूर (श्रीकृष्ण देशपांडे):- मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामधील एका अधिकाऱ्याला महिला कर्मचाऱ्यांबद्दल मोबाईलवरून मित्रास संभाषण करताना असभ्य व लाजिरवाणी शेरेबाजी केल्याने तडकाफडकी निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी त्या वाचाळ व बाष्कळपणाने बोलणाऱ्या अधिकाऱ्यास घरचा रस्ता दाखवला आहे.
मूळ हकीकत अशी की, जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभाग क्रमांक दोन मध्ये वरिष्ठ सहाय्यकपदी डी.व्ही. परिचारक हा सेवेत आहे. एका कारणावरून त्याने महिला सहकारी कर्मचारी बाबत त्याच्या मित्राकडे असभ्य भाषेत फोनवरून शेरेबाजी केली. या संभाषणाचे रेकॉर्डिंग त्या महिलेच्या हाती पडले. त्यांनी याबाबत २८ जूनला याची रीतसर तक्रार सी.ई.ओ.कडे केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डॉ.भारूड यांनी हे प्रकरण निर्भया समितीकडे चौकशीसाठी दिले. या समितीने चौकशी सुरू केली. निर्भया समितीचे चंचल पाटील यांनी पाच जुलै रोजी चौकशी अहवाल डॉ.भारुड यांच्याकडे सादर केला. त्या अहवालानुसार वाचाळ व बाष्कळ बोलणाऱ्या परिचारकला तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच निलंबन आदेशाची नोंद मूळ सेवा पुस्तकात घेण्याचा लेखी आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिला आहे.
वाचाळपणे बोलणारा हा कर्मचारी झेडपीत अनेक अधिकाऱ्यांबरोबर वावरत होता. त्याने मोबाईलवर बोलताना अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केल्याचे रेकॉर्डिंग मध्ये दिसून आलं आहे. झेडपीत अशाप्रकारे दहशत बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने जिल्हा परिषद मध्ये खळबळ उडाली आहे.
सोलापूर झेडपीतील ‘वाचाळ’ परिचारक निलंबित
महिला कर्मचाऱ्यास केलेली असभ्य शेरेबाजी भोवली