पंढरपूर, (श्रीकृष्ण देशपांडे):- मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी दिवशी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेचे थेट प्रसारण कार्यक्रम शुक्रवार दिनांक १२ जुलै २०१९ रोजी पहाटे दोन वाजले पासून होणार असल्याची माहिती मुंबई दुरदर्शनचे सहायक संचालक जयु भाटकर यांनी दिली.
महापुजेच्या थेट प्रसारणात समालोचनाचे काम समालोचक मनाली दिक्षित, नरेंद्र बेडेकर, संत वाड:मयाचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे करणार आहेत.
शासकीय महापुजे बरोबरच महिलांसाठी असणाऱ्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात ‘कतृत्वस्वामिनी’ या शीर्षकांतर्गत गुरुवार ११ जुलै २०१९ रोजी दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत मंदीरातून थेट प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमात नगराध्यक्षा साधना भोसले, मंदीर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, ॲड. माधवी निगडे तसेच विठ्ठल मंदीरातील महिला पुजारी हेमा अष्टेकर आणि आळंदीच्या किर्तनकार वैष्णवी सरस्वती यांचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदिका पल्लवी मुजुमदार करणार आहेत. हा कार्यक्रम विठ्ठल मंदीराच्या मुख्य सभामंडपातून होणार आहे.
तसेच शुक्रवारी दिनांक १२ जुलै २०१९ रोजी सायंकाळी 5.00 वाजता आषाढी एकादशी दिवशी ‘महाचर्चा ’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात भक्ती संप्रदाय, वारकरी आणि प्रबोधन या विषायवर विशेष चर्चा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनिनाथ महाराज औसेकर, ज्येष्ठ भजन गायक महादेवबुवा शहाबादकर आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली दिक्षित आणि नरेंद्र बेडेकर करणार आहेत.
मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन गेली १८ वर्षे शासकीय महापुजेचे थेट प्रसारण होत असून, यंदाच्या शासकीय महापुजेसाठी मुंबई दुरदर्शनची अत्याधुनिक ओबी व्हॅनसह तंत्रज्ञ, अधिकारी यांच्यामार्फत तयारी सुरु झाली आहे. दूरदर्शनच्या पथकात सुमारे ५० अधिकारी, तंत्रज्ञ, कॅमेरामन यांचा सहभाग राहणार असल्याचेही मुंबई दुरदर्शनचे सहायक संचालक भाटकर यांनी सांगितले.