कराड : कराड येथील नामांकित असलेल्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या अघोरी कृत्याने जनसामान्य नागरिकांमध्ये एकच घबराहट निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा कि, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये रुग्ण सौ विमल रामचंद्र कदम (ओ. पी. डी नंबर – ४१८३६१७) यांचेवर मेंदू चिकित्सक यांनी १५ सप्टेंबर २०१८ रोजी शस्त्रक्रिया केली होती. दरम्यान सदर रुग्णाची डोक्याची कवटी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट प्रशासनाने स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित ठेवली होती. आणि रुग्णास सहा महिन्यानंतर कवटी बसविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच फेरतपासणीसाठी रुग्णाला दिलेल्या वेळेत रुग्ण व त्यांचे नातेवाईक सातत्याने हजर राहिले. सहा महिन्याचा कालावधीनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाच्या डोक्याच्या कवटीबाबत विचारणा केली असता उपस्थित डॉक्टरांनी कवटी बसविण्यासाठी वाढीव दोन महिन्याचा कालावधी नातेवाईकांना सांगितला. ज्यावेळी वाढीव दोन महिन्यानंतर रुग्णाचे नातेवाईक फेरतपासणीसाठी सदर रुग्णालयात उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांना डोक्याची कवटी बसविण्यासाठी अजून वाढीव पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला. अखेर वाढीव पंधरा दिवसानंतर म्हणजेच दिनांक २४/६/२०१९ रोजी रुग्णास डोक्याची कवटी बसविण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोन ते तीन दिवस रुग्णाच्या कवटीचे शोधकार्य सुरू होते. सरतेशेवटी रुग्णाची कवटी खराब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार कृत्याची सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे मेडिकल डायरेक्टर यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावेळी मेडिकल डायरेक्टर यांनी सदर बाब कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश भोसले (बाबा) यांना कळविण्यास सांगितले. सदर तक्रारीची दखल घेत सुरेश भोसले (बाबा) यांनी प्रशासनाला तातडीने योग्य तो निर्णय घेण्यास सांगितले. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाची डोक्याची कवटी खराब झालेने प्रशासनाने कृत्रिम कवटी बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र सदर कृत्रिम कवटी बसविल्याने रुग्णास काही त्रास किंवा जिवितास धोका निर्माण झाल्यास कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट जबाबदार राहील; अशा हमीपत्राची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच रुग्णाची खराब झालेल्या कवटीबाबत रुग्णाच्या नातेवाईकांना संशय आल्याने खराब झालेली कवटी आणि त्याचा वैद्यकीय अहवाल तसेच खराब झालेली कवटी ही सौ. विमल रामचंद्र कदम यांचीच असल्याचा लेखी अहवालाची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत सदर मागण्यांची पूर्तता आणि रुग्णाची तब्येत पूर्णपणे सुव्यवस्थित होत नाही, तोपर्यंत रुग्णाचा डिस्चार्ज घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. कृत्रिम कवटीची शस्त्रक्रिया करून जनरल वॉर्डमध्ये सदर रुग्णाला ठेवण्यात आले होते, मात्र रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे एव्हाना रुग्णाला जनरल वॉर्डमधून अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याने नातेवाईकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार प्रशासनाला कळवून देखील सदर प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी सरतेशेवटी वरिष्ठ पातळीवर म्हणजेच मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, महाराष्ट वैद्यकीय परिषद मुंबई, मा. धर्मादाय आयुक्त सातारा, मा. जिल्हा अधिकारी सातारा, यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. या अघोरी कृत्याबाबत नमूद वरिष्ठ प्रशासन काय दखल घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही सावळागोंधळ!
रुग्ण सौ. विमल रामचंद्र कदम यांचे उपचार शासकीय योजनेत म्हणजेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट होत असल्याचे योजनेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे; मात्र पत्रव्यवहार करूनही गेले १० ते १२ दिवसांपासुन सदर योजनेचा लाभ रुग्णाला मिळालेला नाही. याबाबतही रुग्णाच्या नातेवाईकांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेकडे तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
“कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट” सारख्या नामांकित रुग्णालयात चांगले उपचार होतात, या आशेने बाहेरील जिल्ह्यातूनही रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. सदर रुग्णालयाने कनिष्ठ पातळीवरून वरिष्ठ पातळीवर आपला नावलौकिक गाठलेला आहे. मात्र प्रशासनाच्या
अशा हलगर्जीपणामुळे हा नावलौकिक नामशेष होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याकरिता अध्यक्ष महोदयांनी प्रशासनाच्या कारभाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे वाटते .
“
संतोष कदम, माहिती अधिकार कार्यकर्ते
]]>