देवस्थानांच्या भ्रष्ट शासकीय समित्या त्वरित बरखास्त करा ! -हिंदुत्ववाद्यांची मागणी नागपूर – सुयोग्य व्यवस्थापन देण्याच्या नावाखाली पूर्वीच्या शासनाने श्री तुळजाभवानी, श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री महालक्ष्मी, श्री ज्योतिबा, श्रीनृसिंहवाडी, श्रीसिद्धिविनायक आदी जागृत देवस्थानांसह राज्यातील हजारो मंदिरे स्वतःच्या ताब्यात घेतली. मात्र या शासन नियंत्रित देवस्थानांत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, हजारो एकर जमिनींचे घोटाळे, दान केलेल्या गायींचे मृत्यू अन् त्यांची कसायांना विक्री, पंचतारांकीत हॉटेलांत बैठकांसाठी लाखोंची उधळपट्टी आदी अनेक गैरकारभार हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अन्य भक्त यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी उघड केले. परिणामी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि तुळजापूर देवस्थान समिती यांच्या घोटाळ्यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी चालू झाली. मात्र जाणीवपूर्वक वर्षानुवर्षे या चौकशा लांबवल्या जात आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता दाट असल्याने भक्तगणांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी आणि देवनिधीच्या चोरीचे पाप भाजप-सेना शासनाला लागू नये, यासाठी शासनाने या सर्व देवस्थानांतील घोटाळ्यांच्या चौकशा येत्या तीन महिन्यांत पूर्ण कराव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाने या देवळांतील गैरकारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्व भ्रष्ट शासकीय देवस्थान समित्या तात्काळ बरखास्त कराव्यात, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाद्वारे केली. हिंदुत्ववादी संघटनांनी नागपूर विधान भवनाजवळ संतप्त निदर्शने व घोषणाबाजी केली. या वेळी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ट्रस्टने शासनाचा निधी बुडवला आणि अनेक आर्थिक घोटाळे केले, हे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टवर प्रशासक नेमावा. तसेच सोलापूरचा ‘सोनअंकुर एक्सपोर्टस् प्रा.लि.’ हा अनधिकृत कत्तलखाना सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारा असल्याने तात्काळ बंद करावा, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केली. समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर म्हणाले की, देवस्थान समित्यांतील घोटाळे उघडकीस आणूनही त्यांवर कारवाई न झाल्याने मंदिरांतील गैरकारभार चालूच राहिला. पंढरपूरात दान मिळालेल्या गायी मोठ्या प्रमाणात दगावणे, पंढरपूरच्या मंदिर समितीने गोवंश कसायांना विकणे असे गंभीर प्रकार आम्ही उघड केले. यावर वेळीच कारवाई झाली असती, तर अनेक गायी वाचल्या असत्या. कोट्यावधी रुपये उत्पन्न असणाऱ्या तुळजापूर मंदिराच्या दानपेटीचा लिलाव निम्म्या किमतीला करत १९ वर्षे भ्रष्टाचार चालू होता, मंदिराची २६५ एकर जमीन हडपली, श्री महालक्ष्मी मंदिराची सुमारे ८००० एकर जमीन हडपली गेली. याविषयीच्या चौकशीला अनेक वर्षे झाली. मात्र एकावरही कारवाई झाली नाही. देवनिधीच्या चोरीचे पाप करणाऱ्या राज्यकर्त्यांना देव क्षमा करणार नाही, असेही श्री. पिसोळकर म्हणाले. या वेळी समितीच्या वतीने नागपूर विधान भवनात जाऊन शासनाला वरील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या संघटना : रणरागिणी, श्री योग वेदांत सेवा समिती, वारकरी संप्रदाय, शिवसेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व अन्य धर्माभिमानी हिंदू संघटना.]]>