संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील कटू सत्य

“मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे”, ही घोषणा सर्वांना माहीत आहे, परंतु ही “मुंबई आम्ही विकत घेतलीय.” हे किती जणांना माहिती आहे ?
महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांना ठाऊक असेल. महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७ व्या व ८ व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२ (२), ४८ (१) आणि ५१ (५)अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले.
 त्यानंतर गुजरात राज्याची वाषिर्क तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७०पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले. याखेरीज १९६२-६३पासून १९६९-७० पर्यंत ८ आथिर्क वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.
बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट १९६० च्या कलम ५२ खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद ‘द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑडिर्नरी’ मध्ये आहे. याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय. 
या मुंबईत आगरी – कोळी, कामगार, चाकरमानी, कारकून, कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत.
आता तरी ताठ मानेने आणि अभिमानाने बोला.
“जय महाराष्ट्र !”

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *