किल्ले रायगडवरून कोसळलेल्या दगडाने घेतला ट्रेकरचा बळी

महाड ( प्रतिनिधी ) पायऱ्यांनी किल्ले रायगड उतरत असलेल्या एका ट्रेकरला गडावरून कोसळलेला एक दगड अंगावर पडल्याने आपला जीव गमवावा लागला. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याचा सुमारास ही घटना घडली . अजयप्रतापसिंह प्रदीपसिंह सिकरवार ( वय २८, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, सध्या रा. पिंपळे सौदागर, पुणे ) असे मृत तरुणाचे नाव आहे. अजयप्रतापसिंह हा आपल्या सोळा सहकाऱ्यांसमवेत शनिवारी पहाटे किल्ले रायगड ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर गड उतरत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गडाच्या उंच कड्यावरून सुटलेला एक दगड थेट अजयप्रतापसिंहच्या पाठीवर आदळून त्याच्या मणक्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला प्रथम पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारांसाठी त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यु झाला आज ( रविवारी ) अजयप्रतापसिंहचे पार्थिव त्याच्या बहिणीच्या ताब्यात देण्यात आले. पुरातत्व विभागाची निष्क्रियता किल्ले रायगड भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पावसाळ्याच्या दिवसात गडाच्या कड्यांवरुन छोटे मोठे दगड सुटून पायऱ्यांवर कोसळ्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मात्र पुरातत्व विभागाने यावर प्रतिबंधक उपाय करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दगड अंगावर पडून पर्यटकाचा मृत्यु होण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *