पनवेलमध्ये स्वाभिमानी पत्रकार संघटनेची स्थापना

पनवेल/प्रतिनिधी:-दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांची मोट बांधत ‘स्वाभीमानी पत्रकार संघटना’ स्थापन करण्यात आली. यावेळी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पत्रकारितेच्या चळवळीला वेगळा आयाम देणाऱ्या अनुभवी आणि ‘लेखणी हेच अस्तित्व’ असलेल्या पत्रकारांचा या संघटनेत समावेश करण्यात आला आहे. शहारातील ‘हॉटेल पिस पार्क’ मध्ये नुकतीच पत्रकारांची बैठक घेण्यात आली. प्रारंभी आद्य पत्रकार, शब्दप्रभू, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून बैठकीला सुरूवात करण्यात आली. नव्या संघाच्या उद्धिष्टांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर ठोस कार्यक्रम ठरविण्यात आला. त्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सर्वांनुमते कांतीलाल कडू (संपादकः दै. निर्भीड लेख) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संतोष घरत (संपादक, जय महाराष्ट्र), सरचिटणीस अरूणकुमार मेहत्रे (लोकमत), चिटणीस देविदास गायकवाड (सकाळ), खजिनदार संतोष भगत (सा. रायगड पनवेल), सहखजिनदार विकास पाटील (पुढारी), प्रसिद्धीप्रमुख शैलेश चव्हाण (नवाकाळ) आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणीमध्ये संतोष सावंत (लोकसत्ता), दीपक घरत (सकाळ), दीपक महाडिक व केवळ महाडिक (कोकण संध्या), मयुर तांबडे (लोकमत), राजेश कदम (परिवर्तन टाईम्स), रशिद इनामदार (कर्नाळा), असिम शेख (क्षितिज पर्व) व मनोज भिंगार्डे (मी मराठी) आदी दिग्गज पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनेक पत्रकारांनी या संघटनेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. काही अपरिहार्य कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांना पुढील बैठकीत रितसर सदस्यत्व दिले जाईल. महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारिणी संपादक श्रीकांत बोजेवार हे पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत पत्रकारांना विनामुल्य प्रवेश देण्यात येईल. बातमी लिहिण्यापासून ते पत्रकारितेतील आव्हान याविषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. त्या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण लवकरच घोषित करण्यात येईल, असे प्रसिद्धप्रमुख शैलेश चव्हाण यांनी स्पष्ट केले. (मनोज भिंगार्डे, शैलेश चव्हाण :- पनवेल, रायगड)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *