मुंबई: वानखेडे स्टेडीयमवर रंगलेल्या महिला टी २० विश्व चषक स्पर्धेच्या दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडीस महिला संघाने न्यूझीलंड महिला संघावर सहा धावांनी मात करीत पहिल्यांदाच महिला टी २० विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. १४४ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाला निर्धारित २० षटकांत केवळ १३७ धावाच करत्या आल्या. सुपर १० मध्ये एकही सामना न गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष संघापाठोपाठ महिला संघही आता या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीस कडून हार्ले मॅथूस व टेलर यांनी डावाची सुरुवात केली. संघाची धावसंख्या १८ असताना मॅथूसच्या रुपात वेस्ट इंडीसला पहिला धक्का बसला. त्यानंतर आलेल्या कूपरने टेलरच्या सहाय्याने तिसर्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली. टेलर २५ धावा कडून बाद झाल्यानंतर दिनान्द्रा डॉटीन हिला चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली. आपल्या आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असलेली डॉटीन १७ चेंडूत २० धावा करू शकली. तर एकीकडे नाबाद असलेली कूपरने आपले टी २० मधले पहिले अर्धशतक झळकावले. तिने ४८ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ६० धावा केल्या. तिच्या या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीसने २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सोफी डेवाइन हिला ४ तर मोर्ना नेल्सन हिला एक बळी मिळाला. न्यूझीलंडने धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. कर्णधार बेट्स व ली प्रीस्त यांना केवळ ११ धावाच जमवता आल्या. प्रीस्तच्या रूपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. तिसर्या क्रमांकावर आलेल्या सोफी डेवाइन हिने काहीसा आक्रमक खेळ केला परंतु चोरटी धाव घेण्याचा नादात ती दिनान्द्रा डॉटीन हिच्या करावी धावबाद झाली. तिने १४ चेंडूत ४ चौकारांसह २२ धावा केल्या. त्याच षटकात बेट्सही वैयक्तिक १२ धावा करून बाद झाली. सातव्या षटकानंतर न्यूझीलंड ४९/३ अश्या अवस्थेत होता. पाचव्या गड्यासाठी सारा मॅक ग्लेशन व अॅमी यांनी आवश्यक भागीदारी केली. दोघींही संयमी फलंदाजी करीत धावफलक हलता ठेवला. सतराव्या षटकात अॅमी मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. तिने २४ धावा केल्या. लगेच सारा मॅक ग्लेशनही बाद झाली आणि न्यूझीलंड अडचणीत सापडला. त्यानंतर न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाला आपल्या संघाला सावरता आलं नाही. २० षटकांत न्यूझीलंड संघ ८ गडी बाद १३७ धावा करू शकला. वेस्ट इंडीसने हा सामना ६ धावांनी जिंकत टी २० विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच धडक मारली. रविवारी होणार्या कोलकाता येथे अंतिम सामन्यात वेस्ट इंडीसचा सामना ३ वेळा विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होईल. धावफलक: वेस्ट इंडीस १४३/६ (२०) । कूपर ६१(४८), टेलर २५(२६), डेवाइन ४-२२ न्यूझीलंड १३७/८ (२०) । मॅक ग्लेशन३८(३०), अॅमी २४(२९), टेलर ३-२६ वेस्ट इंडीस ६ धावांनी विजयी]]>