आय. पी. एल. च्या दुसऱ्या क्वालिफायर मध्ये मुंबई इंडियन्सची लढत होणार कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध. रायसिंग पुणे सुपरजायंट बरोबर पहिला क्वालिफायर हरल्यानंतर मुंबईला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही दुसरी संधी असेल. बंगळुरू: अंकतालिकेत अव्वल स्थान फटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे आणि या वेळी त्यांची गाठ असेल ती त्यांचा सर्वात आवडता संघ गौतम गंभीरचा कोलकाता नाईट रायडर्स. यंदाच्या सत्रात कोलकाताच्या लीग सामन्यांत दोन्ही वेळेस मात देत मुंबईन एकप्रकारे मानसिक दडपणातून मुक्त असेल तर दुसरीकडे कोलकाताही संधीचं सोनं करण्यास उत्सुक असेल. आतापर्यंत या दोन्ही संघांत झालेल्या २० सामन्यांत मुंबईने तब्बल १५ वेळेस बाजी मारत आपणच दादा आहोत हे सिद्ध केले आहे. शिवाय या सत्रातील दोन सामन्यांत मुंबईने अशक्य असे विजय मिळवत कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो हे दाखवून दिले आहेत. वानखेडेवर मुंबईने २३ चेंडूंत केलेल्या ५९ धावा आणि इडन गार्डन्सवर कोलकाताची तीन षटकांत २५ धावा करण्यास झालेली पडझड नक्कीच मुंबईचा आत्मविश्वास वाढवेल. टर्निंग पॉईंट नेहमीच स्लो स्टार्ट करून एकदमच वर येणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पवित्रा या वेळेस काहीसा वेगळा होता. पहिल्या ११ सामन्यांत नऊ सामने जिंकत दादागिरी दाखवणाऱ्या मुंबईला मागच्या चार सामन्यांत तीन पराभव स्वीकारावे लागले आहेत हेही विशेष. पुण्य बरोबरचा पहिला क्वालिफायर सामना शेवटच्या दोन षटकांतील ४१ धावांमुळे मुंबईने गमावला असे म्हटले तर वायफळ ठरणार नाही. तळागाळाच्या खेळाडूंपर्यंत तगडी फलंदाजी असलेल्या मुंबई इंडियन्सला आपल्या मधल्या फळीला सांभाळून खेळावे लागेल. रोहित शर्माचा फॉर्म हाही त्यांच्या चिंतेचा विषय ठरू शकतो. गोलंदाज अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करतात खरे परंतु अनुभवी गोलंदाजांना अजूनही म्हणावे तसे यश मिळाले नसल्यामुळे त्यांना या ‘करो या मरो’ सामन्यात आपला अनुभव पणाला लावावा लागेल. कोलकाताही मधल्या फळीच्या सुमार कामगिरीमुळे चिंतीत आहे. युसूफ पठाण, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव यांसारख्या भरवशाच्या फलंदाजांना अजूनही सूर गवसला नसल्यामुळे त्यांच्याही गोठ्यात चिंतेचे वातावरण आहे. कर्णधार गौतम गंभीर आपल्या परीने प्रत्येक वेळेस योग्य तसा खेळ दाखवून कोलकाताला इथपर्यंत आणले आहे. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली तर नक्कीच त्यांचा अंतिम फेरीतील प्रवास सुकर होईल. फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत नाईट रायडर्सला वेगवान गोलंदाजांनी चांगले यश मिळवून दिले आहे. त्यांच्याकडून याही सामन्यात अश्याच कामगिरीची अपेक्षा असेल. कालच्या सामन्यातील वरून राजाने केलेली कृपादृष्टी जर याही सामन्यात झाली तर स्पर्धेचा उत्तरार्ध प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही. मुंबई इंडियन्स आपल्या आवडत्या प्रतिस्पर्ध्याबरोबर दोन हात करण्यास सज्ज असेल आणि इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चौथ्यांदा प्रवेश करण्यास तयार असेल. उद्या (१९ मे)ला बंगळुरू येथील एम. चिन्नस्वामी मैदानावर सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.]]>