मुंबई, दिनांक 22 नोव्हेंबर 2016: मुंबई सिटी एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गतविजेत्या चेन्नईयीन एफसीविरद्ध लढत होत आहे. बुधवारी मुंबई फुटबॉल एरीनावर होणारी ही लढत जिंकल्यास मुंबईला उपांत्य फेरीतील पात्रता साध्य करता येईल. त्यात यजमान संघ यशस्वी ठरणार का याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मुंबईने मागील फेरीत केरळा ब्लास्टर्सचा 5-0 असा खुर्दा उडविला. या दणदणीत विजयासह मुंबईचे 12 सामन्यांतून 19 गुण झाले असून गुणतक्त्यात ते आघाडीवर आहेत. आता तीन गुण जिंकल्यास पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळण्यासाठी ते पुरेसे ठरतील. यापूर्वीच्या दोन स्पर्धांमधील कामगिरीच्या तुलनेत मुंबईने आताच जास्त गुण मिळविले आहेत. यंदा मुंबईची विजयांची पाच ही संख्या सुद्धा जास्त आहे. मागील दोन स्पर्धांत त्यांना प्रत्येकी चार विजय मिळाले होते. यंदा कामगिरी उंचावली असली तरी पात्रतेलाच निर्णायक महत्त्व असेल. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी सांगितले की, आम्ही आगेकूच करण्याच्या मार्गावर आहोत. उपांत्य फेरीत प्रवेश करणे आमच्यासमोरील पहिले उद्दीष्ट आहे आणि ते साध्य करावे लागेल याची आम्हाला जाणीव आहे. दोन सामने बाकी असताना मिळालेले एवढे गुण चंगले आहेत, पण आम्हाला जास्त गुणांची गरज आहे. 19 गुण पुरेसे ठरणार नाहीत. त्यामुळे आम्हाला आणखी चांगली कामगिरी नोंदवावी लागेल. मुंबईचा दिएगो फोर्लान हा आयएसएलमध्ये हॅट््ट्रिक नोंदविणारा पहिला मार्की खेळाडू ठरला. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत हॅट््ट्रिकचा पराक्रम करण्याचे मुंबईचे रेकॉर्डही कायम राहिले. पहिल्या स्पर्धेत आंद्रे मॉर्टीझ, तर दुसऱ्या स्पर्धेत सुनील छेत्रीने ही कामगिरी केली होती. यानंतरही पुढील आव्हानाविषयी गुईमाराएस यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांनी सांगितले की, मागील सामन्याच्या तुलनेत चेन्नईयीनविरुद्ध आम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि चांगली स्थिती साधण्यासाठी सरस खेळ करावा लागेल. चेन्नईयीनचा एटीकेविरुद्धचा सामना आम्ही पाहिला. त्यांची वाटचाल कायम आहे. ते खडतर प्रतिस्पर्धी आहेत. ते चँपीयन आहेत आणि चँपीयन अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देतात. यंदा मात्र चेन्नईयीनची कामगिरी गतविजेत्यांना साजेशी झालेली नाही. ते सहाव्या स्थानावर आहेत. 11 सामन्यांतून त्यांनी 14 गुण मिळविले आहेत, मात्र गेल्या वर्षी विजेतेपद मिळविताना राखलेल्या फॉर्मची झलक त्यांनी यंदा काही वेळा सादर केली आहे. त्यामुळे आपल्या संघाला अंतिम टप्यात जादुई फॉर्म गवसेल अशी आशा प्रशिक्षक मार्को मॅटेराझी यांना वाटत आहे. मॅटेराझी यांनी सांगितले की, आम्हाला कदाचित नशीबाची आणखी साथ मिळण्याची गरज आहे. उपांत्य फेरी गाठण्याचा आम्हाला अजूनही विश्वास वाटतो. दिल्ली डायनॅमोजविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळल्यास आम्ही प्रत्येक सामन्यात चांगला दृष्टिकोन आणि लढाऊ वृत्ती प्रदर्शित केली. यंदा चेन्नईयीनला प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर अवघा एक विजय मिळविता आला आहे, पण अंतिम टप्यात मुसंडी मारण्यासाठी त्यांना इतिहासातील कामगिरीपासून प्रेरणा घेता येईल. त्यासाठी इटलीचा स्ट्रायकर डेव्हीड सुची याच्या गोल करण्याच्या क्षमतेवर बरीच मदार असेल. याचे कारण डुडू ओमाग्बेमी याचा फॉर्म हरपला आहे, तर जेजे लालपेखलुआ जायबंदी झाला आहे. मॅटेराझी यांनी सांगितले की, फुटबॉलचा खेळ म्हणजे काही शास्त्र किंवा गणित नाही. शक्य तेवढे जास्त गुण मिळविणे इतकेच आमच्या हातात आहे. उपांत्य फेरी गाठणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि एकदा का तुम्ही तेथपर्यंत वाटचाल केली की मग सारे काही नव्याने सुरु होते.]]>