दिल्ली, दिनांक 8 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये चेन्नईयीन एफसीविरुद्ध बुधवारी नेहरू स्टेडियमवर दिल्ली डायनॅमोजची लढत होत आहे. चेन्नईयीनचे प्रशिक्षक मार्को मॅटेराझी घरच्या मैदानावर झालेल्या निराशाजनक पराभवाची परतफेड करून दिल्लीचे प्रशिक्षक जियानल्युका झँब्रोट्टा यांना प्रत्यूत्तर देणार का याची उत्सुकता आहे. मॅटेराझी आणि झँब्रोट्टा हे इटलीच्या 2006 मधील विश्वकरंडक विजेत्या संघातील खेळाडू आहेत. मॅटेराझी यांनी संघाचे स्वरुप वेगळे बनवायचे ठरविले असून ते नवे डावपेच लढविणार आहेत. चेन्नईयीनला 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता. मॅटेराझी यांनी या खराब कामगिरीनंतर संघाला सावधानतेचा इशारा दिला होता. दिल्लीला गेल्या तिन्ही सामन्यांत बरोबरी पत्करावी लागली आहे. त्यामुळे मॅटेराझी यांना कामगिरीत प्रगती हवी असून केवळ विजयानेच त्यांचे समाधान होईल. सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेला मॅटेराझी उपस्थित नव्हते. सहायक प्रशिक्षक साबीर पाशा यांनी सांगितले की, दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आमच्या मैदानावर त्यांनी चांगला खेळ केला, पण प्रत्येक दिवस वेगळा असतो. दिल्लीविरुद्ध मार्को यांनी काही खास डावपेच आखले आहेत. आम्हाला संधी आहे. आमचा संघ वेगळा असेल. डावपेचही वेगळे असतील. आम्ही प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळणार असल्याने सामना खडतर असेल. चेन्नईयीन एफसीने सात सामन्यांतून 10 गुण मिळविले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. त्यानंतर ते उपविजेते ठरले होते. यावेळी चेन्नईयीनने पहिल्या दोन सामन्यांत पाच गोल पत्करल्यानंतर हे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या दुसऱ्या टप्यासाठी त्यांचा संघ भक्कम वाटतो. दिल्लीविरुद्ध मॅटेराझी यांनी मार्की खेळाडू जॉन अर्न रिसे आणि मध्यरक्षक हॅन्स मुल्डर यांच्यावर मदार ठेवली असती. पूर्वी हे दोघे दिल्लीविरुद्ध खेळले होते, पण आता ते जायबंदी असल्याचे वृत्त असून त्यांचा सहभाग अनिश्चीत आहे. फॉर्म आणि लय दिल्लीच्या बाजूला आहे. त्यांनी अद्याप घरच्या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. ही लढत जिंकल्यास ते गुणतक्त्यात आघाडी घेतील, पण चेन्नईयीनने सुद्धा यंदा अद्याप प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर पराभव पत्करलेला नाही. झँब्रोट्टा यांनी सांगितले की, मॅटेराझी यांच्या संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव चांगला असेल. आम्ही पहिला सामना चेन्नईयीनविरुद्ध खेळलो. आता पुन्हा त्यांच्याशी लढत आहे. त्यांचे आव्हान चांगले असेल. आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये दोन विश्वविजेते असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्याशिवाय सिमोनी बॅरोनी हा सहायक प्रशिक्षक आहे. तो सुद्धा इटलीच्या विश्वविजेत्या संघात होता. दिल्लीने एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स यांना हरवून सलग दोन सामने जिंकले. दोन्ही वेळा त्यांनी 2-0 असा विजय मिळविला. आता साहजिकच त्यांचा हॅट्ट्रिकचा निर्धार आहे. जिंकल्यास ते गुणतक्त्यात आघाडी घेतील. झँब्रोट्टा म्हणाले की, शक्य तितक्या लवकर बाद फेरीतील प्रवेश नक्की करण्याचे ध्येय असल्याचे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही दोन चांगले सामने जिंकले. मला आनंद वाटतो कारण आम्ही दोन गोल सुद्धा केले. संघाची कामगिरी सरस होते आहे.]]>