कोची, दिनांक 7 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सची एफसी गोवा संघाशी लढत होत आहे. मार्की खेळाडू अॅरन ह्युजेस याच्या अनुपस्थितीमुळे केरळाला धक्का बसला आहे. अॅरनला मार्की खेळाडू म्हणून पसंती देण्याचा निर्णय केरळाने विचारपूर्वक घेतला. यासाठी पर्याय असलेल्या इतर खेळाडूंच्या तुलनेत तो तरुण होता. त्याचा आंतरराष्ट्रीय सहभाग पार पडला होता. त्यामुळे तो बहुतांश स्पर्धेसाठी उपलब्ध असण्याची अपेक्षा होती, मात्र उत्तर आयर्लंडच्या या खेळाडूला त्याच्या देशाने बचाव भक्कम व्हावा म्हणून पाचारण केले आहे. त्यामुळे सर्वाधिक प्रभावशाली खेळाडूच्या अनुपस्थितीत केरळला खेळावे लागेल. केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, आम्ही मार्की खेळाडूला करारबद्ध केले तेव्हा आम्ही त्याचे वय लक्षात घेतले. युरोपीय स्पर्धा सुद्धा तेव्हा पार पडली होती, पण आता उत्तर आयर्लंडने इतर खेळाडूला दुखापत झाल्यामुळे त्याला पाचारण केले आहे. केरळाला हैतीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू डकेन्स नॅझॉन याच्याही शिवाय खेळावे लागेल. याशिवाय बंगळूर एफसीच्या रिनो अँटो आणि सी. के. विनीत या दोन खेळाडूंना एएफसी करंडक अंतिम सामन्यानंतर लगेच तीन दिवसांत मैदानावर उतरविता येणार नाही. सर्वाधिक उणीव मात्र अॅरनची जाणवेल, पण कॉप्पेल यांना इतर खेळाडू पुढाकार घेतील आणि मागील सामन्यात दिल्ली डायनॅमोजविरुद्ध झालेल्या 0-2 अशा पराभवाची वेळ येऊ देणार नाहीत असा विश्वास वाटतो. ते म्हणाले की, अॅरन मार्की खेळाडू आहे. आम्ही त्याला करारबद्ध केले कारण तो एक चांगला खेळाडू आहे. त्याला गमावणे हा एक धक्का आहे. एक दार बंद होते तेव्हा दुसरे उघडते. ती एक संधी असते. आयएसएलसाठी इतके मोठे संघ असताना जेव्हा संधी मिळते तेव्हा खेळाडूंनी पुरेपूर फायदा उठविला पाहिजे. सलग चार सामने बाहेर झाल्यानंतर कॉप्पेल आपला संघ घरच्या मैदानावर परत नेतील. या टप्यात केरळाने पाच गुण मिळविले. केरळाचा बचाव स्पर्धेत सर्वोत्तम आहे, पण त्यांची बहुतांश ताकद अॅरन आणि सेड्रीक हेंगबार्ट यांच्या भागिदारीवर अवलंबून आहे. आता अॅरनच्या अनुपस्थितीत बचाव भक्कम होणार का हा प्रश्न आहे. दुसरीकडे एफसी गोवाचे स्ट्रायकर या मोसमात तेवढा धडाका दाखवू शकलेले नाहीत. आठ सामन्यांत त्यांना केवळ पाच गोल करता आले आहेत. मुख्य प्रशिक्षक झिको यांनी स्ट्रायकरना दुसऱ्या टप्यात फॉर्म गवसेल अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अतिउत्साहामुळे आमच्या खेळाडूंना फटका बसला. त्यांच्यावर गोल करण्याचे दडपण आहे. त्यामुळे फिनीशिंगच्यावेळी बेफिकीर खेळ होत आहे. ते संयम दाखवू शकत नाहीत. नेटच्या समोर ते शांतचित्ताने खेळू शकत नाहीत. यंदा गोलरक्षणाचा दर्जा सुद्धा उंचावला आहे. ज्युलिओ सीझर जायबंदी झाला आहे. त्यामुळे झिको ब्राझीलचा स्ट्रायकर रफाेल कोएलो याच्यावर अवलंबून असतील. रफाएलने एफसी पुणे सिटीविरुद्ध फ्री-किकवर अप्रतिम गोल केला. तोच निर्णायक ठरला. गोव्याला उपांत्य फेरीच्या आशा राखण्यासाठी निर्णायक विजयाची गरज आहे. गोवा आता तळात आहे, पण जिंकल्यास ते दोन क्रमांक वर जाऊ शकतील. केरळा सातव्या स्थानावर आहे. जिंकल्यास त्यांना पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळू शकेल.]]>