इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या क्वालिफायर मध्ये भिडणार महाराष्ट्राचे दोन संघ आमने-सामने. यंदाच्या मोसमात पुणे ठरला आहे मुंबईवर दोन्ही वेळेस भारी. बघता बघता ४० दिवस उलटले आणि बहुचर्चित व प्रतिष्ठित अशी इंडियन प्रीमियर लीग आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. लीग राउंडमध्ये झालेल्या ५६ सामन्यांनंतर अव्वल चार संघ आता एकमेकांशी लढतील ते विजेतेपदावर आपले नाव कोरण्यासाठी. मुंबई इंडियन्स, रायसिंग पुणे सुपरजायंट, सनरायर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स यांनी आपला सर्वोत्तम खेळ दाखवत बाकीच्या संघांना धूळ चरत जेतेपदासाठी चुरस आणखीच रंगात आणली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या (१६ मे) ला पहिला क्वालिफायर यजमान मुंबई इंडियन्स विरुद्ध महाराष्ट्र डर्बीतील दुसरा संघ रायसिंग पुणे सुपरजायंट यांच्यात होईल आणि जिंकणारा संघ २१ मे ला होणाऱ्या दहाव्या सत्राच्या अंतिम सामन्यात थेट प्रवेश करेल. पुणे मुंबईवर भारी यंदाच्या मोसमात जरी मुंबई १४ पैकी दहा सामने जिंकून अव्वल स्थानी असावी तरी पुणे संघाने त्यांना दोन वेळेस पराभूत करण्याची किमया केली आहे. या मोसमात मुंबईला जे चार पराभव स्वीकारावे लागले त्यात पुण्याकडून दोन, हैदराबादकडून एक व पंजाबकडून एक पराभव स्वीकारावा लागला. पुण्याची अचूक गोलंदाजी या मोसमात चमकदार ठरली असून मुंबईला जे पराभव स्वीकारावे लागले त्यात पुण्याच्या अष्टपैलू खेळाडूंची गोलंदाजी खूप मोलाची ठरली. बेन स्टोक्स, राहुल त्रिपाठी, कर्णधार स्मिथ, तर नवखा जयदेव उनादकत व इम्रान ताहीर यांच्या कामगिरीच्या जोरावर पुणे दुसरे स्थान फाटकावू शकला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी चमकदार कामगिरी करत मुंबईला अव्वल स्थान मिळवून दिले. हार्दिक-कृणाल पांड्या या भावांची अष्टपैलू कामगिरी, युवा नितीश राणाची चौफेर फटकेबाजी, कर्णधार रोहित शर्माची अधून-मधून फटकेबाजी तर मिचेल मॅक-क्लेनेघनची चपळ गोलंदाजी, त्याला मिळालेली बुमरा, मलिंगा, हरभजन यांची साथ एकूणच मुंबईच्या विजयात महत्वपूर्ण ठरली. घराच्या मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्स कडून उद्याच्या सामन्यातही अशीच अपेक्षा प्रेक्षकांकडून असेल. टॉस ठरवणार सामन्याचा निकाल? मुंबईच्या वानखेडे मैदानावर नाणेफेकीचा कौल नेहमीच निर्णयात्मक ठरतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करत धावांचा पाठलाग सहजपणे करतो. मागच्या वर्षीचा टी-२० विश्व-चषक स्पर्धा याचा उत्तम उदाहरण आहे. यंदाच्या मोसमातही सातपैकी ४ सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. तर दोन सामन्यांत मुंबईला अगदी हाताशी आलेल्या विजयाला मुकावे लागले. एकंदरीतच धावांचा पाठलाग येथे सहज होऊ शकतो असेच म्हणावे लागेल. स्टोक्सची भासणार पुण्याला कमी तब्बल साडे चौदा कोटी रुपये खर्च करून विकत घेतलेल्या बेन स्टोक्सची कमी रायसिंग पुणे सुपरजायंटला भासणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी स्टोक्सला आपल्या देशासाठी खेळावे लागणार आहे. याचाच अर्ध तो पुण्यासाठी आता आय. पी. एल. खेळू शकत नाही. तर आफ्रिकेचा इम्रान ताहिरही राष्ट्रीय सेवेसाठी पुढची स्पर्धा खेळू शकणार नाही. या दोन खंब्या खेळाडूंची कमी पुणे संघाला नक्कीच भासणार आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा, पोलार्ड, हरभजन, रायुडू मलिंगा यांच्याकडे प्लेऑफ, सेमी फायनल, फायनल यांसारखे मोठे सामने खेळण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे मुंबईचे पारडे नक्कीच जाड असणार आहे. कागदावर जरी एकमेकांची तुलना केली तरी प्रत्यक्ष मात्र मैदानातच सामन्याचा निकाल समजणार. कोण कोणावर भारी पडेल हे उद्याच्या मुकाबल्यातूनच स्पष्ट होईल. पाहूया कोण पडेल कोणावर भारी आणि कोणाला मिळणार आय. पी. एल. फायनलचं थेट तिकीट.]]>