कोलकाता: इडन गार्डन येथे झालेल्या टी २० विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीस संघाने इंग्लंडचा ४ गड्यांनी पराभव करीत दुसर्यांदा जेतेपदावर नाव कोरले. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात १९ धावांची गरज असताना कार्लोस बारेथवेथ ने ४ चेंडूत सलग ४ षटकार खेचत वेस्ट इंडीसला निसटता विजय मिळवून दिला. सहाच्या सहा सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या समीने इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेस्ट इंडीसचा प्रमुख फिरकी गोलंदाज बद्रीने गोलंदाजीची सुरुवात करीत दुसर्याच चेंडूवर जेसन रॉयला बाद करीत दमदार सुरुवात केली. तर दुसरीकडे रसेलने हेल्सला बाद करीत इंग्लंडला अडचणीत आणले. बद्रीने आपल्या ४ षटकात केवळ १६ धावा देत २ बळी घेतले. इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज रुटने ५४ धावा करीत एकीकडे धावफलक चालू ठेवला. बटलरने ३६ तर विलीने २१ धावा केल्या. ब्रावो, कार्लोस बारेथवेथने प्रत्येकी ३ बळी घेत इंग्लंडला १५५ धावांत रोखले. इंग्लंडनेही रूटला दुसर्याच षटकात गोलंदाजी देत सलामीचा विस्फोटक फलंदाज गेल व चार्ल्स यांना एकाच षटकात माघारी पाठवले आणि वेस्ट इंडीसला सुरुवातीपासूनच अडचणीत आणले. पुढच्याच षटकात विलीने सिमन्सला ० धावेवर बाद करीत वेस्ट इंडीसची अवस्था ३ बाद ११ अशी केली. पाचव्या क्रमांकावर आलेल्या ब्रावोने सॅमुयलच्या साथीने संयमी फलंदाजी करीत धावसंख्या वाढवली. पाचव्या गड्यासाठी दोघांनी ७५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. ब्रावो बाद झाल्यानंतर रसेल व समी पटापट बाद झाले. एकीकडे सॅमुयलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत खेळपट्टीवर टिकून राहीला. शेवटच्या ४-५ षटकांत १२ च्या सरासरीने धावा पाहिजे असताना कार्लोस बारेथवेथ व सॅमुयलने आक्रमक फलंदाजी केली. शेवटच्या ६ चेंडूत १९ धावांची गरज असताना इंग्लंडचा कर्णधार मोर्गनने स्टोक्सला गोलंदाजी दिली. अष्टपैलू कार्लोस बारेथवेथने सलग ४ चेंडूत ४ षटकार लगावत वेस्ट इंडीसला निसटता विजय मिळवून दिला. याच विजयाबरोबर वेस्ट इंडीसने दुसर्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. सॅमुयलला त्याच्या नाबाद ८५ धावेच्या खेळीसाठी सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत आपली झाप सोडणाऱ्या भारताचा विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. धावफलक: इंग्लंड १५५/९ (२०) । रुट ५४(३६), बटलर ३६(२२), बारेथवेथ ३-२३ वेस्ट इंडीस: १६१/६ (१९.४) । सॅमुयल ८५(६६), बारेथवेथ ३४(१०), विली ३-२०]]>