टॉम लॅथमचं शतक व रॉस टेलरच्या ९५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारत याच पराभवामुळे तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत ०-१ पिछाडला असून आय. सी. सी. क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम असेल. भारताची अडखळत सुरुवात दक्षिण आफ्रिकेसोबत एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानासाठी चढाओढ असलेल्या भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अडखळत सुरुवात केली. संघांत परतलेल्या शिखर धवनला अजिंक्य रहाणेच्या जागी तर मनीष पांडेला डावलून दिनेश कार्तिकची वर्णी अंतिम अकरामध्ये लागली. धवन-रोहित या अनुभवी जोडीने डावाची सुरुवात केली. पहिले तीन षटके सावधरीत्या फलंदाजी केल्यानंतर शिखर धवन ट्रेंट बोल्टच्या जाळ्यात अडकला. ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला तटवण्याच्या नादात किपर लॅथमकडे सोपा झेल देत माघारी परतला. त्याला केव्हा नऊ धावाच करता आल्या. रोहित आपल्या घराच्या मैदानावर सेट झाला असे दिसत होते. साऊथीच्या पाचव्या षटकात फाईन लेगला मिळालेल्या दोन शॉर्ट चेंडूंचा पुरेपूर फायदा घेत दोन्ही चेंडू सीमारेषेबाहेर धाडत भारताला पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आणले असे वाटू लागले. पुढच्याच षटकात बोल्टने एका अप्रतिम चेंडूवर रोहित शर्माला त्रिफळाचित केले आणि उपस्थित वानखेडेच्या मैदानात शांतता पसरली. रोहितने १८ चेंडूंत २० धावा केल्या. सहाव्याच षटकात भारत दोन बाद २९ अश्या बिकट अवस्थेत सापडला. कोहली-कार्तिकचा संयमी डाव सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने केदार जाधवला चौथ्या क्रमांकावर बढती दिली. मागील बऱ्याच दिवसांपासून चौथ्या क्रमांकाची जागा रिक्त असल्याने भारताने केदारच्या रूपाने नवा फलंदाज येथे आजमावला. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूची ही जोडीने डाव सावरेल असे दिसत असताना केदार जाधव १२(२५) मिचेल सॅन्टेनरकडे त्याच्याच गोलंदाजीवर सोपा झेल बाद झाला. तब्बल सात वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने कर्णधार कोहलीच्या साथीने भारताच्या डावाची धुरा आपल्या हाती घेतली. दोघांनी एकेरी-दुहेरी धाव घेत संघाचा धावफलक धावता ठेवला. आज आपला २०० व एकदिवसीय सामना खेळणाऱ्या कोहलीच्या मागे भाग्यही होते असे म्हणावे लागेल. १९ व्या षटकात डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर कव्हर्सला उभ्या असलेल्या सॅन्टेनरने अगदीच सोपा झेल सोडत कोहलीला मोठे जीवदान दिले. या वेळेस कोहली ३१ धावांवर खेळत होता. दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत भारताला आव्हानात्मक धावसंख्येकडे वळवले. दरम्यान कोहलीने आपले ४६ वे एकदिवसीय अर्धशतक षटकार व चौकार खेचत ऐटीत पूर्ण केले. परिस्थिती दोन्ही भारतीयांच्या बाजूने जात असताना दिनेश कार्तिकने टीम साऊथीचा शॉट चेंडू लॉन्ग लेगला सीमारेषेबाहेर लागण्याच्या नादात मुनरोकडे झेल देत बाद झाला. या वेळेस कार्तिकच्या बॅटचा कडा घेत चेंडू थेट लॉन्ग लेगच्या खेळाडूकडे गेला. बाद होण्यापूर्वी कार्तिकने ४७ चेंडूंत चार चौकारांसह ३७ धावंच योगदान दिलं. ‘विराट’ शतक एकीकडे एक-एक फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांना शरण जात होते तर दुसरीकडे कर्णधार कोहली एका हाताने किल्ला लढवित होता. दिनेश कार्तिकसोबतची ७३ धावांची भागीदारी संपुष्ठात आल्यानंतर कोहलीने धोनीसह आणखी एक महत्वपूर्ण भागीदारी रचली. या वेळेस दोघांनी ७४ चेंडूंत ५७ धावांची आवश्यक अशी भागीदारी रचली. धोनीनेही आपल्या कर्णधाराला उत्तमप्रकारे साथ देत एका समाधानकारक धावसंख्येकडे नेले. धोनी बाद झाल्यानंतर भारताकडे कोहलीशिवाय एकही महत्वाचा फलंदाज उरला नव्हता. अश्या वेळेस कोहलीने भुवनेश्वर कुमारच्या साथीने सूत्रे हाती घेत धावा जमवल्या. आपल्या संयमतेचा उत्तम नमुना पेश करीत आणखी एक शतक झळकावलं. आपला २०० सामना खेळणाऱ्या कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील ३१ वे शतक ठोकत ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगला मागे टाकले. २०० व्या सामन्यात शतक झळकावणारा कोहली हा एबी डिव्हिलियर्सनंतर दुसरा खेळाडू ठरला. शेवटच्या षटकात कोहली (१२१) वेगाने धावा जमा करण्याच्या नादात बाद झाला. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत आठ गडी गमावत सन्मानजनक २८० धावा केल्या. पाहुण्यांची सावध सुरुवात २८१ धावांचं माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने काहीशी आक्रमक पण सावधरीत्या सुरुवात केली. अनुभवी मार्टिन गप्टिल व कॉलिन मुनरो या सलामी जोडीने भारताच्या भुवनेश्वर-बुमरा या जोडीचा संयमी सामना केला. भारताची हि जोडी सुरुवातीच्या षटकांत बळी मिळवण्यास पूरक ठरते हि बाब न्यूझीलंड संघाने चांगलीच लक्षात घेत पहिल्या पावरप्लेमध्ये संयमी फलंदाजी केली. भुवी-बुमरा या जोडीला अगदी चांगलेच पारखून सलामी जोडीने मिळलेल्या खराब चेंडूंचा चांगलाच समाचार घेतला. दहाव्या षटकात बुमराच्या गोलंदाजीवर स्लोवर चेंडू खेळण्याच्या नादात दिनेश कार्तिकच्या हाती झेल देता बाद झाला. त्याने ३५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचत २८ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सनने गप्तीलच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवच्या फिरकीला नमुन केदार जाधवकडे सोपा झेल देत न्यूझीलंडच्या गोत्यात अडचणी वाढवल्या. विलियम्सनने ८ चेंडूंचा सामना करीत केवळ ६ धावा केल्या. मधल्या फळीची कमाल विस्फोटक वाटणाऱ्या मार्टिन गप्टिलला १८ व्या षटकात चालते केल्यानंतर भारत सामन्यात परत येईल असे वाटले होते. परंतु टॉम लॅथम व अनुभवी रॉस टेलर यांनी भारताच्या फिरकी तसेच वेगवान गोलंदाजणांनाही अगदी सहजरित्या खेळत काढून विराट कोहलीच्या नाकी नऊ आणले. एकेरी-दुहेरी धाव त्याच्या जोडीलाच कमकुवत चेंडूवर प्रहार करीत दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी रचली. पाचव्या चौथ्या गड्यासाठी पन्नास धावांची भागीदारी रचित संघाला दीडशेच्या पल्ला गाठून दिला. दरम्यान रॉस टेलरने आपले ३८ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. टेलर-लॅथमची कमाल न्यूझीलंड संघात सर्वात अनुभवी असलेल्या रॉस टेलरने आपला अनुभव पणाला लावत न्यूझीलंडसाठी विजयाची दारे उघडून दिली. तर त्याला उत्तम साथ ती युवा टॉम लॅथमने. ८० धावांवर तिसरा गडी बाद झाल्यानंतर या जोडीने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी दमदार अर्धशतके झळकावत संघाला २०० चा व नंतर विजयाकडे कूच केले. लॅथमने ९५ चेंडूंत आपले आपले चौथे एकदिवसीय शतक लगावले. यात त्याने आठ चौकार व दोन षटकार खेचले. शेवटची धाव बाकी असताना टेलर आपल्या शतकासाठी षटकार खेचण्याचा नादात बाद झाला. लॅथमने नंतर विजयी षटकार खेचत संघाला सहा गडी व सहा चेंडू राखत भारताचा पराभव केला.]]>