कोलकाता: एडन गार्डन येथे झालेल्या टी २० विश्व चषक स्पर्धेच्या सामन्यात भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४ गड्यांनी मात करीत स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयाची मालिका अखंडित ठेवली. विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला नैसर्गिक खेळ दाखवत भारताला विजय मिळवून दिला आणि भारताच्या स्पर्धेतील आशा कायम ठेवल्या. मागच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दारूण पराभवानंतर भारताला स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी आज विजयाची आवशकता होती. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे भारत पाकिस्तान सामना होईल कि नाही याबद्दल शंका होती. शेवटी पाउस थांबला व सामना प्रत्येकी १८-१८ षटकांचा खेळवण्यात आला. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तान संघाने निर्धारित १८ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ११८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. चांगल्या फॉर्मात असलेला रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात आमिरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर सामीने धवन व रैनाला पाठोपाठ बाद करीत भारताला अडचणीत आणले. धावांचा पाठलाग करण्यात माहीर असलेल्या विराट कोहलीने एका बाजूने मोर्चा सांभाळीत युवराज सिंघच्या साथीने भारताला विजयाकडे नेले. युवराज बाद झाल्यानंतर धोनीने कोहलीसह १३ चेंडू शिल्लक ठेवत भारताला विजय मिळवून दिला.]]>