पुणे, दिनांक 17 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या दिल्ली डायनॅमोज संघाचा अपवाद वगळता उपांत्य फेरीतील स्थान कुणालाही गृहीत धरता येणार नाही, असे एफसी पुणे सिटीचे प्रशिक्षक अँटोनीओ हबास यांना वाटते. हबास यांनी पहिल्या आयएसएलमध्ये अॅटलेटीको डी कोलकता संघाला विजेतेपेद मिळवून दिले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली. त्यांचा चेन्नईयीन एफसीकडून पराभव झाला. चेन्नईयीनने नंतर विजेतेपद मिळविले. आता हबास पुण्याकडे आहेत. बाद फेरी गाठण्यासाठी काय करावे लागते याची त्यांना नक्कीच कल्पना आहे. शुक्रवारी बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर पुण्याची दिल्ली डायनॅमोजशी लढत होत आहे. या लढतीची संघाकडून तयारी करून घेण्यासाठी हबास सक्रीय आहेत. पुणे दहा सामन्यांतून 12 गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे. आशा कायम राखण्यासाठी त्यांना निर्णायक विजयाची गरज असेल. हबास यांनी सांगितले की, आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करू. ही स्पर्धा फार खडतर आहे. सर्व संघांची स्थिती जवळपास सारखीच आहे. आम्ही तीन गुण कमावण्यासाठी सज्ज आहोत. एटीके आणि मुंबई सिटी एफसी या संघांना हरवून पुणे सिटीने धडाका सुरु केला होता, पण चेन्नईयीन एफसीविरुद्ध त्यांची वाटचाल खंडीत झाली. त्यांना 0-2 असा पराभव पत्करावा लागला. या लढतीतून एकही गुण न मिळाल्याने धक्का बसल्याचे हबास यांनी नमूद केले, पण त्यांच्या संघाच्यादृष्टिने अजूनही सर्व काही संपलेले नाही. स्पेनच्या हबास यांच्यावर कामगिरी करून दाखविण्याचे दडपण आहे. ते म्हणाले की, दिल्लीचा अपवाद सोडल्यास सर्व संघ एकमेकांच्या आसपास आहेत. सरस खेळ करणारे आणि गोल नोंदविणारे संघ कमी चुका करतात. गुणतक्ता पाहिल्यास सर्व बहुतेक संघांमध्ये दोन गुणांचा कमी-जास्त फरक दिसतो. अशावेळी चुका कमी करणे महत्त्वाचे असेल. दिल्लीचा संघ स्पर्धेत सर्वोत्तम असल्याविषयी शंका नाही, पण प्रशिक्षक जियानल्यूका झँब्रोट्टा यांच्यादृष्टिने तेवढे पुरेसे नाही. संघाने बाद फेरी गाठण्याचे प्राथमिक उद्दीष्ट अद्याप साध्य केले नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले, पण पुणे सिटीला हरविल्यास त्यांचे ध्येय शुक्रवारीच साध्य झालेले असेल. इटलीचे विश्वकरंडक विजेते झँब्रोट्टा म्हणाले की, या घडीला आमची स्थिती चांगली आहे, पण आम्हाला अजूनही बरीच मजल मारायची आहे. ही स्पर्धा चुरशीची आहे. पुढील चार सामने सोपे नसतील. आम्हाला एकावेळी एका सामन्याचा विचार करावा लागेल. या घडीला आमचे लक्ष केवळ पुण्याविरुद्धच्या लढतीकडे आहे. दिल्लीने एटीकेविरुद्ध रंगतदार लढतीत 2-2 अशी बरोबरी साधत एक गुण मिळविला. हे त्यांच्यासाठी चांगले ठरले. पूर्वार्धात एक खेळाडू मैदानाबाहेर गेल्यानंतरही त्यांनी गुण कमावला. एटीकेविरुद्ध सनसनाटी गोल केलेल्या मिलान सिंग याला स्पर्धेतील चौथ्या कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो एका सामन्यासाठी निलंबीत झाला आहे. झँब्रोट्टा म्हणाले की, मागील सामना पुणे सिटीने गमावल्याचे मला ठाऊक आहे, पण त्यांनी सलग दोन सामने जिंकताना एटीके आणि मुंबईला हरविले आहे. पुण्याचा संघ कडवा प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत.]]>