२७३ धावांचं लक्ष्य पेलण्यास उतरलेल्या पाकिस्तानचा ६९ धावांत खुर्दा करीत भारताने गाठली अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी. सामना होणार ऑस्ट्रेलियाशी क्राईस्टचर्च (न्यूझीलंड): संपूर्ण स्पर्धेत शोभेशी कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने आणखी एक विजय नोंदवत अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला तब्बल २०३ धावांनी पराभूत करीत विक्रमी सहाव्यांदा युवा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सामन्याचे शिल्पकार ठरले ते शतकवीर शुभम गिल आणि वेगवान गोलंदाज इशान पोरेल. मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वात उतरलेल्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शॉ व मनजोत कालरा यांनी १५.३ षटकांत भारतासाठी ८९ धावांची सलामी भागीदारी रचित सुरुवात दणक्यात करून दिली. परंतु ही जोडी दोन षटकांच्या अंतरात तंबूत परतल्यानंतर भारत पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर डगमगतो की काय असे वाटत असताना चांगल्याच फॉर्मात असणाऱ्या शुभम गिलने अंडर १९ मध्ये आपण ‘डॉन’ का आहोत हे सिद्ध करून दाखवले. या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या तीन डावांत अर्धशतके झळकावणाऱ्या गिलने आज पाकिस्तानबरोबर नाबाद शतक लगावत भारताला समाधानकारक २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली. तर पाकिस्तानकडून मुहम्मद मुसाने ६७ धावांत ४ व अर्शद इक्बालने ५१ धावांत ३ बळी टिपले. धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या पाकिस्तान संघाकडून कडवी झुंज पाहावयास मिळेल असे वाटत असताना बदली खेळाडू म्हणून भारतीय चमूत वर्णी लागलेल्या इशान पोरेलने पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीचं कंबरडं मोडलं. सहा षटके, दोन निर्धाव, १७ धावा व चार बळी. अशी चमकदार कामगिरी करीत पाकिस्तानचे पहिले चार गडी त्याने अवघ्या २८ धावांत माघारी धाडले. तर त्याला उत्तम साथ मिळाली ती रियान पराग (६ धावांत २ बळी) व शिवा सिंग (२० धावांत २ बळी) यांची. या माऱ्यासमोर पाकिस्तान संघला ६९ धावांत गारद करीत भारताने सलग दुसऱ्यांदा अंडर १९ विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात भारताचा सामना होईल तो तीन वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघाशी. अंतिम सामना शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी होईल.]]>