पृथ्वी शॉच्या युवा ब्रिगेडने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ गडी व ६७ चेंडू राखून पराभव करीत युवा विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक चौथं जेतेपद फटकावलं. भारताच्या शुभम गिलनं मिळवला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान. माऊंट माऊंगानुई / न्यूझीलंड: जेव्हा भारत स्पर्धेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला तेव्हाच भारत या स्पर्धेसाठी फेव्हरेट आहे असं सर्वांनी जाहीर केलं होत. स्पर्धेची सुरुवातही भारताने ऑस्ट्रेलियाला १०० धावांनी पराभूत करीत अगदी दणक्यात केली. लीग राऊंडचे उरलेले सामनेही अगदी सहजतेने जिंकले. मग बाद फेरीतील उपांत्यपूर्व फेरीचा बांगलादेशविरुद्धचा सामना असो वा पाकिस्तानविरुद्धचा उपांत्यपूर्वीचा सामना असो, भारताने हेही सामने अगदी आरामात जिंकले. आणि आज झालेल्या अंतिम सामन्यातही कोणतीही जास्त मेहनत न घेता ऑस्ट्रेलियाला पराभूत करीत आपणच का फेव्हरेट होते हे सिद्ध करून दाखविले. येथील सुमारे ४००० प्रेक्षक असलेल्या मैदानात भारताने आपली विजयी मालिका कायम राखत ऑस्ट्रेलियाचे २१७ धावांचं लक्ष्य ३८.५ षटकांत पूर्ण करीत ट्रॉफीवर तब्बल चौथ्यांदा नाव कोरलं. मोहम्मद कैफ (२०००), विराट कोहली (२००८), उन्मुक्त चंद (२०१२) आणि आता मुंबईकर पृथ्वी शॉ. याआधी ऑस्ट्रेलियानेही तीन वेळेस अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. भारताने आज त्यानांच पराभूत करीत हा नवा विक्रम नोंदविला. [caption id="attachment_3293" align="aligncenter" width="600"] राहुल द्रविड व पृथ्वी शॉ विश्वचषकासोबत (ICC/Getty Images)[/caption] सामना जिंकण्यासाठी भारताने २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थोडीशी सावध सुरुवात केली. चार षटकांनंतर आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर पृथ्वी शॉ व मनजोत कालरा थोडेसे आक्रमक झाले. शॉ (२९) बाद होण्यापूर्वी दोघांनी ७० चेंडूंत ७१ धावांची सलामी भागीदारी केली. स्पर्धेत झकास कामगिरी करणाऱ्या शुभम गिलला आज म्हणावं तसं यश आलं नाही. ३० चेंडूंत चार चौकारांच्या साहाय्याने त्याने ३१ धावा केल्या. मग उरलेली कसर पूर्ण केली ती मनजोत कालरा व हार्वीक देसाई यांनी. मनजोत कालराने कोणताही दबाव न घेता एक बाजूने किल्ला लढविला. ऑस्ट्रेलियाच्या कमकुवत चेंडूंचा पुरेपूर फायदा घेत त्याने अंतिम सामन्यात नाबाद शतक झळकावले. १६० मिनिटांच्या खेळीत त्याने १०२ चेंडूंचा सामना करीत आठ चौकार व तीन षटकारांच्या साहाय्याने १०१ धावांची खेळी केली. तर दुसरीकडे हार्वीक देसाईने त्याला उत्तम साथ देत ६१ चेंडूंत पाच चौकारांच्या साहाय्याने नाबाद ४७ धावा केल्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. जॅक एड्वर्डस व मॅक्स ब्रायंट यांनी डावाची सुरुवात केली. उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो कि पळो करून सोडलेल्या ईशान पोरेलने आजही ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीला लवकरच तंबूत धाडीत भारताला उत्तम सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाकडून जोनाथन मर्लोचा (१०२ चेंडू ७६ धावा) अपवाद सोडला तर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आणि म्हणूनच कि काय २७० धावा जिथे धावफलकावर दिसत होत्या तिकडे संघ २१६ धावांतच गारद झाला. १८३ धावांवर पाचवा गाडी बाद झाला आणि संघ २१६ धावांत गारद झाला. शेवटचे चार फलंदाज तर अवघ्या ४ धावांतच तंबूत परतले. भारताच्या वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाजांनीही आज आपली चलाखी दाखवली. ईशान पोरेलसोबतच शिवा सिंग, कमलेश नागरकोटी, अनुकूल रॉय यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले तर शिवम मावीला एक बळी मिळाला. संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया २१६/१० (४७.२) – जोनाथन मर्लो ७६, परम उप्पल (३४) । ईशान पोरेल २-३०, अनुकूल रॉय २-३२ भारत २२०/२ (३८.५) – मनजोत कालरा १०१*, हार्वीक देसाई ४७* । सुदरलँड १-३६, परम उप्पल १-३८ भारत आठ गडी व ६७ चेंडू राखून विजयी]]>