कोलकता, दिनांक 24 ऑक्टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) अपराजित राहिलेल्या माजी विजेत्या अॅटलेटीको डी कोलकता (एटीके) संघाची झगडणाऱ्या मुंबई सिटी एफसीविरुद्ध मंगळवारी येथील रबिंद्र सरोवर स्टेडियमवर लढत होत आहे. स्पर्धेतील अपराजित मालिका अबाधित राखण्यात आघाडी फळीची क्षमता पुरेशी ठरेल अशी एटीकेची आशा आहे. एटीके हा यंदा आतापर्यंत अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे. मुख्य म्हणजे एटीकेने प्रत्येक सामन्यात गोल केला आहे. उत्तरार्धात त्यांनी पाच गोल केले आहेत, जे सहभागी संघांमध्ये सर्वाधिक आहेत. दुसरीकडे मुंबईने पत्करलेले सहापैकी पाच गोल उत्तरार्धात झाले आहेत. साहजिकच एटीकेला चांगल्या संधीची शक्यता वाटत असेल. एटीकेचे यानंतर सलग तीन सामने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर होणार आहेत. साहजिकच घरच्या मैदानावर निर्णायक विजयासह कमाल गुण मिळविण्याचे महत्त्व प्रशिक्षक होजे मॉलीना यांना ठाऊक आहे. यानंतर एटीकेचा संघ नॉर्थईस्ट युनायटेड एफसी, एफसी पुणे सिटी आणि दिल्ली डायनॅमोज या संघांविरुद्ध खेळेल. मॉलीना यांनी सांगितले की, मुंबईविरुद्ध खेळण्यास सर्व खेळाडू सज्ज असतील अशी मला आशा आहे. ते सर्वोत्तम कामगिरी करतील, जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि तीन गुण मिळवितील अशी आशा आहे. आम्ही गुणतक्त्यात आघाडी घेतली तर ती चांगलीच गोष्ट असेल, पण या घडीला तीच सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट नाही. आम्हाला तीन गुण जिंकायचे आहेत. मागील सामन्यात मॉलीना यांच्या संघाने दिल्लीविरुद्ध 1-0 असा विजय मिळविला. घरच्या मैदानावर यंदा त्यांनी प्रथमच विजय संपादन केला. एटीके पाच सामन्यांतून नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जिंकल्यास त्यांना नॉर्थईस्टला मागे टाकून आघाडी घेता येईल. स्पेनचे मॉलीना म्हणाले की, तीन गुण मिळविणे महत्त्वाचे असेल कारण त्यामुळे आम्ही उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष्य साधण्याच्या जवळ जाऊ. त्यादृष्टिने गुणतक्त्यात आमचा संघ अव्वलच आहे की नाही यास फारसे महत्त्व नसेल. मुंबई सिटीने मोसमाच्या प्रारंभी सलग दोन सामने जिंकून चांगली सुरवात केली, पण गेल्या चार सामन्यांत त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही. सुरवातीला त्यांनी एफसी पुणे सिटी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांना हरविले, मग मात्र चार सामन्यांत ते दोनच गुण मिळवू शकले. मागील सामन्यात एफसी गोवा संघाविरुद्ध त्यांना एकमेव गोलने पराभूत व्हावे लागले. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी सांगितले की, गोव्याविरुद्ध न मिळालेले गुण यावेळी जिंकण्याच्या उद्देशाने आम्ही एटीकेविरुद्ध खेळू. अनेक खेळाडू जायबंदी झाल्यामुळे कोस्टारीकाच्या गुईमाराएस यांना संघाचे स्वरुप साधताना कसरत करावी लागेल. मागील सामन्यात लिओ कोस्टा आणि अन्वर अली यांना केवळ बेंचवर बसणे भाग पडले, तर प्रोणय हल्दर आणि डीफेडेरीको यांच्याऐवजी बदली खेळाडू धाडावे लागले. बोईथांग हाओकीप हा सुद्धा केरळा ब्लास्टर्सविरुद्ध खेळताना झालेल्या दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यातच बंगळूर एफसीने एएफसी करंडक स्पर्धेत आगेकूच केल्यामुळे चार खेळाडू अनुपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर गुईमाराएस यांच्यासमोर निवडीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत.]]>