मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसावरही मात करीत यु मुंबाने हरयाणा स्टीलर्सवर ३८-३२ अशी मात करीत यंदाच्या मोसमात आपल्या घराच्या मैदानावर पहिला विजय मिळवला. मुंबई: नऊपैकी केवळ तीन सामन्यात विजय, घराच्या मैदानावर अजूनही विजयाची प्रतीक्षा. शिवाय मागील काही दिवसांपासून मुंबईत होत असलेला मुसळधार पाऊस. यु मुंबाने या सगळ्या परिस्थितीवर मात करीत घराच्या मैदानावर पहिला विजय नोंदवत आपल्या घराच्या प्रेक्षकांना चांगली पर्वणी दिली. अनुप कुमारचे आठ रेड पॉईंट, कुलदीप सिंगचे ७ व काशिलिंग अडकेचे ४ गुण यांच्या जोरावर मुंबईने सहज विजय नोंदवला. पहिला हाफ यु मुंबाचा आपल्या घराच्या मैदानावर खेळताना पहिले तीन सामने सलग हरल्यामुळे दबावात असलेल्या यु मुंबाने आज दमदार सुरुवात करीत येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये उपस्थित समर्थकांना चांगलीच पर्वणी दिली. नाणेफेक जिंकत हरयाणा स्टीलर्सना सर्व्हिस करण्यास आमंत्रित करणाऱ्या अनुप कुमारच्या मुंबईने हरयाणाचा सुरजित सिंगला पकडत सामन्याचा श्रीगणेशा केला. अनुप कुमारने खाली रेड करीत हरयाणाला पुन्हा एकदा सर्व्हिस करण्यास भाग पाडले. या वेळेस मात्र हरयाणाचा अनुभवी वझीर सिंगने गुण घेत संघाला खातं उघडून दिलं. सांगलीकर असलेला काशिलिंग अडकेने पहिल्या हाफमध्ये आज आपली जादू दाखवण्यास सुरुवात करीत सामान्यांच्या चौथ्या व मुंबईच्या दुसऱ्या रेडमध्ये दोन गुणांची कमाई करीत धावफलक २-२ असा आणला. मुंबईने आपले आक्रमणही काहीसे आक्रमक करीत हरयाणाला दबावात टाकले. अनुप कुमार – काशिलिंग अडके या जोडीने लागातार सर्व्हिस करीत गुणांची कमाई केली आणि ११ व्या मिनिटाला हरयाणा स्टीलर्सला ऑल आउट केले. या वेळेस यु मुंबाची आघाडी होती ती १५-१०. पहिल्या हाफ नंतर मुंबईने आपल्या कामगिरीत सातत्य दाखवत आघाडी २०-१५ अशी आणली. हरयाणाचं प्रतिउत्तर पहिल्या हाफमध्ये पाच गुणांनी पिछाडीवर असलेल्या हरयाणाने दुसऱ्या हाफमध्ये सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणावर भर देत यु मुंबाला दवाबत आणले. २५ व्या मिनिटाला यु मुंबाला ऑल आउट करीत सामन्याची गणिते फिरविण्यास सुरुवात केली. दरम्यान हरयाणा स्टीलर्सचा खंबा खेळाडू विकास खंडोला जखमी झाला आणि याचाच फटका हरयाणाला बसला. सर्वाधिक ९ गुणांची कमाई केलेल्या विकासाला स्ट्रेचरवर नेण्यात आले. मुंबईचा फिनिशिंग टच ३१ व्या मिनिटाला हरयाणाच्या खेळाडूंनी केलेल्या सर्वोत्तम खेळामुळे यु मुंबा २७-२७ अश्या बरोबरीत आली होती आणि त्यांच्याकडे केवळ ३ खेळाडू मैदानात होते. अश्या वेळेस यु मुंबाच्या मदतीला धावून आली ती त्यांची बचाव फळी. लगातार दोन सुपर टॅकल फाटकावत साधलेली बरोबरीची पुन्हा एकदा आघाडी आणली. याच सुपर टॅकलचा फायदा यु मुंबाने घेतला आणि ३८-३२ अशी आघाडी घेत सामना सहजरित्या जिंकला.]]>