लंडन: भारताचा संघ जरी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असला तरी दुसऱ्या भारतीय संघाने आयसीसीच्या एका चषकावर आपली मोहर उठवून भारतीय क्रिकेट प्रेक्षकांना चांगले गिफ्ट दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामाजिक उपक्रमाचा भाग असलेल्या क्रियो कपचं आयोजन लंडन येथील ट्राफलगर स्क्वेअर येथे आयोजित केलं होत. यजमान इंग्लंड, भारत, जर्मनी, रवांडा, ब्राझील व इंडोनेशिया या सहा संघांत झालेल्या स्पर्धेत भारत विजयी ठरला.
आयसीसीने क्रिकेटचा प्रसार व्हावा व क्रिकेट रसिकांना एकत्र आणण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्पर्धेतील सामील देशांतील नियमांनुसार सामना खेळला जात होता. भारतात टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. त्याच्या अनुषंगाने भारतातून टेनिस बॉल क्रिकेटचा संघ पाठवण्यात आला होता. तीन संघाचा एक, असे दोन गट स्पर्धेत पाडण्यात आले होते. भारताच्या गटात जर्मनी व इंडोनेशिया या संघांचा समावेश होता. मजेशीर बाब म्हणजे जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघाच्या नियमानुसार दोन्ही संघांना सामना खेळणे बंधनकारक होता. भारतने साखळी फेरीत पहिला सामना जर्मनीविरुद्ध खेळाला. नाणेफेक जिंकल्यामुळे भारताने आपल्या नियमानुसार जर्मनीला सहजरित्या पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाच्या नियमानुसार खेळलेल्या सामन्यातही भारताने बाजी मारीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात भारताने इंडोनेशियाच्या नियमानुसार सामना खेळाला. इंडोनेशियामध्ये बॅटच्या ऐवजी स्टॅम्पने फलंदाजी केली जाते. पण कसलेल्या भारतीय संघाने तोही सामना जिंकला.
अंतिम सामन्यात ब्राझीलविरुद्ध नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रति षटक चार चेंडूं अश्या फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाच षटकांत ५३ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल ब्राझील संघ केवळ १८ धावाच करू शकला. भारताने एकतर्फी झालेल्या सामन्यात ३५ धावांनी विजय प्राप्त करीत आयसीसीच्या या पहिल्यावहिल्या क्रियो कपवर नाव कोरत भारताचं नाव उंचावलं. ऑस्ट्रेलियाचे विश्वचषक विजेते कर्णधार स्टीव्ह वॉ हेही या स्पर्धेस प्रामुख्याने उपथित होते. त्यांनी भारतीय संघाला अंतिम सामन्यापूर्वी शुभेच्छा दिल्या. आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांच्या हस्ते पारितोषिक समारंभ पार पडला. उद्या (दि. १४ जुलै) होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याची संधी या विजेत्या संघाला मिळणार आहे.
भारतीय संघात भरत लोहार, ओंकार देसाई, कृष्णा सातपुते, विश्वजित ठाकूर, एजाज कुरेशी व जिग्नेश पटेल या खेळाडूंचा भरणा होता. तर श्याम वागळे व अविनाश जाधव यांनी संघ व्यवस्थापनाची जबाबदारी चोखपणे पार पडली. १६ तारखेला संघ भारतासाठी लंडन येथून रवाना होईल.
]]>