भारतीय निवड समितीने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा करीत मर्यादित क्रिकेट संघातील भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराला संधी दिली आहे. केप टाऊन येथे ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेसाठी एम. एस. के. प्रसाद अध्यक्ष असलेल्या भारतीय निवड समितीने आज दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत १७ जणांचा भारतीय संघ घोषित केला. यात भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराला स्थान देण्यात आलं आहे तर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेतलेल्या हार्दिक पांड्याचा समावेशही करण्यात आला आहे. आपल्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा उप-कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेतील चमूतून चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव व तमिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यांना या संघात स्थान मिळवण्यात यश आलं नाही. मागील जवळ-जवळ एक वर्षांपासून प्रथम-श्रेणी क्रिकेट न खेळलेल्या बुमराला स्थान मिळेल कि नाही अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्ट्यांचा विचार करता भारतीय निवड समितीने बुमराचा विचार करीत आणखी एका वेगवान खेळाडूचा समावेश केला आहे तर विकेट-किपर वृद्धिमान सहाला बॅक-अप म्हणून पार्थिव पटेलचाही समावेश केला आहे. भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहणे (उप-कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा, पार्थिव पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा]]>