टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये आपले दुसरे शतक झळकावणाऱ्या डॅनियल वायटने भारताचे १९९ धावांचे आव्हान अगदी सहजतेने पेलत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालीकेत ०-३ असा सपाटून मार खाल्ल्यानंतर या तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला या सामन्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक होते. पण तगड्या इंग्लंडचा सामना करणे भारतासाठी तितकेच आव्हानात्मक होते आणि इंग्लंडने आपली सर्व ताकद पणाला लावत भारताला सहजरित्या पराभूत केले. गोलंदाजीत सुमार कामगिरी झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी जबाबदारी घेत भारताचा सात गडी व आठ चेंडू राखत पराभव केला. भारताची ‘फ्लाईंग स्टार्ट‘ इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय महिलांना प्रथम फलंदाजीस पाचारण केले. भारताची सर्वात अनुभवी मिथाली राजने युवा स्मृती मंधनाच्या साथीने भारताला सुरुवातीला काहीशी सावध व नंतर हवी तशी सुरुवात करून दिली. पहिल्या तीन षटकांत १६ धावा झाल्यानंतर स्मृतीने चौथ्या षटकात दोन चौकार व एक षटकार खेचत तब्बल २० धावा कुटल्या. तर पावरप्लेच्या शेवटच्या षटकात स्मृतीने आणखी तीन चौकार ठोकत १३ धावा कुटल्या आणि सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद ५२ वर आणली. एकीकडे भारत मोठ्या भागीदारीसाठी मागील काही सामान्यांपासून झगडत होता तिथे आज सलामीवीरांनी झुजारू वृत्ती दाखवीत अपेक्षेप्रमाणे भारताला मजबूत सुरुवात करून दिली. दरम्यान, स्मुतीने नवव्या षटकात आपले अर्धशतक झळकावत आपला फॉर्म कायम ठेवला. तिचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चौथे अर्धशतक होते. लगेच ११ व्या षटकात दोन्ही सलामीवीरांनी १०० धावांची भागीदारी रचित भारताला मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केले. भारतासाठी पहिल्या गड्यासाठी हि पाचवी १०० धावांची भागीदारी होती तर मिथाली राज व स्मृती मंधना यांच्यांत हि दुसरी शंभर धावांची भागीदारी ठरली. विशेष म्हणजे, मिथालीला ३५ धावांवर बिमोन्ट हिच्याकडून जीवनदान मिळाले आणि त्याचाच घेत फायदा मिथालीने आपले १४ वे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. तिने अर्धशतक झळकावण्यास ४० चेंडू घेतले. स्मृती मंधना सेट झाली असे दिसत असताना पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवण्याच्या नादात बिमोन्टकडे सोपा झेल देत तंबूत परतली. तिने ५१ मिनिटे खेळपट्टीवर तग धरत ४० चेंडूंत ७६ धावा केल्या. यात तिने १२ चौकार व दोन षटकार लगावले. तर मिथालीही अर्धशतक झळकावल्यानंतर ५३ धावांवर तंबूत परतली. भारताच्या या सलामी जोडीने दिलेल्या दमदार सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनाही मिळलेल्या संधीचा चांगलाच फायदा घेत भारताला समाधानकारक धावसंख्येवर आणले. हरमनप्रीत कौर (३०) व पूजा वस्तारकर (२२*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अखेरीस ४ गडी गमावत १९८ धावा फलकावर लावल्या. इंग्लंडतर्फे ताश फारांत हिला ३२ धावांत २ बळी तर सोफिया एकलिस्टन व नटालिया स्किवर यांना अनुक्रमे २९ धावांत १ व २४ धावांत १ बळी टिपता आले. इंग्लंडचे तोडीसतोड उत्तर भारताने रचलेल्या १९८ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने भारताच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. इंग्लंडची सलामी जोडी डॅनियल वायट व ब्रायोनि स्मिथ यांनी पावरप्ले चा पुरेपूर फायदा घेत इंग्लंडला भरभक्कम सुरुवात करून दिली. स्मिथ (१५) धावांवर बाद होण्यापूर्वी ५.२ षटकांत इंग्लंडने पहिल्या गड्यासाठी ५२ धावा जमा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या टी बिमोन्ट हिने डॅनियल वायटला चांगली साथ दिली. तिने २३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचत ३५ धावा केल्या. तिला दीप्ती शर्माने वेदा कृष्णामूर्थीकरवी झेलबाद केले. आपल्या चांगल्या फॉर्मात असलेल्या डॅनियल वायटने भारताच्या गोलंदाजांना चांगलेच रडवले. तिने ६४ चेंडूंचा सामना करीत तब्बल १५ चौकार व ५ षटकार खेचत १२४ धावा कुटल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचे हे दुसरे शतक ठरले. दोन शतक ठोकणारी ती केवळ दुसरी मालिका ठरली. तिच्या आधी अशी कामगिरी वेस्ट इंडिजची दिनेन्द्रा डॉटीन हिने केली आहे. इंग्लंडने आठ चेंडूं व ७ गडी राखत भारताचा पराभव केला आणि याच पराभवामुळे आता भारताच्या तिरंगी मालिकेतील आव्हान जवळजवळ संपुष्ठात आले आहे.]]>
Related Posts
अखेर लगाम लागला…!!! तब्बल १२ वर्षांनी भारताने गमावली कसोटी मालिका
भारतीय फलंदाजीचं आणि पुण्याच्या पिचचं जणू वेगळंच नातं आहे. २०१७ कांगारूंनी आणि आता किवींनी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताला…