पुणे: कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या भारतीय संघाने आपला दहशत कायम राखण्याच्या इराद्याने आज येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात मोसमातील नवव्या सामन्याची पाहुण्या ऑस्ट्रेलियासोबत केली. आतापर्यंत ७९ वेगवेगळ्या मैदानांवर सामना खेळलेल्या भारतीय संघाने पुणे येथील मैदानाचा कसोटी क्रिकेटमध्ये श्रीगणेशा करीत आणखी एक विक्रम आपल्या नवे केला आणि पाकिस्तानच्या ७९ वेगवेगळ्या मैदानांवर खेळण्याचा विक्रम मागे टाकीत हा शिरपेच आपल्या माथी रोवला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथने नाणेफेक जिंकत पुण्याच्या सपाट खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. वार्नर- रेनशॉ जोडीने पाहुण्यांना सावध सुरुवात देत एकेरी-दुहेरी धावा घेतल्या आणि विसाव्या षटकात पहिल्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी जमवली. पूर्णपणे सपाट अशी पुण्याची खेळपट्टी असल्यामुळे विराट कोहलीने सामन्याच्या दुसर्याचा षटकापासून अश्विनला गोलंदाजी देत एका बाजूने फिरकीचा मारा केला. १९९८ नंतर पहिल्यांदाच एका फिरकी गोलंदाजाने मैदानाच्या पुनरागमनात गोलंदाजीची सुरुवात केली. कोहलीने दहाव्या षटकात एक रिव्हियू घेतला परंतु तिसर्या पंचांनी तो फेटाळला. नशीब बलवान असेल तर काहीही घडू शकत याची प्रचीती आज डेविड वार्नरला आली. पंधराव्या षटकाच्या शेवटच्या सुरेख चेंडूवर वार्नर त्रिफळाचीत झाला परंतु ‘नो-बॉल’ असल्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. पहिला सत्र संपण्यास काहीच षटके शिल्लक असताना कोहलीने उमेश यादवला गोलंदाजीस पाचारण केले आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थक ठरवीत दुसऱ्याच चेंडूत वार्नरला बाद करीत पहिला धक्का दिला. लगेच रेनशॉही अस्वस्थ वाटू लागल्याने मैदानाबाहेर गेला आणि एक गडी बाद होताच दोन नवे फलंदाज मैदानात उतरले. पहिल्या सत्र अखेरीस ऑस्ट्रेलियाने ३३ षटकांत १ गडी गमावत ८४ धावा केल्या. पहिल्याच दिवसापासून फिरकीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीने मधल्या सत्रात आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली. भारताच्या फिरकी तिकडीने ऑस्ट्रेलियाला मोजक्याच धावा देत दबावात आणले. जयंत यादवने शॉन मार्शला १६ धावांवर बाद केले आणि पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. स्मिथ- हॅंड्सकॉम्ब जोडीने काही काळ सावरण्याचा प्रयत्न केला परंतु जडेजाने हॅंड्सकॉम्बला बाद करीत तिसरा धक्का दिला. पुढच्याच षटकात अश्विनने कोहलीकरवी स्मिथला झेलबाद करीत पाहुण्यांना मोठा धक्का दिला. चहापानाच्या सत्रात भारताने ३० षटकांत कंजूस गोलंदाजी करीत केवळ ६९ धावा देत ३ गडी बाद केले. सत्राखेरीस ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावत १५३ धावा केल्या होत्या. भारताने यंदाच्या मोसमातील चमकदार कामगिरी याही मालिकेत कायम ठेवत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या सत्रातही बॅकफूटवर आणले. फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर विराट कोहलीने आपली फिरकी गोलंदाजी भरपूर वापरात सामन्यात रंजकता आणली. अश्विन-जडेजा या क्रमवारीतील अव्वल जोडीने आपली फिरकीची चमक दाखवण्यास सुरुवात केली. मागील १३ वर्षात एकही भारतात एकही सामना न जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला याही सामन्यात दबाव अनुभवावा लागला. जमेची बाब म्हणजे भारताची कसोटी क्रिकेटमध्येही असलेले उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आता ऑस्ट्रेलिया अशा सर्व संघाने भारताने आपल्या घराच्या मैदानात आपणच राजे आहोत असे दाखवून दिले. शेवटच्या सत्रात फिरकीसोबतच वेगवान उमेश यादवनेही आपली किमया सिध्द केली. जडेजाने मिचेल मार्शला पायचीत करीत कांगारूंचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्याने १८ चेंडूत केवळ ४ धावा केल्या. दरम्यान एक बाजूला तग धरून असलेल्या रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण करीत पाहुण्यांचा डाव सावरला. वयाच्या विसाव्या वर्षी भारतामध्ये अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण ऑस्ट्रेलियाई खेळाडू ठरला. या अगोदर हा विक्रम रिक डार्लिंग (२२ व. १५४ दि.) यांच्या नावे होता. खेळपट्टी आपले रंग दाखवू लागली आणि मॅथ्यु वेड ८(२०), रेनशॉ ६८(१५६), ओ किफे ०(१३), नॅथन लियोन ०(१) हे चार फलंदाज एका पाठोपाठ बाद झाले. मॅथ्यु वेडचा बळी हा खरा तर व्रीद्धीमान सहा याचाच होता असे म्हणावे लागेल. अगदी पहिल्या स्लीपमध्ये असलेला झेल त्याने अप्रतिमरित्या टिपत उपस्थित प्रेक्षकांची माने जिंकली. २०५ धावांवर नववा गडी बाद झाल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाला लवकरच गुंडाळेल की काय असे वाटत असताना मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी शेवटच्या विकेटसाठी चिकाटी फलंदाजी करीत भारताच्या गोलंदाजांचा घाम काढला. स्टार्कने स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवत चौकार षटकारांची तुफान फटकेबाजी करीत आपले अर्धशतक झळकावले. ४७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह त्याने आपले नववे अर्धाशतक लगावले. तसेच दहाव्या गड्यासाठी हेझलवूडसह ५० धावांची अभेद्य भागीदारी रचली. दिवसाखेरीस ऑस्ट्रेलियाने ९४ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २५६ धावा केल्या. उद्या भारतीय गोलंदाजांसमोर उरलेला गडी लवकरात लवकर बाद करून मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान असेल. आजच्या दिवसातील काही खास विक्रम
- एम. सी. ए. स्टेडीयम पुणे हे भारताचे ८० वे कसोटी मैदान ठरले. कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये भारत हा पाकिस्तानला मागे टाकत सर्वात जास्त मैदानांवर खेणारा पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. सामना सुरु होण्यापूर्वी भारत-पाकिस्तान ७९ मैदानांवर खेळले होते.
- ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यासह भारतात भारताविरुद्ध सलग सातव्यांदा नाणेफेक जिंकला. पूर्वीच्या सहा सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे.
- इशांत शर्माचा हा ७५ वा कसोटी सामना आहे. ७५ किंवा अधिक कसोटी सामने खेळणारा तो १७ वा भारतीय कसोटीपटू ठरला आहे. सचिन तेंडूलकर याने सर्वाधिक २०० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
- ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध भारतात सर्वात तरुण अर्धशतक झलकवण्याचा पराक्रम मॅट रेनशॉ याने आज केला आहे. आज म्हणजे वयाच्या २० व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी रिक डार्लिंग (२२ वर्ष, १५४ दिवस) यांच्या नावे हा पराक्रम होता.