चेन्नई, दिनांक 29 ऑक्टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सने गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले. सदर्न डर्बीतील हा सामना शनिवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. गोलशून्य बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे गुणतक्त्यातील त्यांच्या अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकात फरक पडला नाही. चेन्नईयीनचे सहा सामन्यांतून, तर केरळाचे सात सामन्यांतून प्रत्येकी नऊ गुण झाले. सामन्यातील शेवटची काही मिनिटे बाकी असताना केरळाने गोलसाठी प्रयत्न केले, परंतु आक्रमण कमजोर राहिल्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. आजच्या लढतीत दिवाळीची आतषबाजी अजिबात दिसली नाही. केरळासाठी कर्णधार अॅरोन ह्यूज, तर चेन्नईयीनसाठी हॅन्स म्युल्डर याची दुखापत धक्कादायक ठरली. रेफरींनी सामना संपल्याची शिट्टी फुंकल्यानंतर संघ माघारी येताना खेळाडूंत तणाव दिसला, परंतु प्रकरण वेळीच निभावले. सामन्याच्या पूर्वार्धातही गोलांचा धमाका अनुभवायला मिळाला नाही. चेन्नईयीन एफसीला किमान दोन गोल करता आले असते, परंतु ते संधी साधू शकले नाहीत. चेन्नईयीनला 34व्या मिनिटास धक्का बसला. त्यांचा अनुभवी खेळाडू हॅन्स म्युल्डर याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, त्याची जागा मॅन्यूएल ब्लॅसी याने घेतली. चेन्नईयीनला सामन्याच्या 25व्या मिनिटास चांगली संधी होती, परंतु चेन्नईयीनच्या बलजित साहनी याने मारलेल्या कॉर्नर किकवर एली साबिया याने चेंडूला हेडरने दिशा दाखविण्याच्या प्रयत्न केला, मात्र गोलरिंगणात उपस्थित असलेला केरळा ब्लास्टर्सचा कर्णधार अॅरोन ह्यूज याने फटका रोखला. लगेच दोन मिनिटांनी चेन्नईयीनला आणखी एक संधी प्राप्त झाली. लागोपाठ मिळालेल्या तिसऱ्या कॉर्नर फटक्यावर बर्नार्ड मेंडी याचा प्रयत्न अगदी थोडक्यात हुकला. 37व्या मिनिटाला बर्नार्ड मेंडीच्या पासवर बलजित साहनी ऑफ साईड ठरल्यामुळे चेन्नईयीनला लाभ मिळाला नाही. पूर्वार्धात विशेष प्रभावी न ठरलेल्या मायकेल चोप्रा याला उत्तरार्धात प्रशिक्षक स्टीव कोपेल यांनी माघारी बोलावले. 58व्या मिनिटास त्याची जागा दिदियर कादियो याने घेतली. त्यापूर्वी विश्रांतीनंतरच्या पाचव्या मिनिटास चेन्नईयीनच्या डेव्हिड सुसी याने चेंडू नियंत्रित केला होता, पण तो ऑफ साईड असल्याने केरळाचे नुकसान झाले नाही. त्यानंतर प्रशिक्षक मार्को माटेराझी यांनी बदल करताना सुसीच्या जागी मॉरिझियो पेलुसो याला मैदानात पाठविले. केरळाचा कर्णधार अॅरोन ह्यूज याला 65व्या मिनिटास मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी फारुख चौधरी मैदानात आला. दुखापतग्रस्त अॅरोनच्या अनुपस्थितीत केरळाच्या बचावावर मर्यादा आल्या. सामन्याच्या 72व्या मिनिटास केरळाच्या महंमद रफीक याने रचलेल्या चालीवर केर्व्हन्स बेलफोर्ट याने चेन्नईयीनच्या बचावावरील ताण वाढविला होता. मात्र बेलफोर्टचा फटका दिशाहीन ठरल्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटू शकला नाही. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनने जेजे लालपेखलुआ याला मैदानात धाडले. भारताच्या या स्ट्रायकरने दुदू ओमागबेमी याची जागा घेतली.]]>