यजुवेंद्र चहलचे पाच तर कुलदीप यादवचे तीन बळी, नंतर शिखर धवनने लगावलेले नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नऊ गडी व तब्बल १७७ चेंडू राखत पराभव केला. सेन्चुरियन: आधी ए. बी. डिव्हिलियर्स व नंतर फॅप डुप्लेसिस. एकीकडे दक्षिण आफ्रिकेला दुखापतींच्या मालिकेने वेढले असताना आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका अजून एकदा आफ्रिकेला बसला आणि सहा सामान्यांच्या मालिकेत ०-२ अश्या पिछाडीवर राहावे लागले. नवखा कर्णधार एडन मक्रमवर संघाची धुरा सोपवण्यात आली. दोन प्रमुख फलंदाजांशिवाय मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान होतं ते क्रमवारीत त्यांची जागा मागच्या सामन्यात हिसकावून घेतलेल्या भारताबरोबर. विराट कोहलीने नाणेफेक जिंकत आफ्रिकेला फलंदाजीस उतरवलं. मागच्या सामन्यातील संघ कायम ठेवत कोहलीने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीने डावाची सुरुवात केली. एकीकडे पहिल्या सामन्यातील विजयानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने कमकुवत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर चांगलाच दबाव टाकला. वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले तर रिस्टस्पिनर्सनी उरलेली कामगिरी फत्ते केली. दहाव्या षटकात भुवनेश्वरने हाशिम आमलाला (२३) धोनीकरवी झेलबाद करीत दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. तर १३ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिड-विकेटला मोठा फटका मारण्याच्या नादात दुसरा सलामीवीर क्विंटन डी-कॉक (२०) चहलच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याकडे झेल देत तंबूत परतला. लगेच पुढच्याच षटकात चहलचा साथीदार कुलदीप यादवने आपल्या पहिल्याच षटकात मक्रम व डेव्हिड मिलर यांना चालते करत दक्षिण आफ्रिकेची साफ हवाच काढून टाकली. पाचव्या गड्यासाठी जे. पी. डुमिनी व पदार्पण करणारा खाया झोडो यांनी ४८ धावांची भागीदारी रचित डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण उर्वरित फलंदाजांनी योग्य साथ न दिल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ११८ धावांत आटोपला. यात मोलाची कामगिरी केली ती भारताचा स्पिनर यजुवेंद्र चहलने. ८.२ षटकांत एका निर्धाव षटकासह फक्त २२ धावांत आफ्रिकेचे पाच गडी बाद करीत सामन्याचा हिरो ठरला. तर कुलदीपने २० धावांत तीन गडी बाद केले. बुमरा व भुवनेश्वरने प्रत्येकी एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला २५ च्या वरचा आकडा गाठता आला नाही. ११९ धावांचं छोटंसं लक्ष्य पार करण्यास उतरलेल्या भारतीय संघाने सामना २१ व्या षटकातच जिंकत तब्बल १७७ चेंडू राखून ठेवत आव्हान पार केले. भारताचा रोहित शर्मा (१७ चेंडूंत १५ धावा) हा एकमेव गडी बाद करण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आलं. कागिसो रबाडाने त्याला बाद केले. शिखर धवनने ५६ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या तर विराट कोहली ५० चेंडूंत ४६ धावा करीत नाबाद राहिला.]]>