महाराष्ट्र डर्बीत रायसिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव करीत २० धावांनी सामना जिंकत आय. पी. एल. मध्ये दिमाखात प्रवेश केला. पुण्याची टिच्चून गोलंदाजीने विजयात मोलाचा हातभार लावला. १९ च्या षटकातील मिचेल मॅक-क्लेनेघनच्या २६ धावा व शेवटच्या दोन षटकांत पुणे संघाने कुटलेला ४१ धावा. हेच दोन षटके ठरली मुंबईच्या विजयात अडथळा आणि इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या क्वालिफायर मध्ये त्यांना २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. याच विजयाबरोबर रायसिंग पुणे सुपरजायंटने आय. पी. एल. मध्ये पाहिल्यान्दाच फायनलमध्ये प्रवेश करत मुंबईला यंदाच्या मोसमात तिन्ही वेळेस पराभूत करण्याची किमया केली. अव्वल मानांकित मुंबई व पुणे या संघात खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबई संघाने सर्वात अनुभवी हरभजन सिंगला आराम देत कर्ण शर्मावर भरोसा दाखवत फॉर्मात असलेल्या नितीश राणाही आराम देत अंबाती रायडूला अंतिम अकरात स्थान दिले. दुसरीकडे पुणे संघानेही बेन स्टोक्सच्या जागी न्यूझीलंडचा लोकी फर्ग्युसनला संधी दिली. दोन्ही वेळेस मुंबईला हरवणाऱ्या रायसिंग पुणे सुपरजायंटला प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आज मैदानात उतरावे लागले. मुंबईची अचूक सुरुवात प्लेऑफचा दांडगा अनुभव असलेल्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे घेत पुण्याच्या फलंदाजांना पहिल्याच षटकापासून जखडून ठेवलं. मागच्या मोसमाप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्सचा यशस्वी गोलंदाज ठरलेला मिचेल मॅक-क्लेनेघन आजही मुंबईला सुरुवातीलाच गडी बाद करून देण्यात यशस्वी ठरला. पहिल्याच षटकात युवा राहुल त्रिपाठीचा मधला स्टम्प उखडत मुंबईला यश मिळवून दिलं. त्रिपाठीला आपलं खातंही खोलता आलं नाही. पुढच्याच षटकात अनुभवी लसिथ मलिंगाने घातक स्टीवन स्मिथला (१ धाव, २ चेंडू) हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करीत पुण्याला दुसरा धक्का दिला. एका प्रकारे घराचं मैदान असलेला अजिंक्य राहणे खेळपट्टीवर तग धरून राहत एकेरी-दुहेरी धाव व खराब चेंडूला सीमेरेषेबाहेर धाडत पुण्याचा धावफलक चालता ठेवला. पावरप्लेच्या अखेरीस रायसिंग पुणे सुपरजायंटने साडेपाचच्या सरासरीने २ गडी गमावत ३३ धावा केल्या होत्या. रहाणे-तिवारीची किक स्टार्ट पहिल्या दोन षटकांत दोन महत्वाचे गडी गमावल्यानंतर मुंबईकर अजिंक्य रहाणे व मनोज तिवारीने पुढचा मोर्चा सांभाळला. यंदाचं सत्र हवं तस न गेल्यानं काहीसा चिंतीत असलेला राहणे मात्र आज सावध पवित्र्यात खेळताना दिसला. सुरुवातीला फिरकी गोलंदाजांना चाचपडत खेळणारा रहाणे वेगवान गोलंदाजांवर तुटून पडला. थोडा सेट झाल्यानंतर त्याने आपला पवित्र बदलत स्पिनर्सनाही चांगलेच घेतले. मनोज तिवारीही सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेत नंतर आक्रमक पवित्र घेत मुंबईच्या गोलंदाजांवर चांगलाच तुटून पडला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी जवळजवळ ११ षटके खेळून काढत महत्वपूर्ण ८० धावा जमवल्या. दरम्यान रहाणेने आपले मोसमातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या रहाणेने काहीसा संयम दाखवत पुण्याला समाधानकारक धावसंख्येकडे नेले. १३ व्या षटकात कर्ण शर्माने ही जोडी फोडत मुंबईला तिसरे यश मिळवून दिले. त्याने रहाणेला (५६ धावा, ४३ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) पायचीत पकडत पुण्याचा भागीदारीला ब्रेक लावला. धोनीची षटकारगिरी एका वेळेस १५० धावाही होतील कि नाही असे दिसत असताना महेंद्र सिंग धोनी पाचव्या क्रमांकावर आला आणि त्याने चित्रच बदललं. मनोज तिवारीच्या साथीने त्याने शेवटच्या काही षटकांत चौफेर फटकेबाजी करत पुण्याला १६० धावांचा पल्ला गाठून दिला. मनोज तिवारीने आपले अर्धशतक झळकावत धोनीला सुरेख साथ दिली. धोनीने २६ चेंडूंत तब्बल पाच षटकार खेचत नाबाद ४० धावा केल्या. पुण्याने शेवटच्या दोन षटकांत मॅक-क्लेनेघन व बुमराला ४१ धावा चोपत समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. तिवारी (५८ धावा, ४८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. पाठलाग अडखळला मुंबईच्या वानखेडेवर धावांचा पाठलाग करतानाचा रेकॉर्ड पहिला तर तो चांगलाच आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात तसे सिद्धही केले आहे. पण आज १६३ धावांचे माफक आव्हान पार करण्यास उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांना जणू ग्रहणच लागले होते की काय असा प्रश्न उपस्थित दर्शकांना पडला होता. सलामीवीर सिमन्स व पार्थिव पटेलने सावध सुरुवात करून दिल्यानंतर शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर सिमन्स कम नशिबी ठरला आणि पाचव्या षटकात तो धावबाद झाला. त्याला १३ चेंडूंत फक्त पाचच धावा करता आल्या.पावरप्लेच्या शेवटच्या षटकात वाशिंग्टन सुंदरने पहिल्या चेंडूत रोहित शर्माला (१ धाव, २ चेंडू) तर चौथ्याच चेंडूत अंबाती रायडूला शून्यावर बाद केले आणि मुंबईला चांगलेच हादरून सोडले. पाचव्या क्रमांकावर आलेला पोलार्ड एक बाजूने टिकून राहिलेल्या पार्थिव पटेलसह मुंबईला सावरेल असे वाटत असताना सुंदरने त्यालाही चालते करत आठव्या षटकाखेरीस मुंबईची अवस्था चार बाद ५१ अशी दयनीय केली. राणाच्या जागी संधी मिळालेला रायडू आज विशेष काही करू शकला नाही आणि समस्थ मुंबई इंडियन्स समर्थकांचा टीकेचा शिकार ठरला. स्मिथने रायडू व पोलार्ड यांचे शॉर्ट मिड-विकेटला अप्रतिम झेल पकडत सुरेख साथ दिली. यात माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या मिळालेल्या टिप्सही फायदेशीर ठरल्या हेही तितकेच विशेष. ठाकूर-सुंदरची चपळाई सुरुवातीलाच मिळलेल्या झटक्यांमुळे मुंबई इंडियन्स पूर्णपणे हादरून गेली आणि त्यांना यातून सावरणे शेवटपर्यंत जमले नाही. सुंदरच्या चपळ गोलंदाजीनंतर मुंबईकर शार्दूल ठाकूरने मुंबईला एकाच षटकात दोन धक्के दिले. तत्पूर्वी फर्ग्युसनने हार्दिक पांड्याला बाद करीत मुंबईची कंबरच मोडली. त्याने १० चेंडूंत १४ धावा जमवल्या. एकीकडे ठराविक अंतराने गडी बाद होत असताना पार्थिव पटेलने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने आपले अर्धशतकही झळकावले. पंधराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुलने कृणाल पांड्याला (१५ धावा, ११ चेंडू) बाद करीत शेवटच्या चेंडूवर पार्थिव पटेलला बाद करीत पुण्याचा विजय जवळजवळ निश्चित केला. दोन्ही वेळेस डॅन क्रिस्टेनने झेल पकडला. दिमाखात फायनलमध्ये प्रवेश मुंबई इंडियन्स सारख्या तगड्या संघाला १६३ धावांचं लक्ष्य पार करण्यास रडवलेल्या पुणे संघाने ऐटितच अंतिम सामन्यात प्रवेश केला. मुंबई इंडियन्सला सोपा वाटणारा विजय सुरुवातीला कठीण करून मग तो घशातून काढत इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात पाहिल्यान्दाच प्रवेश केला. तर मुंबई अंकतालिकेत अव्वल स्थानी राहिल्यामुळे त्यांना उद्या होणाऱ्या हैदराबाद व कोलकाता यांच्यातील विजेत्या संघाबरोबर १९ तारखेला मुकाबला करावा लागेल.]]>