मुंबई, दिनांक 10 नोव्हेंबर 2016: सामना संपण्यास फक्त एक मिनिट बाकी असताना भारताचा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक युजिनसन लिंगडोह याने नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्यामुळे मुंबई सिटी एफसीला त्यांच्या घरच्या मैदानावर एका गोलने पराभूत व्हावे लागले. मुंबई फुटबॉल अरेनावर झालेल्या महाराष्ट्रातील या दोन संघांतील लढतीत विजय मिळवून पुणे सिटीने पहिल्या टप्प्यातील पराभवाचीही परतफेड केली. पुण्यातील लढतीत मुंबई सिटीने एका गोलने सामना जिंकला होता. बंगळूर एफसी संघातील सहकारी सुनील छेत्री याच्याप्रमाणेच लिंगडोहही आज आयएसएल स्पर्धेतील पहिलाच सामना खेळत होता. बंगळूर एफसीतर्फे एकत्रित खेळणारे लिंगडोह व छेत्री आज एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. 89व्या मिनिटाला नारायण दासने डाव्या बगलेतून चेंडू क्रॉस पास केल्यानंतर मुंबई सिटीचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स चेंडू अडविण्यासाठी पुढे आला. परंतु तो गडबडला. त्याचा लाभ उठवत मेघालयातील खेळाडूने चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखविली. एफसी पुणे सिटीने आजच्या विजयामुळे गुणतक्त्यातही झेप घेतली. त्यांचा हा तिसरा विजय होता. त्यांचे नऊ लढतीतून 12 गुण झाले असून ते सातव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी आले. पराभवामुळे मुंबई सिटीला अग्रस्थान मिळविणे शक्य झाले नाही. त्यांचा हा तिसरा पराभव ठरला. दहा सामन्यानंतर मुंबईचे 15 गुण कायम राहिले असून पहिल्या स्थानावरील दिल्ली डायनॅमोजचे 16 गुण आहेत. दिएगो फॉर्लानच्या साथीस सुनील छेत्री आल्यामुळे मुंबई सिटीचे आक्रमण अधिक धारदार ठरले, परंतु ते पुणे सिटीचा गोलरक्षक इदेल बेटे याचा भक्कम बचाव भेदू शकले नाहीत. त्यामुळे सामन्यावर वर्चस्व राखूनही यजमान मुंबई सिटीला विजयाचे पूर्ण गुण प्राप्त करता आले नाहीत. गमावलेल्या संधीही मुंबई सिटीला महागात पडल्या. सामन्यातील सुरवातीच्या 45 मिनिटांच्या खेळात मुंबई सिटीने वरचष्मा राखला, परंतु त्यांना आघाडी घेता आली नाही. पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळानंतर पुणे सिटीने जम बसवायला सुरवात केली. मुंबईच्या मातियस डिफेडेरिको याला संघाला आघाडीवर नेण्याची चांगली संधी होती, परंतु तो पुणे सिटीचा दक्ष गोलरक्षक इदेल बेटे याचा बचाव भेदू शकला नाही. यावेळी बेटे याने अप्रतिम गोलरक्षणाचे कौशल्य प्रदर्शित केले. पुणे सिटीने बचावावर जास्त लक्ष केंद्रित करताना यजमानांची आक्रमणे सफल ठरणार नाही याकडे लक्ष पुरविले. भारताचा हुकमी फुटबॉलपटू सुनील छेत्री यंदाच्या आयएसएलमधील आज पहिला सामना खेळला. एएफसी कप स्पर्धेत बंगळूर एफसीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर छेत्री आज मुंबई सिटीतर्फे मैदानात उतरला. कर्णधार दिएगो फॉर्लानच्या साथीत छेत्री आज सुरेख खेळ केला, त्यामुळे पुणे सिटीच्या बचावफळीस चांगलेच दक्ष राहावे लागले. पुणे सिटीच्या बचावफळीत एदुआर्दो फरेरा याची दक्ष कामगिरीही उल्लेखनीय ठरली. मुंबई सिटीला सामन्याच्या आठव्याच मिनिटाला संघात पहिला बदल करणे भाग पडले. लिओ कॉस्ता याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा थिएगो सांतोस कुन्हा याने घेतली. विश्रांतीला दहा मिनिटे बाकी असताना डिफेडेरिको याने अचूक नेमबाजी केली असती, तर कदाचित मुंबईला एका गोलची आघाडी मिळाली असती. कुन्हा याने चेंडूचा ताबा मिळाल्यानंतर फॉर्लानला सुरेख पास दिला. उरुग्वेच्या स्टार खेळाडूने चेंडू नियंत्रित केला आणि नंतर डिफेडेरिको याला चेंडू दिला. यावेळी डिफेडेरिको याच्यासमोर एकही बचावपटू नव्हता, फक्त गोलरक्षकास चकविणे बाकी होते. गोलरक्षक बेटे याने डिफेडेरिको याचा फटका चपळाईने अडवून गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटू दिली नाही. सामन्याच्या बाराव्या मिनिटाला मुंबई सिटीचा सेहनाज सिंग गोलजाळीच्या दिशेने भेदक फडका मारताना गडबडला होता, त्यामुळे यजमान संघाला सुरवातीसच आघाडी घेणे जमले नव्हते. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर मुंबईला आघाडीची प्रतीक्षा राहिली. छेत्री व फॉर्लान पुणे सिटीच्या रिंगणात वेळोवेळी धडक मारत होते, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव पूर्णपणे भेदण्यात यजमानांना अपयश येत होते. 63व्या मिनिटाला दिएगो फॉर्लानच्या क्रॉस पासवर ख्रिस्तियन वाडोत्झ याने कमजोर फटका मारला, त्यामुळे पुणे सिटीचे नुकसान झाले नाही. मुंबई सिटीची 75व्या मिनिटाला पुन्हा एकदा चांगली संधी हुकली. फॉर्लानच्या फ्रीकिक फटक्यावर गोलरक्षक बेटे याने दक्षता दाखवत पुणे सिटीवरील गहिरे संकट टाळले. बेटेला चाटून चेंडू क्रॉसबारला आपटला.]]>