एकाच रेडमध्ये मुंबईच्या पाच खेळाडूंना बाद करीत महेंद्र राजपूतने गुजरातला निसटता विजय मिळवून दिला. मुंबई: देव देतं आणि कर्म नेतं या म्हणीची प्रचिती यु मुंबाला आज चांगलीच आली. सामन्याच्या ३७व्या मिनिटाला जिथे यु मुंबा ३०-२६ अश्या चार गुणांनी आघाडीवर होती तिथे मुंबईच्या एक घोड चुकीने सामना फिरवला. गुजरातच्या महेंद्र राजपूतने मुंबईच्या मॅटवरील पाचही खेळाडूंना एकाच रेडमध्ये बाद करीत गुजरातला रेडमध्ये तब्बल सात गुण मिळवून दिले आणि संपूर्ण सामन्याचे गणिताचं बिघडून टाकले. या एका रेडने सामना गुजरातकडे ३३-३० असा झुकला व सर्ते शेवटी सामना ३८-३६ असा आपल्या नवे करीत यु मुंबाला घराच्या पराभूत करण्याची किमया केली. एकीकडे नऊपैकी सात विजय, एक पराभव व एक बरोबरी. दुसरीकडे सातपैकी पाच विजय, एक पराभव व एक बरोबरी. निमित्त होतं ते सरदार वल्लभाई पटेल स्टेडियममध्ये रंगलेल्या यु मुंबा व गुजरात फॉर्च्युनजायंट या प्रो-कबड्डीच्या दोन तुल्यबळ संघांच्या लढतीचं. घराच्या मैदानावर शुक्रवारी जयपूर पिंक पँथरला चारीमुंड्या चीत करीत विजयाचा आगाज केलेल्या यु मुंबाचा मुकाबला होता हो प्रो-कबड्डीचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजायंट बरोबर. गुजरातच्या सचिनने पहिल्याच चढाईमध्ये गुण मिळवत पाहुण्यांना खातं उघडून दिलं. पहिल्या हाफचा तिसरा मिनिट चालू झाला आणि वरळीच्या एनएससीआय मैदानावर एकाच जल्लोष झाला. ‘सिद्धार्थ… सिद्धार्थ…’ असा जयघोष उपस्थित प्रेक्षक वर्ग करू लागला. कारण, आधीच्या सामन्यात जयपूर पिंक पँथरविरुद्ध सिद्धार्थ देसाईला यु मुंबाने या सामन्यासाठी राखून ठेवले होते. सिद्धार्थने आपल्या पहिल्याच रेडमध्ये गुण मिळवत प्रेक्षकांना खुश केले. पहिल्या हाफपर्यंत गुजरात फॉर्च्युनजायंटने यु मुंबावर १८-१४ अशी आघाडी घेत दवाब टाकायला सुरुवात केली. सिद्धार्थने या पहिल्या हाफमध्ये एकूण केलेल्या आठ चढाईमध्ये पाच वेळेस गुण कमावण्यात यश प्राप्त केलं तर त्याला दोनदा विरुद्ध संघाने पकडले. मुंबईने पहिल्या हाफमधील राहिलेली कमी दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच भरायची सुरुवात केली. दुसऱ्या हाफच्या पहिल्याच रेडमध्ये सिद्धार्थने दोन गुणांची कमाई करीत गुजरातची आघाडी १६-१८ अशी आणली. दरम्यानच्या काळात यु मुंबाने आपला बचाव भक्कम करीत गुजरातला एक-एक गुण मिळवण्यास मोठी कसरत करायला लावली. सिद्धार्थने अधूनमधून यशस्वी चढाई करीत मुंबईला आघाडी मिळवून दिली. ३३व्या मिनिटाला मुंबईने गुजरातला ऑलआउट करीत चार गुणांची आघाडी मिळवली. पण ३७व्या मिनिटाला महेंद्र राजपूतने केलेली कमाल यु मुंबाला चांगलीच भारी पडली आणि केवळ दोन गुणांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. प्रो-कबड्डीच्या इतिहासात उभय संघांमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या चार सामन्यांत गुजरातने मुंबईला नामविण्याची परंपरा आजवर कायम ठेवली आहे हेही विशेष.]]>