‘सचिन… सचिन…..’, ‘जीतेगा भाय जीतेगा बेंगलोर जीतेगा’, बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते अनिल कपूर यांचा ‘था धीना धिन था’, व्ही डान्स कंपनीच्या बाल कलाकारांचा नृत्याविष्कार व प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या एनएससीआय च्या मैदानात रंगलेल्या विवो प्रो-कबड्डीच्या सहाव्या सत्राच्या थरारक अंतिम सामन्यात बेंगळुरू बुल्सने पवन शेरावतने मोक्याच्या क्षणी दाखवलेला आपल्या सर्वोत्कृष्ट खेळ यांच्या जोरावर फेवरेट मानल्या जाणाऱ्या गुजरात फॉर्च्युन जायंटचा ३८-३३ असा केवळ पाच गुणांनी पराभूत करीत पहिल्यांदाच चषकावर आपले नाव कोरले. दुसऱ्या सत्रात यू मुम्बा कडून केवळ सहा गुणांनी पराभव स्वीकाराव्या लागलेल्या बेंगळुरू बुल्सने आज मात्र सुरुवातीस सावध पवित्रा घेत सामन्याच्या शेवटी शेवटी दमदार खेळ दाखवीत केवळ प्रेक्षकांची माणेच न जिंकता प्रो-कबड्डीचा खिताबही फटकावला. क्वालिफायर १ मध्ये झालेल्या सामन्याची पुनरावृत्ती होत प्रो-कबड्डी अंतिम सामन्यांच्या इतिहासात सर्वात थरारक सामन्याची नोंद झाली.
दोन्ही संघाना आतापर्यंत एक-एक वेळेस जेतेपदाला हुलकावणी दिल्याने यंदाच्या सत्रात कोणत्याही परिस्थिती चकचकत्या करंडकावर आपले नाव कोरण्यासाठी आतुर झालेल्या बेंगळुरू बुल्स व गुजरात फॉर्च्युन जायंट यांच्यातील महामुकाबल्यात प्रेक्षकांना चांगलीच पर्वणी मिळाली. पहिल्या क्वालिफायरमध्ये १२ गुणांनी गुजरात फॉर्च्युन जायंटचा पराभव केलेला बेंगळुरू बुल्स याही सामन्यात फेवरेट होता तर दुसरीकडे मुंबईच्या एनएससीआय मैदानावर रंगलेल्या या मेगा फायनलमध्ये मुंबईच्या प्रेक्षकांचा गुजरातला चांगलाच पाठिंबा होता.
गुजरातचा कर्णधार सचिन कुमारने पहिली रेड करीत सामन्याची सुरुवात केली. पहिल्याच रेडमध्ये बेंगळुरूच्या महेंद्रने सचिनचा शिकार करीत बेंगळुरूला खातं उघडून दिल. गुजरातनेही आपल्या पहिल्याच रेडमध्ये प्रपंजन करवी रेडमध्ये गुण मिळवत खातं उघडलं आणि एका अटीतटीच्या सामन्याचे संकेत दिले. दोन्ही संघ आपापल्या गटात अव्वल असल्यामुळे सामना नक्कीच चुरसीचा होणार होता.
महत्वाच्या या मुकाबल्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्र घेतला होता. कारण एक छोटीशी चुकही भारी पडणार होती. अश्यातच गुजरातने मिळालेल्या संधीचा फायदा घेत बेंगळुरू बुल्सवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. दरम्यान, बेंगळुरू बुल्सचा सात्वत यशस्वी रेडर पवन सिंग शेरावतने प्रो-कबड्डीच्या सहाव्या सत्रातील आपले २५० गुणही पूर्ण केले. गुजरातसाठी के. प्रपंजनने एका बाजूने आपला गुणांचा सिलसिला चालू ठेवत बेंगळुरूच्या गोठ्यात चिंतेचे वातावरण निर्माण केले. पहिल्या हाफला तीन मिनिटे शिल्लक असताना बेंगळुरू ऑल-आउट होण्यास आला होता. अश्यात, बंगळुरूने दुसऱ्या सत्रातील अष्टपैलू खेळाडू काशिलिंग अडकेला मैदानात उतरले. काशिलिंगने एक गुण घेत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला. पण पुढच्याच रेडमध्ये बेंगळुरू सर्वबाद झाला आणि गुजरातला मोठी आघाडी मिळाली. पहिल्या हाफ अखेरीस गुजरात सात गुणांनी आघाडीवर होता.
सात गुणांची मिळाली आघाडी गुजरातला शेवटपर्यंत टिकून ठेवता आली नाही. बेंगळुरू बुल्सचा प्रमुख अस्त्र असलेला पवन शेरावतने आपण का ‘चॅम्पियन’ आहोत हे सिद्ध करून दाखवले. गुजरातने केलेल्या छोट्या छोट्या चुका त्यांच्या अंगलट आल्या. सामन्याच्या ३०व्या मिनिटाला बेंगळुरूने गुजरातला ऑल-आउट करीत सामन्यात पुनरागमन करण्याचे संकेत दिले. पाच मिनिटांनी गुजरातचा सुपर रेडर सचिनने सुपर रेड करीत गुजरातची आघाडी पुन्हा एकदा वाढवली. या वेळेस गुजरात गॉन गुणांनी आघाडीवर होता. पहिल्या हाफमध्ये काहीसा थंड असलेला पवन कुमार मात्र आता चांगलाच तळपला होता. तीन मिनिटे शिल्लक असताना प्रथम त्याने गुण बरोबरीत आणले. नंतरच्या केवळ दीड मिनिटांत गुणतालिका ३६-२९ अशी झाली. इथेच गुजरातचा गेम फिरला. केवळ दीड मिनिटांत बेंगळुरूने सात गुणांची कमाई केली. यात पवनने पाच गुण टिपले. सरते शेवटी गुजरातला पाच गुणांनी सामना गमवावा लागला आणि प्रो-कबड्डीला बेंगळुरू बुल्सच्या नावाने नवा चॅम्पियन मिळाला.
]]>