बेंगळुरू बुल्स विरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चढाईपटूंनी केल्या सुमार कामगिरीची पुनरावृत्ती न करता गुजरात फॉर्च्युन जायंटच्या खेळाडूंनी मिळालेल्या दुसऱ्या संधीचे सोने करीत सलग दुसऱ्यांदा विवो प्रो-कबड्डीच्या अंतिम सामन्यात ऐटीत प्रवेश केला. ‘अ’ गटातील टेबल टॉपर्सनी आज पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम खेळाचा नमुना पेश करीत येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या एनएससीआय-डोम मध्ये रिशांक देवाडिगाच्या यूपी योद्धाला ३८-३१ ने पराभूत करीत एकाच जयजयकार केला. मनप्रीत सिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गुजरात फॉर्च्युन जायंटने आपले साखळी फेरीतील अव्वल मानांकनाला साजेशा खेळ केला.
पहिल्या हाफमध्ये नाममात्र पाच गुणांची आघाडी घेतलेल्या गुजरात फॉर्च्युन जायंटने दुसऱ्या हाफमध्ये मात्र वेगळेच रूप धारण केले. चढाईपटूंनी उत्तरार्धात केलेल्या अफलातून कामगिरीपुढे यूपी योद्धाच्या रेडर्सचे काहीही चालले नाही. सामन्यात रंगात येईल अशी आशा असलेल्या प्रेक्षकांना मात्र गुजरातने चांगलेच मनोरंजित केले.
एका वेळेस १२ गुणांच्या आघाडीवर असलेल्या गुजरातला यूपीने शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या हाफचची तीन मिनिटे शिल्लक असताना यूपीच्या मराठमोळ्या श्रीकांत जाधवने दोन गुण व ऑलआउट असे चार गुण घेत दोन्ही संघांतील फरक केवळ सातवर आणला. यूपी सामन्यात पुनरागमन करेल की काय असे वाटत असताना गुजरातच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपले आक्रमण केले. त्यात भर ती यूपीच्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका. परिणामी, यूपी योद्धाला पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातकडून कर्णधार सचिन कुमारने सर्वाधिक दहा तर यूपीकडून श्रीकांत जाधवने सर्वाधिक सात गुण टिपले. या विजयाबरोबर गुजरात फॉर्च्युन जायंटने सलग दुसऱ्यांदा प्रो-कबड्डीची अंतिम फेरी गाठली. त्यांचा सामना पुन्हा एकदा बेंगळुरू बुल्सबरोबर होईल.
]]>