कोलकता, दिनांक 28 नोव्हेंबर 2016: ऍटलेटीको डी कोलकता संघाची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये मंगळवारी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत होत आहे. येथील रबिंद्र सरोवर स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत एक गुण जिंकल्यास एटीकेला उपांत्य फेरी गाठता येईल. एटीके 12 सामन्यांतून 18 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. केरळाशी बरोबरी साधल्यास पहिल्या चार संघांमधील त्यांचे स्थान नक्की असेल. केरळा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्याविरुद्ध एटीकेची कामगिरी सरस आहे. यातील एकच संघ दिल्ली डायनॅमोजला मागे टाकू शकतो. स्पर्धेच्या अखेरचा सामना केरळा व नॉर्थईस्ट यांच्यात होणार आहे. सध्याचा फॉर्म पाहिल्यास एटीकेला उपांत्य फेरी गाठणारा तिसरा संघ बनण्याची जास्त संधी आहे. दिल्ली सुद्धा आगेकूच करेल. एटीकेचे प्रशिक्षक होजे मॉलीना यांनी सांगितले की, आमचे खेळाडू पहिल्या दिवसापासून करीत असलेल्या मेहनतीमुळे मला आत्मविश्वास वाटतो. ते खरोखरच कसून सराव करीत आहे. ते कामगिरीत सुधारणा करीत आहे. सर्वोत्तम कामगिरी करून संघासाठी योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एटीकेने मागील सामन्यात एफसी गोवाविरुद्ध अंतिम टप्यात 2-1 असा विजय खेचून आणला. या सामन्यात त्यांनी वर्चस्व राखले होते आणि त्यांचे जास्त गोल व्हायला हवे होते. स्पेनच्या मॉलीना यांनी यावरच भर दिला. ते म्हणाले की, गोव्याविरुद्ध आमचा सामना चांगला झाला. आम्ही जास्त गोल करायला हवे होते, पण आता खेळाडूंना कुणाशीही सामना करण्याची काळजी वाटत नाही. कोणता संघ आमच्यापेक्षा पुढे आहे याला महत्त्व नाही. सर्व परिस्थिती सारखीच आहे. आम्ही सामन्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतो, बचाव चांगला करतो आणि शक्य तेवढे गोल करतो. एटीकेचा संघ प्रसिद्ध मध्यरक्षक समीह्ग डौटी याच्याशिवाय स्टीफन पिअर्सन आणि लालरींदीका राल्टे यांच्या तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहे. डौटीला ताप आला आहे. त्यामुळे त्याने सराव केला नाही. स्टीफन आणि राल्टे दुखापतीमधून अद्याप सावरलेले नाहीत. केरळाला पहिल्या तीन सामन्यांत एकच गुण मिळाला होता, पण सध्या चौथे स्थान मिळवून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विजय मिळविल्यास त्यांना उपांत्य फेरीच्या नजीक जाता येईल. त्यांना 97.53 टक्के संधी असेल. त्यांचे स्थान नक्की होण्यासाठी मात्र इतर काही निकष असतील. एटीके, दिल्ली व नॉर्थईस्ट असे तीन संघ 21 गुणांपर्यंत मजल मारू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केरळाची कामगिरी कशी आहे याला महत्त्व राहील. केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल म्हणाले की, उपांत्य फेरी गाठण्यासाठी आमची स्थिती चांगली असल्यासारखे वाटते. कोलकत्यालाही असेच वाटत असेल. या लढतीत खूप काही पणास लागलेले असेल. आम्ही आव्हानाला सामोरे जाण्यास उत्सुक आहोत. मोसमाचा अंतिम टप्पा उत्कंठावर्धक ठरत आहे. शेवटच्या दोन सामन्यांत तुम्हाला प्रयत्नपूर्वक सर्वोत्तम खेळ करण्याची गरज असेल. कॉप्पेल यांनी आत्मविश्वास व्यक्त केला असला तरी एटीकेविरुद्ध केरळाला दक्ष राहावे लागेल. घरच्या मैदानावर केरळाने चार सामन्यांत विजयी मालिका राखली असली तरी कोणत्याही सामन्यात त्यांचा प्रभाव पडला नाही. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर गेल्या तीन सामन्यांत त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही. बाहेरच्या मैदानावर त्यांनी दहा गोल पत्करले आहेत. यापेक्षा जास्त गोल केवळ चेन्नईयीन व गोवा यांच्यावर (प्रत्येकी 12) गोल झाले आहेत. मुख्य म्हणजे बाहेरच्या मैदानावर सहा पैकी चार सामन्यांत केरळाला गोल करता आलेला नाही. त्यांचे बाहेर केवळ तीन गोल आहेत, जे सहभागी संघांमध्ये सर्वांत कमी आहेत. कॉप्पेल यांनी सांगितले की, दोन्ही संघांसाठी गुण महत्त्वाचे आहेत. काही सामन्यांत एटीकेला नशिबाची साथ मिळाली नाही. त्यांना त्यामुळे बरोबरी साधावी लागली. त्यांच्याकडे ताकदवान स्ट्रायकर्स आहेत. या सामन्यातून काही कमवायचे असेल तर आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.]]>