फादर्स डेच्या मुहूर्तावर भारताला नमवत पाकिस्तानने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर आपले नाव कोरले. कसाबसा स्पर्धेसाठी पात्र ठरलेला पाकिस्तान संघ मोठ्या मोठ्या संघाना मात देत सर्वच टीकाकारांचे तोंड बंद करू शकला. वेस्ट इंडिज भारत व श्रीलंक नंतर पाकिस्तान आय. सी. सी. च्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा चौथा संघ ठरला. चॅम्पियन्सच्या विश्वचषकात कशीबशी मिळवलेली पात्रता, भारताकडून मिळालेला साखळी सामन्यातील दारुण पराभव, सर्वच ठिकाणांहून मिळालेली टीका. या सर्वांना मात देत पाकिस्तानने गतविजेत्या भारताला सहजरीतीने मात देत चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जी चमकदार कामगिरी केली खरंच प्रशंसनीय आहे. ज्या संघाला कोणी अंतिम चारमध्येही पाहत नव्हते तो संघ आज विजेता ठरला आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो हेच सिद्ध करून दिले. गतविजेत्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. साखळी सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर भारतच या सामन्यात फेवरेट असेल असे वाटत असताना पाकिस्तानने एका योध्याप्रमाणे शिकस्त दिली. अझहर अली व फखर झमान यांनी पाकिस्तानला मागच्या सामान्याप्रमाणे सुरुवात करून दिली. म्हणतात ना जर भाग्य तुमच्या बाजूने असेल तर काहीही शक्य होऊ शकतं. तशीच प्रचिती आज पाकिस्तान संघाला आली. चौथ्या षटकात बुमराने फखरला बाद केले खरे परंतु भारतीय संघाचा दिवस नसल्याने तो नो-बॉल ठरला आणि पाकिस्तानला जीवदान मिळाले. फखरने या जीवदानाला पुरेपूर फायदा उचलला. अझहर-फखर या जोडीने २३ षटकांत १२६ धावांची भागीदारी रचत भक्कम सुरुवात करून दिली. भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंना धावबाद करण्याचाही प्रयत्न केला परंतु अचूक थ्रो न बसल्यामुळे तिथे भारताने मार खाल्ला. अझहर अलीने आपले १२ अर्धशतक झळकावत एकीकडे १०० हुन अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या फखऱला चांगली साथ दिली. भारताच्या एकही गोलंदाजाला पाकिस्तानचे गडी बाद करण्यात यश आले नव्हते. भारताला पहिला गडी धावबादाच्या रूपात मिळाला आणि भारतीयांनी काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास सोडला. अझहर अलीने ७१ चेंडूंत ५९ धावा केल्या. यात सहा चौकार व एका षटकाराचा समावेश होता. फखऱने भारतीय गोलंदाजांना चांगलेच धारीवर घेत आपल्या चौथ्याच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत मागील काही वर्षांपासून पाकिस्तानला सतावत असलेली सलामी जोडीची समस्या सोडवली. सलामीची सलग दुसरी १०० धावांची भागीदारी या दोघांनी रचली. फखऱने १०६ चेंडूंचा डझनभर चौकार व तीन षटकार खेचत १४४ धावा केल्या. पाकिस्तानने पहिल्यापासूनच सहाच्या आसपास धावगती ठेवल्यामुळे ३५० धावांचा पल्ला गाठेल असे चित्र होते. बाबर आझमनेही ४६ धावांचा योगदान देत पाकिस्तानला मोठा हातभार लावला. रविचंद्रन अश्विनचा एकदिवसीय क्रिकेटमधला फॉर्म हाही भारताला चिंतेचा विषय ठरला. मागील सहा सामन्यांत केवळ ४ गडी बाद करता आल्यामुळे कोहलीसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. जडेजालाही पाकिस्तानचे फलंदाज चोपत होते. मोहम्मद हाफिज यंदाच्या मोसमात जरी चमकला नसला तरी मोक्याच्या क्षणी त्याने चांगली फलंदाजी करीत महत्वपूर्ण अर्धशतक झळकावले. ३७ चेंडूंत ३ षटकार व ४ चौकार खेचत त्याने नाबाद ५७ धावा केल्या. पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत केवळ ४ गडी गमावत ३३८ धावा जमवल्या.भारतातर्फे भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या व केदार जाधव यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. जेव्हा कोणत्याही मोठ्या स्पर्धेची फायनल असते आणि भारत व पाकिस्तान आमने सामने येतात तेव्हा पाकिस्तानच भारतापेक्षा वरचढ असतो. आतापर्यंतच्या १० फायनल्स मध्ये तसे दिसूनही आले आहे. १० पैकी ७ फायनल्स पाकिस्तानने मारले असून भारत केवळ तीनदाच जिंकला आहे. ३३९ धावंच विशाल लक्ष पार करण्यास उतरलेल्या भारतीय संघाने सुरुवातीलाच मार खाल्ला. मोहम्मद आमिरच्या स्विंग गोलंदाजीवर भारतीय आघाडीचने सपशेल नांगी टाकत सामना पाकिस्तानला दिला. आमिरने पहिल्याच पहिल्याच षटकात रोहित शर्माला (०) पायचीत पकडून भारताला मोठा धक्का दिला. आमिरच्या पुढच्याच षटकात कोहलीला जीवदान मिळाले परंतु त्याचा मोठा फायदा न घेता पुढच्याच चेंडूवर तो पॉइंटला शादाब खानकडे झेल देत भारताला पराभवाची चव देण्यास सुरुवात केली. त्याने पाच धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनलाही आमिरने सर्फराजकडे झेल देण्यास भाग पाडले आणि नवव्याच षटकात तिसरा धक्का दिला. या धक्यातून भारताला सावरता आले नाही. युवराज सिंग (२२), महेंद्र सिंग (४), केदार जाधव (९) या मधल्या फळीतील फलंदाजांना धावा करण्यास अपयश आलं आणि भारताचा मधला कणाच मोडून पडला. हार्दिक पांड्याने एकीकडे संघर्ष करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा हा प्रयत्न अपुरा पडला. हार्दिकने ४३ चेंडूंत सहा षटकार व चार चौकार खेचत ७६ धावा केल्या. जडेजाने एक धाव घेण्यासाठी पांड्याला बोलावले आणि नंतर परत पाठवले. याचा गडबडीत पांड्या बाद झाला आणि भारताच्या उरल्यासुरलेल्या आशा संपुष्टात आल्या. जडेजाही २६ चेंडूंत १५ धावा करून सोपा झेल देत बाद झाला. पाकिस्तानतर्फे आमिर व हसन अलीने ३, शादाब खानने २ तर जुनेद खानने १ गडी टिपत भारताला ३१ व्या षटकात १५८ धावांवर बाद करीत १८० धावांनी सामना जिंकला व चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले.]]>