गुवाहाटी, दिनांक 29 नोव्हेंबर 2016: नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये बुधवारी दिल्ली डायनॅमोजविरुद्ध येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर लढत होत आहे. आशा असलेल्या चार संघांमध्ये नॉर्थईस्टला उपांत्य फेरीची केवळ 35.8 टक्के संधी आहे. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असला तरीही नॉर्थईस्ट संघ शांत आणि सकारात्मक राहिला आहे. नॉर्थईस्टला पहिल्या चार संघांमध्ये येण्यासाठी उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. मागील सामन्यात चेन्नईयीन एफसीविरुद्ध हा संघ हरल्यात जमा होता, पण सौविक घोषने इंज्यूरी टाईममध्ये त्यांना तारले. त्यामुळे त्यांना 3-3 अशी बरोबरी साधता आली आणि आशा कायम राहिल्या. सामन्याचा शेवट रोमहर्षक झाला असला तरी आपला संघ एका गुणाच्या योग्यतेचा असल्याचे प्रशिक्षक नेलो विंगाडा यांनी नमूद केले. ते म्हणाले की, आम्ही अखेरच्या मिनिटाला गोल केला म्हणजे आम्ही सुदैवी होतो असे तुम्ही म्हणणार असाल तर मी सहमती दाखवेन, पण नशीबाची साथ मिळावी म्हणून आम्ही गोल करण्याच्या संधीही निर्माण केल्या. त्यामुळे आम्ही बरोबरीच्या योग्यतेचे होतो. हाच निकाल योग्य आहे आणि आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावले. पुढील दोन सामन्यांत आम्ही भक्कम प्रयत्न करू. संघाचे संतुलन साधण्यासाठी विंगाडा यांना कसरत करावी लागेल. कोफी एन्ड्री रोमॅरीक आणि निकोलस वेलेझ या दोघांना तीन कार्ड मिळाली आहेत. आणखी एक कार्ड मिळाल्यास ते केरळा ब्लास्टर्सविरुद्ध निर्णायक लढतीस मुकतील. यजमान संघाच्या सुदैवाने बचावात्मक मध्यरक्षक रॉलीन बोर्जेस एका सामन्याच्या निलंबनानंतर उपलब्ध असेल. याशिवाय जपानचा मध्यरक्षक कात्सुमी युसा यालाही विंगाडा खेळवू शकतील. दिल्ली 12 सामन्यांतून 20 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आधीच्या सामन्यात एफसी गोवा संघाचा 5-1 असा धुव्वा उडविल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. दिल्लीचे प्रशिक्षक जियानल्यूका झँब्रोट्टा यांनी सांगितले की, दुर्दैवाने आम्ही अद्याप उपांत्य फेरी गाठलेली नाही. त्यामुळे आम्हाला या सामन्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. खडतर संघाशी आमची लढत आहे. त्यामुळे टप्याटप्याने आखणी करणे फार महत्त्वाचे राहील. दिल्लीला 99.59 टक्के संधी आहे. त्यामुळे झँब्रोट्टा जास्त खेळून ताण पडलेल्या काही खेळाडूंना हवी असणारी विश्रांती देऊ शकतील. इटलीचे विश्वकरंडक विजेते असलेले झँब्रोट्टा म्हणाले की, आम्हाला आमच्या खेळाडूंच्या अवस्थेचा तसेच तंदुरुस्तीसाठी सावरण्याच्या स्थितीचा अंदाज घ्यावा लागेल. त्यामुळे या लढतीसाठी मी अद्याप डावपेचांची आणखी केलेली नाही. दिल्लीचा अखेरचा सामना मुंबई सिटी एफसीविरुद्ध तीन डीसेंबर रोजी होईल.]]>