गुवाहाटी, दिनांक 22 नोव्हेंबर 2016 – सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना रोमारिच याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय फ्रीकिक गोलवर नॉर्थईस्ट युनायटेडने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत महत्त्वपूर्ण विजय संपादन केला. त्यांनी एफसी पुणे सिटी संघावर एका गोलने निसटती मात केली. सामना येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमवर मंगळवारी झाला. नॉर्थईस्ट युनायटेडचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. त्यांचे आता 11 सामन्यांतून 14 गुण झाले आहेत, ते आता सहाव्या क्रमांकावर आले आहेत. तर पुणे सिटीला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 12 लढतीतून 15 गुण कायम राहिले. त्यांच्या चौथ्या क्रमांकातही फरक पडलेला नाही. नॉर्थईस्ट युनायटेडचा हा पुणे सिटीवर मिळविलेला सलग दुसरा विजय ठरला. पहिल्या टप्प्यात पुण्यात नॉर्थईस्टने एका गोलनेच विजय मिळविला होता. आज विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यामुळे स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याच्या नॉर्थईस्ट युनायटेडच्या आशा कायम राहिल्या आहेत. त्यांचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याची दक्ष कामगिरीही निर्णायक ठरली. सामन्याच्या 81व्या मिनिटाला रोमारिच (कोफी ख्रिस्तियन न्द्री) याच्या जबरदस्त फ्रीकिक फटक्यावर नॉर्थईस्ट युनायटेडने आघाडी घेतली. गोलरिंगणाबाहेर त्याने मारलेल्या ताकदलान फटक्यासमोर पुणे सिटीचा गोलरक्षक अपौला इदेल बेटे हतबल ठरला. रोमिरिकचा हा नॉर्थईस्टसाठी नोंदविलेला आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. पुणे सिटीचा बचावपटू एदुआर्दो फरेरा याने चेंडू हाताळल्यानंतर रेफरींनी यजमान संघासाठी फ्रीकिक दिली होती. त्यावेळी अचूक फटका मारण्याच रोमारिकने अजिबात चूक केली नाही. त्यापूर्वी दोन मिनिटे अगोदर नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुब्रत पॉलच्या दक्षतेमुळे पुणे सिटीला आघाडी घेता आली नव्हती. त्याने अराटा इझुमीचा धोकादायक फटका यशस्वी होऊ दिला नाही. सामन्याच्या पूर्वार्धातील खेळात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. नॉर्थईस्टचा निकोलस वेलेझ आणि पुणे सिटीचा कर्णधार महंमद सिसोको यांच्यातील तणावामुळे या अर्धात वातावरण जरा तापलेले दिसले. मात्र रेफरींनी योग्य वेळी हस्तक्षेप करून प्रकरण वाढू दिले नाही. यावेळी रेफरींनी सिसोको याला यलो कार्ड दाखविले. पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात पुणे सिटीचा आक्रमणावर जास्त भर होता. पूर्वार्धातील खेळात चौघा खेळाडूंना यलो कार्ड दाखविण्यात आले. सामन्याच्या 29व्या मिनिटाला पुणे सिटीला धक्का बसला. त्यांच्या मोमार न्दोये याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा गुस्ताव ओबरमन याने घेतली. त्यापूर्वी 21व्या मिनिटाला जोनाथन लुका चेंडूवर ताबा राखू शकला नाही, त्यामुळे यजमान संघाचा गोलरक्षक सुब्रत पॉलला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. सामन्याच्या पन्नासाव्या मिनिटास नॉर्थईस्टची चांगली संधी वाया गेली. मात्र एमिलियानो अल्फारो याचा प्रयत्न पुणे सिटीचा गोलरक्षक अपौला इदेल बेटे याने यशस्वी होऊ दिला नाही. उत्तरार्धातील अखेरच्या 15 मिनिटांत दोन्ही संघांनी गोलसाठी एकमेकांच्या रिंगणात वारंवार मुसंडी मारली, पण 81व्या आयव्हरी कोस्टच्या रोमारिकने गोलजाळीचा वेध घेण्यात यश मिळविले. त्यापूर्वी 73व्या मिनिटास नॉर्थईस्टच्या निकोलस वेलेझ याचा प्रयत्न हुकला होता. त्याने नियंत्रित फटका मारला असता, यजमानांना आघाडी घेता आली असती, तर त्यापूर्वी लेनी रॉड्रिग्जचा प्रयत्न वाया गेल्यामुळे पाहुण्या संघाला खाते खोलता आले नाही.]]>