सूर्यकुमार यादवची नाबाद ९० धावांची खेळी व वैभव सिंग, आतिफ अत्तरवाला यांच्या गोलंदाजीच्या बळावर ट्रम्प नाइट्सने जिंकली मुंबई टी-२० लीगची पहिली आवृत्ती अटीतटीच्या सामन्यात शिवम दुबेने केलेली झुंज केवळ तीन धावांनी अपुरी पडली आणि मुंबई टी-२० च्या पहिल्या सत्राची सांगता ट्रम्प नाइट्सने रोमांचक पद्धतीने केली. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईकर क्रिकेट शौकिनांची लाभलेली उपस्थिती. ट्रम्प नाईट्सची सुरुवात गडबडली नाणेफेक जिंकून शिवाजी पार्क लायन्सने ट्रम्प नाईट्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि विनोद कांबळीच्या शिवाजी पार्कने आखलेली रणनीती अगदी पुरेपूर आमलात आणली. जिकडे शिखर ठाकूरला सामान्याच्या पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पॉल वलथाटीने जीवनदान तिकडे शशांक सिंगने पुढच्या षटकात षटकार खेचत शिवाजी पार्कच्या गोलंदाजांना दबावात टाकण्याचे प्रयत्न केले. परंतु या सलामीवीरांना जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आले नाही आणि सामान्याच्या तिसऱ्याच षटकात सिद्धार्थ राऊतने शशांक सिंग (१०) व सुमित घाडीगावकर (०) यांना पाठोपाठ चालते केले. विशेष म्हणजे सिद्धार्थने या षटकात एकही धाव खर्च केली नाही. चौथ्या षटकात ट्रम्प नाइट्सला आणखी दोन पाठोपाठ धक्के भेटले आणि संघाची अवस्था ४ बाद १६ अशी झाली. या वेळेस गडी बाद केले ते रॉयस्तान डायस याने. शिखर ठाकूर (५) आणि कल्पेश सावंत (०) हे त्याचे शिकार ठरले. तर पावरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर शिवम दुबेने विनायक भोइरला ९ धावांवर शम्स मुलानीकरवी झेलबाद करीत ट्रम्प नाइट्सचा कणाच मोडला. सहा षटकानंतर संघ होता तो ५ बाद ३४ धावांवर. सूर्यकुमार, परीक्षित चमकले म्हणतात ना कि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आज विश्वचषक क्वालिफायर स्पर्धेत जिकडे स्कॉटलंड वेस्ट इंडिजला हरवेल असे चित्र दिसत होते आणि पावसाच्या आलेल्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडिजला फायदा मिळाला आणि त्यांचा २०१९ विश्वचषक स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला. असेच काहीसे चित्र पाहावयास मिळाले ते ट्रम्प नाइट्सच्या इंनिंगमध्ये. ३४ धावांवर ५ गडी बाद झाल्यानंतर शिवाजी पार्क लायन्सचे गोलंदाज आणखी आक्रमक होऊन नाइट्सचा डाव लवकर गुंडाळतील असे वाटत असताना नाइट्सचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सातव्या क्रमांकावर येत सुरुवातीला काहीसा सावध पवित्रा घेतला. सिद्धार्थ राऊतचे चौथे व सामन्याचे सातवे षटक एकही धाव ने घेता खेळून काढत यादवने चेंडूचा अंदाज घेतला. चेंडू काहीसा वेगाने व उसळी घेत येत असल्यामुळे सूर्यकुमार यादव व परीक्षित वळसंगकर यांनी अगदी संथ गतीने डावाला आकार देण्यास सुरुवात केली. एकेरी-दुहेरी धाव घेत दोघांनी ११ व्या षटकात संघाला पन्नाशी गाठून दिली. थोडेसे सेट झाल्यानंतर दोघांनीही कमकुवत चेंडूंना सीमेरेषेपलीकडे धाडत धावसंख्येची गती वाढवण्यावर भर दिला. ११ ते १३ या तीन षटकांत तब्बल ३२ धावा घेत मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करण्याचे संकेत ता जोडीने दिले आणि अगदी शेवटपर्यंत किल्ला लढवला. टी-२० च्या खेळात जर छोट्या-छोट्या भागीदाऱ्या झाल्या तर तुम्ही मोठी धावसंख्या सहज उभारू शकता. याचाच परिचय आज नाईटच्या सूर्यकुमार-परीक्षित या जोडीने दिला. अगोदर ४७ चेंडूंत ५० धावांची तर नंतर ७१ चेंडूंत १०० धावांची अभेद्य भागीदारी रचित शिवाजी पार्क लायन्सच्या गोलंदाजांचा कस काढला. १८ व्या षटकात दोघांनीही आपले वैयक्तिक अर्धशतक झळकावत एका मोठ्या धावसंख्येचा संकेत दिले. दहाव्या षटकापर्यंत पाचच्या खालीही रन-रेट होता तो २० व्या षटकाअखेरीस नऊच्याही बाहेर गेला. शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर लॉन्ग-ऑनला मारलेल्या चेंडूवर धाव न घेता आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आणि आपला आत्मविश्वास सार्थक ठरवला. या षटकाच्या शेवटच्या पाच चेंडूंवर दोन षटकार व तीन चौकार ठोकत समाधानकारक १८२ धावा उभारून दिल्या. सूर्यकुमारने ४२ चेंडूंचा सामना करीत ७ चौकार व ७ षटकार ठोकत नाबाद ९० धावा केल्या तर परीक्षितने ४९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचत नाबाद ५९ धावा केल्या. शिवाजी पार्क लायन्स कडून सिद्धार्थ राऊत (२-११), रॉयस्तान डायस (२-५३) व शिवम दुबे (१-३१) यांचा अपवाद वगळता एकही गोलंदाजाला आपली झाप सोडता आली नाही. लायन्सची धडाकेबाज सुरुवात कालच्या क्वालिफायर २ च्या सामन्यात सोबो सुपरसॉनिक्स विरुद्ध शिवाजी पार्क लायन्सने १९५ धावांचा पल्ला तब्बल १३ चेंडू राखत जिंकला होता. आजही त्यांना अश्याच काहीश्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पॉल वलथाटीने पहिल्याच षटकात वैभव सिंगला षटकार खेचत संकेत दिले कि आम्हीही तुमच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यास सज्ज आहोत. वैभव सिंगचा चौथा चेंडू वलथाटी तटवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या बॅटच्या कडेने चेंडू थेट स्टॅम्पवर जाऊन आदळला आणि लायन्सना पहिला धक्का मिळाला. वलथाटी बाद झाल्यानंतर कर्णधार ब्राविश शेट्टीने धावांचा धडाका लावला. दहाच्या सरासरीने धावा काढत नाइट्सच्या गोलंदाजांवर वर्चस्व मिळवण्यात काही अंशी शिवाजी पार्क लायन्सला यश प्राप्त झालं. शेट्टी (३२), सिद्धार्थ आक्रे (१०) हे दोन तगडे फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यानंतर अल्पेश रामजानी व हार्दिक तामोरे यांनी डाव सावरला. शिवम दुबेची झुंज वाया अल्पेश रामजानी (४८) व हार्दिक तामोरे (३९) यांच्या चौथ्या गद्यासाठी झालेल्या ८२ धावांच्या भागीदारीनंतर शिवाजी पार्क लायन्स जिंकणार कि असे वाटत होते. १७ व्या षटकात वैभव सिंगने या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडत सामना पुन्हा नाइट्सकडे वळवला. पुढच्याच षटकात आतिफ अत्तरवालाने शम्स मुलानी व रौनक शर्मा यांना खातंही उघडून न देता तंबूचा रस्ता दाखवत सामन्याची रंगात आणखी वाढवली. शेवटच्या षटकात शिवाजी पार्कला जिंकण्यासाठी २६ धावांची गरज असताना नाइट्सकडे हवे तसे गोलंदाज उरले नव्हते. मग सूर्यकुमारला वळावे लागले ते सलामीवीर शशांक सिंग याच्याकडे. लायन्सचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने प्रवीण तांबेला लगावलेल्या एका षटकातील पाच षटकारांची आठवण उपस्थित प्रेक्षकांना आली आणि त्याच्याकडून इथेही अश्याच विस्फोटक खेळीची अपेक्षा विनोद कांबळी व लायन्सच्या खेळाडूंनी केली. दुबेने पहिल्या पाच चेंडूंत तीन षटकार व एक चौकार ठोकत सामान्यच समीकरण एक चेंडू व चार धावा असं आणलं. शशांक सिंगचं भाग्य कि काय त्याने चेंडू शॉर्ट टाकला शिवम दुबे चुकला. शशांकच्या या चपळाईच्या जोरावर ट्रम्प नाइट्सने ३ धावांनी पहिल्या मुंबई टी-२० लीगचं जेतेपद फटकावलं.]]>