१३० धावांचा पाठलाग करताना रायसिंग पुणे सुपरजायंट राहिला केवळ एक धावेने मागे. स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक गेले वाया. मुंबईची सुरुवात गडबडली मोठी फायनल, यंदाची टॉप टीम, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने. अशी परिस्थिती असतानाही मुंबई इंडियन्स रायसिंग पुणे सुपरजायंटपुढे अक्षरशः नरमली आणि आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पुणे साठी यंदाच्या मोसमातील सर्वात सफल ठरलेल्या जयदेव उनादकतने अपेक्षेप्रमाणे सुरुवात करत पहिल्या चेंडूत केवळ तीन धावा देत मुंबईला धोक्याची सूचना दिली. आय. पी. एल. च्या फायनलच्या इतिहासात सर्वात युवा खेळाडू म्हणून मान मिळवलेला व पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईवर मात करण्यास महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या वाशिंग्टन सुंदरने दुसरे षटक टाकत चार धावा खर्च करत मुंबईला जखडून ठेवले. मुंबई इंडियन्सला खरी गळती लागली ती तिसऱ्या षटकात. जयदेव उनादकतच्या स्लो कटरने भल्याभल्या फलंदाजांना चांगलेच रडवले असताना मुंबई इंडियन्सही त्याला अपवाद ठरला नाही. ऑफकटरवर पार्थिव पटेलला (४) बाद करीत मुंबईला पहिला धक्का दिला तर चौथ्या चेंडूवर सिमन्सला (३) फॉलोथ्रू मध्ये चांगला झेल टिपत मुंबईची अवस्था दोन बाद आठ अशी केली. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात रोहित शर्माने फर्ग्युसनला चार चौकार ठोकत काहीसा दिलासा दिला खरा परंतु मोठी सुरुवात करण्यास त्यांना अपयशच आलं. पुण्याचा अचूक टप्पा तीन वेळा एकमेकांशी झालेल्या मुकाबल्यात पुणे मुंबईवर भारीच ठरला आहे. यात त्यांचं प्रमुख अस्त्र ठरलं ते त्यांची अचूक टप्प्याची गोलंदाजी. उनादकत व सुंदर यांनी पावरप्लेमध्ये टाकलेली टिच्चून गोलंदाजी त्यांच्या इतर गोलंदाजांनीही सुरु ठेवत मुंबईला सतावून सोडलं. स्मिथच्या एका वाचून थ्रोवर रायडू (१२) बाद झाला तर अकराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झम्पाला षटकार मारण्याच्या नादात मिड विकेटला शार्दूल ठाकूरकडे झेल देत रोहित शर्मा (२४) बाद झाला. पोलार्डने आल्याआल्या एक षटकार लगावला खरा परंतु स्ट्रेट लॉन्ग ऑनला उभ्या राहिलेल्या मनोज तिवारीकडे झेल देत तोही तंबूत परता. मुंबईचा निम्मा संघ अकराव्या षटकात तंबूत परतला. शार्दूल ठाकूरनेही चांगलीच गोलंदाजी करीत मुंबईच्या खेळाडूंना डोकं वर काढू दिलं नाही. कृणाल पांड्याच्या अपवाद वगळता मधल्या फळीतील इतर फलंदाजांना धावा करता आल्या नाही. कृणालने ३८ चेंडूंत तीन चौकार व दोन षटकार खेचत सर्वाधिक ४७ धावा केल्या. हार्दिक पांड्या (१०) व कर्ण शर्मा (१) हेही स्वस्तात बाद झाल्याने मुंबईला अडचणीत आणले. निर्धारित २० षटकांत मुंबई आठ गडी गमावत १२९ धावा जमवू शकला. पुणेतर्फे उनादकत, झम्पा व ख्रिस्तियान यांना प्रत्येकी २ गडी बाद करता आले तर दोन फलंदाज धावबाद झाले. अजिंक्य रहाणे > मुंबई इंडियन्स यंदा म्हणावं तसं अजिंक्य रहाणेला इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगलं खेळता आलं नाही. पण जेव्हा तो मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलाय तेव्हा तेव्हा त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ दिलाय. मग क्वालिफायर १ मध्ये त्याची मोक्याच्या क्षणी झालेली हाफ सेंचुरी असो वा लीग सामन्यातील महत्वपूर्ण खेळी. आजही त्याने आपला मुंबईकर सहकारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पुरेपूर समाचार घेत संयमी फलंदाजी केली. बुमराने तिसऱ्या षटकात राहूल त्रिपाठीला (३) पायचीत पकडल्यानंतर पुढच्याच षटकात मलिंगाच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर सोपा झेल सोडत रहाणेला जीवनदान दिले आणि जणू सामनाच सोडला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्टीव्ह स्मिथने रहाणेला योग्य साथ दिली आणि रायसिंग पुणे सुपरजायंटला एक सुरेख भागीदारी रचून दिली. स्मिथने अगदी संयम दाखवत एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक चालता ठेवला तर राहणे खराब चेंडूंचा पुरेपूर समाचार घेत होता. या सत्राचा विचार केला तर स्पिनर्स गोलंदाजांमध्ये लेग-स्पिन गोलंदाजी सरस ठरली आहे. पण कर्ण शर्माला अगदी सहजरित्या खेळून काढत पुणे संघाच्या फलंदाजांनी हे आकडे खोटे ठरवले. रहाणे-स्मिथ जोडीने ५७ चेंडू खेळून काढत ५४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. १२ व्या षटकात जॉन्सनने रहाणेचा अडथळा दूर करीत मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. रहाणे बाद होण्यापूर्वी ३८ चेंडूंत ५ चौकारांच्या साहाय्याने ४४ धावा केल्या. या वेळेस पोलार्डने १५ यार्ड धावत एक अप्रतिम झेल पकडला. बुमरा + जॉन्सन >> पुणे १३० धावांचं आव्हान पार करण्यास उरातलेल्या पुणे संघाने अपेक्षेप्रमाणे सुरुवातही केली. अजिंक्य रहाणे व स्टीव्ह स्मिथने जश्या प्रकारे सुरुवात करून दिली त्यावरून असेच वाटत होते कि पुणे हा सामना सहजरित्या जिंकेल. स्पिनर्स शेवटी महाग पडतील हे जाणून बसलेल्या रोहित शर्माने कृणाल पांड्याची शेवटची ओव्हर १६ व्या षटकात संपवण्याचा निर्णय घेतला आणि धोनी-स्मिथ जोडीने पुरेपूर समाचार घेत १४ धावा कुटत समीकरण २४ धावांत ३३ धावा असे आणले. टी-२० मध्ये सध्याच्या घडीला सर्वात यशस्वी असलेल्या बुमराने १७ व्या षटकात चेंडू हाती घेतला आणि धोकादायक धोनीला बाद करीत तसे सिद्धही केले. बुमराने केवळ तीन धावा देत समीकरण १८ चेंडूंत ३० धावा असे आणले. पुढचे षटक मलिंगाने सात धावा देत मुंबईच्या आशा पल्लवित केल्या. एकीकडे जॅम भरून बसलेल्या स्मिथने १९ व्या षटकात बुमराला एक षटकार ठोकत शेवटच्या षटकात ११ धावा असे समीकरण आणले. जॉन्सनला मनोज तिवारीने २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत सामना पुण्याकडे झुकवला. जॉन्सनने पुढच्या दोन चेंडूंत तिवारी व स्मिथ बाद करीत सामन्याची रंजकता वाढवली आणि ३ चेंडू व ७ धावा अशी परिस्थिती आणली. नंतर जॉन्सनने अचूक टप्पा टाकत पुण्याला विजयापासून केवळ एका धावेपासून दूर ठेवत तिसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगच्या चषकावर आपले नाव कोरले. दहा वर्षांच्या इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी धावा कोणत्या संघाने वाचवल्या आहेत. मुंबईने इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी करत पुणे संघाचे पहिल्यांदा जेतेपद फटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. संक्षिप्त धावफलक मुंबई इंडियन्स: १२९/८(२०) – कृणाल पांड्या ४७(३८), रोहित शर्मा २४(२२) । जयदेव उनादकत २-१९(४), झम्पा २-३२(४) रायसिंग पुणे सुपरजायंट: १२८/६(२०) – स्टीव्ह स्मिथ ५१(५०), अजिंक्य रहाणे ४४(३८) । जॉन्सन ३-२६(४), बुमरा २-२६(४) मुंबई इंडियन्स १ धावेने विजयी]]>