धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या वानखेडे मैदानावर मागच्या सहा सामन्यांत दुसरी फलंदाजीची चांगली आकडेवारी पुढे वाढवत मुंबई इंडियन्सने आणखी एक विजय दिमाखात साजरा केला. पाहुण्या गुजरात लायन्सचा सहा गड्यांनीं पराभव करीत आपल्या घराच्या मैदानावर तीनपैकी तीन सामने जिंकत उपस्थित प्रेक्षक तसेच १८००० विद्यार्थ्यांना ‘रविवार‘ स्पेशल मेजवानी दिली. मुंबई: मागच्या दोन सत्रांपासून मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या पाच सामन्यांत विजयासाठी झटत असल्याचे चित्र दिसले होते. यंदाच्या मोसमाच्या सुरुवातही काहीशी तशीच झाली. पहिला सामना पुण्याबरोबर हारून पुन्हा एकदा तसेच रिपीट टेलिकास्ट होईल कि काय असे वाटत असताना सलग चार सामन्यांत अगदी शेवटी-शेवटी मोक्याच्या क्षणी मजल मारत यंदाचे सत्र आपल्या प्रेक्षकांना चांगलीच मेजवानी दिली. आजच्या सामन्यात महत्वाची बाब म्हणे कर्णधार रोहित शर्माचा परतलेला फॉर्म. नितीश राणा याचा सुरु असलेला धडाका आणि मधल्या फळीतील महत्वपूर्ण भागीदाऱ्या मुंबईला या सत्रात चांगली भोवली असून मुंबईला अव्वल स्थानावर विराजमान केले आहे. विद्यार्ध्यांसाठी आजचा सामना मोफत रिलायन्स फाउंडेशनच्या एजुकेशन फॉर ऑल या योजनेअंतर्गत मुंबई इंडियन्सचा आजचा सामना मुंबई शहर, उपनगर, ठाणे तसेच नवी मुंबईच्या शाळांतील मुलांना मोफत पाहावयास मिळाला. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मुंबई इंडियन्सचा मालक श्रीमती नीता अंबानी यांच्या पुढाकाराने दरवर्षी मुंबई इंडियन्सचा एक सामना वानखेडे मैदानावर शाळांतील मुलांना मोफत दाखवला जातो. आजच्या सामन्यातही परिसरातील सुमारे १८,००० शालेय विद्यार्ध्यांना मोफत दाखवण्यात आला. गुजरातची सावध सुरुवात पहिल्याच षटकात दुसऱ्याच चेंडूवर मिचेल मॅकग्लेघनच्या एका बाहेरच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात ड्वेन स्मिथ बॅकवर्ड पॉईंटला उभा असलेल्या नितीश राणाकडे झेल देत बाद झाला आणि मुंबईच्या मैदानावर उपस्थित असलेल्या बच्चे कंपनीला खुश केले. आपले पहिले दोन सामने गमावून पुण्याविरुद्ध विजय मिळवून काहीसा आत्मविश्वास उंचावलेल्या गुजरात लायन्स संघाला पहिल्याच षटकात धक्का मिळाल्याने कर्णधार सुरेश रैनाने अनुभवी सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलमसोबत सावध फलंदाजी करीत संघाच्या डावाला आकार आणायचा प्रयत्न केला. पहिले षटक गुजरात लायन्ससाठी थोडेसे कठीण गेल्याने रैनाने मलिंगाला दुसऱ्या षटकात दोन चौकार खेचून थोडासा दबाव कमी केला. यात एका फ्री हिटचाही समावेश होता. तर मॅक्युलमनेही मलिंगचा समाचार घेत सहाव्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचत मुंबईवर दवाब आणण्याचा प्रयत्न केला. पावरप्लेपर्यंत गुजरात लायन्सने एका गड्याच्या मोबदल्यात ४६ धावांचा आकडा गाठला होता. रैना-मॅक्युलमची महत्वपूर्ण भागीदारी पावरप्ले पर्यंत सावध सुरुवात करणाऱ्या रैना मॅक्युलम जोडीने हरभजन सिंग व कृणाल पांड्या या फिरकी जोडीला योग्य रीतीने खेळून काढून एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक चालता ठेवला. मध्ये मिळणाऱ्या खराब चेंडूंचा पुरेपूर समाचार घेत संघाला एक समाधानकारक सुरुवात करून दिली. रैना बाद होण्यापूर्वी या जोडीने जवळजवळ साडेसातच्या सरासरीने ६५ चेंडूंत ८० धावांची भागीदारी रचून दिली. रैना हरभजनला एक ऑफ साईडचा वाईड चेंडू मारण्याच्या नादात रोहित शर्माकडे झेल देऊन बाद झाला. रैनाने २९ चेंडूंत २ चौकारांसह २८ धावा केल्या. रैना बाद झाल्यानंतर मॅक्युलमने नवखा इशान किशनसह सूत्रे हाती घेतली. दरम्यान मॅक्युलमने आपले बारावे अर्धशतक पूर्ण करीत एका बाजूने डाव सांभाळला. मॅक्युलमने मुंबईच्या वेगवान गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत सपाटून फलंदाजी केली. विशेष म्हणजे मलिंगाला त्याने ११ चेंडूंत दोन षटकार व एका चौकारासह २१ धावा कुटल्या. शेवटी मलिंगानेच त्याला चौदाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्रिफळाचित करीत मुंबईच्या वाट्यातील मोठा अडथळा दूर केला. मॅक्युलमने ४४ चेंडूंचा सामना करीत ३ षटकार व ४ चौकारांसह ६४ धावा केल्या. रैना-मॅक्युलम बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने सामन्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली. इशान किशनसह त्याने ताबडतोब फलंदाजीचे प्रदर्शन करीत गुजरातला एका समाधानकारक धावसंख्येकडे नेले. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी साडेतेराच्या सरासरीने केवळ चार षटकांत ५४ धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं. या भागीदारीत इशान किशनचा वाटा होता तो केवळ ७ धावांचा. दिनेश कार्तिकने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत केवळ २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर आलेल्या जेसन रॉयनेही मिळालेल्या ७ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह नाबाद १४ धाव केल्या. त्यांच्या या मोलाच्या हातभाराअखेरीस गुजरात लायन्सने ४ गडी गमावत १७६ धावा धावफलकावर लावल्या. मुंबईकडून मिचेल मॅकग्लेघन चा अपवाद वगळता इतर वेगवान गोलंदाजांचा गुजरातच्या फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. मलिंगा, बुमरा, हार्दिक पांड्या या तिन्ही गोलंदाजांना ११ हुन अधिक सरासरीने धावा चोपले. मॅकग्लेघनने २४ धावांत २, हरभजनने २२ धावांत १ तर मलिंगाने ५१ धावांत १ बळी टिपला. विशेष म्हणजे आय. पी. एल. चा सर्वात यशस्वी ठरलेल्या लसिथ मलिंगाने आज तब्बल ५१ धावा खर्च केल्या. त्याच्या १० वर्षांच्या आय. पी. एल. मध्ये त्याने पाहिलांदाच एवढ्या धावा खर्च केल्या. मुंबईचाही सावध पवित्रा गुजरातप्रमाणे मुंबईनेही पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आपला सलामीचा फलंदाज गमावत खाते उघडण्याच्या आधी पहिला गडी गमावला. प्रविण कुमारचा स्विंग झालेला चेंडूचा वेध पार्थिव पटेलला घेता आला नाही व फ्लिक करण्याच्या नादात जेसन रॉयकरवी झेल देत बाद झाला. शून्यावर पहिला गडी गमावल्यानंतर नितीश राणाला बढती मिळाली. राणाने जोस बटलरसह मुंबईची पटरीवरून उतरलेली गाडी पुन्हा रुळावर आणली. सहा षटकांच्या समाप्तीनंतर मुंबईने समाधानकारक अश्या ५६ धावा धावफलकावर लागलेल्या होत्या. भरभक्कम आघाड्यांनी केला विजय सोपा नितीश राणा व जोस बटलर यांच्या फटकेबाजीने सावध पण थोडीशी आक्रमक अशी सुरुवात करून दिल्यानंतर मधल्या षटकांमध्ये या जोडीने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत गुजरातच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. मागच्या सामन्यात हॅट-ट्रिक घेतलेल्या अँड्रयू टायने राणाचा अडसर दूर करीत मुंबईला दुसरा धक्का दिला. एका सध्या चेंडूवर कट करण्याच्या नादात तो किपर दिनेश कार्तिककडे झेल देत बाद झाला. राणाने ३६ चेंडूंचा सामना करीत ४ चौकार व २ षटकारांसह यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक लगावले आणि ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल स्थान फटकावले. राणा-बटलर यांनी ५४ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी रचली. राणा बाद झाल्यानंतर लगेच ११ चेंडूनंतर बटलरही मुनाफ पटेलला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. मागच्या सामन्याचा शिल्पकार ठरलेल्या केरॉन पोलार्डने कर्णधार रोहित शर्मासह सामानाची पुढची सूत्रे हाती घेतली आणि आणखी एक ५० धावांची भागीदारी रचली. या दोन भागिदार्यांमुळे मुंबईच्या खेळाडूंनी जवळपास ९ च्या सरासरीने पाहिजे असलेली धावसंख्या आरामात पार केली. पोलार्ड-शर्माने ७ षटकांत ६८ धावांची भागीदारी देत मुंबईला सलग चौथ्या विजयाकडे आणले. पोलार्डने बाद होण्यापूर्वी ३९ (२३ चेंडू, २ चौकार, ३ षटकार) धावा कुठल्या आणि संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. उरलेली कसर रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांनी पूर्ण केली. रोहितने मागच्या ४ सामान्यांपासून धावांचा पडलेला दुष्काळ आज संपवत कर्णधाराला साजेशी खेळी करीत ४० (२९ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) धावांचा मौल्यवान योगदान दिलं. मुंबईने ४ गडी गमावत ३ चेंडू राखून सलग चौथा विजय साजरा केला. मुंबई पुन्हा एकदा अंकतालिकेत अव्वल स्थान फटकावले. संक्षिप्त धावफलक गुजरात लायन्स: १७६/४(२०) – मॅक्युलम ६४(४४), दिनेश कार्तिक ४८(२६) । मॅकग्लेघन २-२४(४), हरभजन १-२२(४) मुंबई इंडियन्स: १७७/४(१९.३) – राणा ५३(३६), रोहित शर्मा ४०(२९) । टाय २-३४(४), प्रवीण कुमार १-२५(२.३)]]>