मुंबई, ता. 9: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी मुंबई फुटबॉल एरीनावर मुंबई सिटी एफसीची महाराष्ट्र डर्बीत एफसी पुणे सिटीशी लढत होत आहे. या लढतीसाठी बंगळुर एफसीच्या चार खेळाडूंचे आगमन होणे वरदान असल्याची भावना मुंबई एफसीचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी व्यक्त केली आहे. सुनील छेत्री, उदांता सिंग, अमरिंदर सिंग आणि लालच्छूआन्माविया फानाई हे खेळाडू एएफसी करंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेल्या संघातील चार खेळाडू होते. आता ते मुंबईकडे दाखल झाले आहेत. त्यांनी सरावही सुरु केला आहे, पण त्यांना खेळविण्याविषयी गुईमाराएस यांनी अद्याप नक्की काही ठरविलेले नाही. कोस्टारीकाचे गुईमाराएस म्हणाले की, हे खेळाडू आमच्याबरोबर आल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. त्यामुळे संघ मोठा झाला आहे. मला पर्याय मिळाले आहेत. कोणत्या खेळाडूंसह सुरवात करायची हे ठरविता येईल. स्पर्धेच्या अंतिम टप्यात हे जणू काही वरदानच म्हणावे लागेल. अंतिम संघात एखाद्या खेळाडूला संधी मिळेल का, या प्रश्नावर गुईमाराएस यांनी इतकेच सांगितले की, हे खेळाडू संघात दाखल होण्यास आणि मुंबई सिटीच्या मोसमात सहभागी होण्यास आतूर आहेत. एएफसी करंडक स्पर्धेतील फॉर्म पाहता छेत्रीला खेळविण्याचा मोह गुईमाराएस यांना होऊ शकतो. मुंबई सिटीसाठी गेल्या मोसमातही छेत्रीने सर्वाधिक गोल केले होते. मुंबईच्या 16 पैकी आठ गोलमध्ये त्याचा वाटा होता. सात गोल आणि एक अॅसिस्ट अशी त्याची कामगिरी होती. गुईमाराएस यांनी सांगितले की, डर्बीमध्ये काय घडेल हे तुम्ही केव्हाच सांगू शकत नाही. आम्ही योग्य खेळ करण्याची आणि जिंकण्याची तयारी केली आहे. पुणे संघाने दृष्टिकोन थोडा बदलला आहे. चांगले खेळल्यास आपण हरू शकत नाही याची त्यांना कल्पना आहे. या लढतीचे हे आकर्षण आहे. मुंबई नऊ सामन्यांतून 15 गुणांसह आघाडीवर आहे. यानंतरही उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला आणखी बरीच मेहनत करावी लागेल असे गुईमाराएस यांनी नमूद केले. आमची आगेकूच जवळपास नक्कीच आहे असा समज करून घेणे आम्हाला परवडणार नाही. आम्हाला चांगली संधी आहे आणि त्यासाठी चांगला खेळ सुरु ठेवावा लागेल, असे ते म्हणाले. मुंबई सिटीने पुण्यातील पहिला सामना जिंकला, पण आता पुणे संघाचा आत्मविश्वास माजी विजेत्या एटीकेवरील विजयामुळे उंचावला आहे. पुणे नऊ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. निर्णायक विजय मिळविल्यास त्यांना चौथा क्रमांक गाठता येईल. पुण्याचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांनी सांगितले की, मागील सामन्यानंतर संघाची घडी चांगली बसली आहे. खेळाडू सज्ज झाले आहेत. एटीकेनंतरच्या सामन्यापासून संघ अप्रतिम बनला आहे. मुंबईने आम्हाला पुण्यात हरविले. आता आम्ही त्यांना उद्या हरविण्याचा प्रयत्न करू. हे अवघड असल्याची आम्हाला कल्पना आहे, पण आम्ही प्रयत्न करू. पुणे सिटीने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर यंदा अद्याप पराभव पत्करलेला नाही, पण मुंबईत त्यांना अद्याप गोल करता आलेले नाही. पुण्याला यंदा एकाही सामन्यात प्रतिस्पर्ध्याच्या गोलचे खाते रिक्त ठेवता आलेले (क्लीन शीट) नाही आणि हबास यांच्यासाठी ही चिंतेची बाब असेल. 12 सामन्यांत क्लीन शीट न ठेवू शकलेल्या पुण्याची ही आयएसएलमधील कोणत्याही संघाची सर्वांत खराब मालिका आहे.]]>