मुंबई, दिनांक 20 ऑक्टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये एफसी गोवा संघ आपले आव्हान राखण्यासाठी झगडतो आहे. या स्पर्धेच्या इतिहासात नामुष्की होऊ नये म्हणून हा संघ प्रयत्नशील आहे. शुक्रवारी मुंबई सिटी एफसीविरुद्ध मुंबई फुटबॉल एरीनावर एफसी गोवा संघ आक्रमक खेळाच्या निर्धाराने मैदानावर उतरेल. हिरो आयएसएलला 2014 मध्ये प्रारंभ झाल्यापासून पहिल्या पाच सामन्यांत एकही विजय मिळाला नाही असे कोणत्याही संघाच्या बाबतीत घडलेले नाही. मुंबईविरुद्ध बरोबरी किंवा पराभव झाल्यास एफसी गोवा संघावर ही नामुष्की येऊ शकते. एफसी गोवा आणि मुख्य प्रशिक्षक झिको यांना यापूर्वीही अशा आव्हनात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. 2014च्या मोसमात एफसी गोवाला पहिल्या चार सामन्यांत केवळ एकच गुण मिळाला होता. यानंतरही या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. यामुळेच यावेळी सुद्धा पारडे फिरविण्याचा आत्मविश्वास झिको बाळगून आहेत. त्यातही गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवू न शकलेल्या मुंबईविरुद्ध त्यांना चांगली संधी वाटत आहे. ते म्हणाले की, आम्ही चांगला खेळ करीत आहोत. आम्ही जे सामने हरलो त्यात सुद्धा आम्हाला वेगळे निकाल नोंदविता आले असते. प्रतिस्पर्ध्यांच्या गुणवत्तेमुळे नव्हे तर आमच्या स्वतःच्या चुकांमुळे आम्ही दोन सामने गमावले. गोव्यासाठी बचाव चिंताजनक आहे. गोव्यावर सात गोल झाले आहेत. सहभागी संघांमध्ये सर्वाधिक गोल झालेला हा संघ आहे. दुसरीकडे गोव्याला एकच मैदानी गोल नोंदविता आला आहे. गेल्या मोसमात गोव्यातील सामन्यात मुंबईचा एफसी गोवा संघाने 7-0 अशा धुव्वा उडविला होता. त्यामुळे यावेळी मुंबईच्या बलाढ्य संघाला सामोरे जाण्यास गोवा उत्सुक असेल. यंदाच्या मोसमात मुंबई सिटीने कोस्टारीकाच्या अलेक्झांड्रे गुईमाराएस यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन घडविले आहे. मागील सामन्यात मुंबईने दिल्ली डायनॅमोजविरुद्ध 3-3 अशी बरोबरी साधली. मुंबई पाच सामन्यांतून आठ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाला अव्वल स्थानावरून हटविण्यास मुंबई उत्सुक असेल. दिल्लीविरुद्ध मुंबईने दोन गोलांची आघाडी दोन वेळा दवडली. यामुळे निराश झाला आहात का, या प्रश्नावर गुईमाराएस यांनी सांगितले की, मागील सामन्यात आम्ही चांगला खेळ केला. स्पर्धेची रंगत वाढविण्यासाठी असे सामने उपयुक्त ठरतात. गोव्याप्रमाणेच मुंबईचे स्ट्रायकर सुद्धा धडाका दाखवू शकलेले नाहीत. दिएगो फोर्लानने पेनल्टीवर केलेल्या गोलचा अपवाद वगळता इतर सर्व गोल विंगर किंवा मध्य फळीने केले आहेत. मागील तीन सामने दुखापतीमुळे खेळू न शकलेला फोर्लान मैदानावर परतेल, अशी माहिती गुईमाराएस यांनी दिली. अन्वर अली आणि लिओ कोस्टा यांच्यासंदर्भात मात्र अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. दोघे दिल्लीविरुद्ध जायबंदी झाले. गुईमाराएस यांनी सांगितले की, आतापर्यंत प्रतिकूल निकाल लागले असले तरी एफसी गोवा हा सरस गुणवत्तेचा संघ आहे. त्यांनी धाडसी, आक्रमक खेळ केला आहे. उद्या त्यांच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे. पहिल्या मोसमात अशाच पद्धतीने त्यांनी बाद फेरीत आगेकूच केली होती, तर मागील वर्षी अंतिम फेरी गाठली होती. हा फुटबॉलचा खेळ आहे आणि यात काही वेळा असे होते. जेव्हा प्रतिकूल परिस्थितीत सापडलेला प्रतिस्पर्धी येतो तेव्हा तो आणखी धोकादायक ठरतो. त्यामुळे आम्हाला सावध राहावे लागेल.]]>