मुंबई, दिनांक 10 ऑक्टोबर 2016: मुंबई सिटी एफसीची मंगळवारी हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) अॅटलेटीको डी कोलकाता संघाशी लढत होत आहे. यंदा घोडदौड करीत असलेल्या या संघाचा मुंबई फुटबॉल एरीनावरील लढतीत माजी विजेत्यांविरुद्ध कस लागेल. त्यामुळे तिसऱ्या फेरीचा हा सामना उत्कंठावर्धक ठरेल. मुंबई सिटी एफसीने पहिले दोन सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्यावर एकही गोल होऊ दिलेला नाही. दोन्ही सामने प्रत्येकी एकमेव गोलने जिंकले असले तरी प्रतिस्पर्ध्याच्या गोलचा रकाना रिकामा असणे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांच्यासाठी आनंददायक आहे. दुसरीकडे एटीके सुद्धा अपराजित आहे. पहिल्या सामन्यात त्यांना चेन्नईयीन एफसीविरुद्ध बरोबरी साधावी लागली. मग त्यांनी शैलीदार खेळ करीत केरळा ब्लास्टर्सला शह दिला. कोस्टारिकाचे गुईमाराएस म्हणाले की, मोसमाला झालेल्या प्रारंभाचा आम्हाला आनंद वाटतो. संघ आणि चाहते यांची भावना सर्वस्वी वेगळी आहे. इतर संघांचा प्रतिध्वनीे सुद्धा वेगळा आहे. मुंबई सिटी एफसी संघाकरीता यंदाचा मोसम वेगळा ठरणार असे प्रतिस्पर्ध्यांना वाटू लागले आहे. हे चांगले आहे, पण आता आमची नुसती सुरवात झालेली आहे. अशा लिगमध्ये तुम्हाला दक्ष राहावे लागते. जल्लोषासाठी किंवा हताश होण्यासाठी फारसा वेळ मिळत नसतो. तुम्हाला सतत चुरशीने खेळावे लागते. सर्व संघांमध्ये फारसा फरक नसल्यामुळे आयएलएलमध्ये सोपा सामना कोणताही नसेल. दोन विजयांमुळे गुईमाराएस यांचा आत्मविश्वास दुणावला असला तरी एटीकेविरुद्ध सर्वाधिक खडतर आव्हान असेल याची त्यांना जाणीव आहे. त्यांनी सांगितले की, एटीकेने मागील मोसमातील प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू कायम राखले आहेत. हा संघ चांगला आहे. त्यांच्याविरुद्धची लढत कठिण असेल. त्यांच्या खेळाडूंना एकमेकांविषयी चांगली माहिती असून त्यामुळे समन्वय छान आहे. आम्हाला आमचा खेळ करावा लागेल आणि खेळावर लक्ष केंद्रीत ठेवावे लागेल. आम्हाला भक्कम आणि चिवट खेळ करावा लागेल. पाहुण्या एटीके संघाला आयएसएलमध्ये आघाडीवर राहिलेल्या मुंबईच्या क्षमतेची जाणीव आहे. त्यांचे प्रशिक्षक होजे मॉलीना यांना ही लढत उत्कंठावर्धक होईल असे वाटते. त्यांनी सांगितले की, एका भक्कम संघाशी लढत खेळण्यासाठी येथे आलो असल्याचे आम्हाला ठाऊक आहे. दोन सामने, दोन्ही वेळा विजय, सहा गुण आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोलचे खाते रिकामे अशी मुंबईची कामगिरी आहे. ही मुंबईसाठी फार छान सुवात आहे. त्यांच्याविरुद्ध आम्हाला आमच्या शैलीचा खेळ करायचा आहे. आमची शैली सारखी असल्यामुळे लढत चुरशीची ठरेल. मुंबईच्या दोन्ही गोलमध्ये मार्की खेळाडू दिएगो फोर्लान याचा वाटा आहे. पुण्याविरुद्ध सलामीच्या सामन्यात उरूग्वेच्या या माजी खेळाडूने एकमेव गोलची चाल रचली. मग त्याने पुढील सामन्यात उत्तरार्धात पेनल्टीवर गोल केला. या स्टार स्ट्रायकरसाठी एटीकेने मात्र कोणतीही उपाययोजना आखलेली नाही. मॉलीना यांनी सांगितले की, फोर्लानसाठी स्पेशल प्लॅन नाही. मला एकाच खेळाडूवर लक्ष केंद्रीत करायला आवडत नाही. त्यांच्याकडे आघाडी, मध्य आणि बचाव फळीत चांगले खेळाडू आहेत. माझ्या संघाने एक किंवा दोन खेळाडू नव्हे तर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकत्र बचाव करावा असे वाटते. आम्हाला बचाव कसा करायचा हे ठाऊक आहे. उद्या विजय मिळविणारा संघ गुणतक्त्यात आघाडी घेईल. त्यामुळे चुरस वाढलेली असेल.]]>