कोलकता, दिनांक 15 ऑक्टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या फेरीत अॅटलेटीको डी कोलकता संघाची रविवारी एफसी गोवाविरुद्ध येथील रबींद्र सरोवर स्टेडियममध्ये लढत होत आहे. कट्टर प्रतिस्पर्ध्याची अवस्था आणखी बिकट करण्याची संधी एटीके सोडण्याची शक्यता नसेल. पहिल्या तीन सामन्यांत पाच गुण मिळवून एटीकेची वाटचाल चांगली सुरु आहे. गोवा मात्र गुणतक्त्यात तळाला आहे. तीन प्रयत्नांत त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही. तीन मोसमांत गोव्याचा प्रारंभ सर्वाधिक खराब झाला आहे. गोव्याविरुद्ध सहा लढतींत एटीके अपराजित आहे. त्यामुळे गुण आणखी वाढविण्याची संधी असल्याची एटीकेला चांगली कल्पना आहे. एटीके मुख्य प्रशिक्षक होजे मॉलीना यांनी सांगितले की, हा सामना अवघड असेल याची मला खात्री आहे. गोवा आतापर्यंत जिंकलेला नाही आणि ते विजयासाठी झुंज देतील, पण ही काही आमच्यासाठी समस्या नाही. आम्ही घरच्या मैदानावर खेळत असू आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. मी आणि सर्व खेळाडू मिळून जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू. एटीकेने सलामीच्या लढतीत चेन्नईयीन एफसीविरुद्ध गुण वाटून घेतला. मग केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी कमाल गुणांची कमाई केली. याआधीच्या सामन्यात त्यांनी मुंबई सिटी एफसीविरुद्ध बरोबरी साधली. दुसरीकडे गोवा संघाची आतापर्यंतची सर्वाधिक खराब सुरवात झाली आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध सलामीलाच त्यांचा पराभव झाला. मग एफसी पुणे सिटीकडून ते हरले. त्यानंतर गतविजेत्या चेन्नईयीनकडूनही त्यांचा पराभव झाला. गोव्याचे प्रशिक्षक झिको यांना मात्र आयएसएलचा अनुभव आहे. आपला संघ आणि आपल्या खेळाडूंनी आत्ताच सर्व काही गमावले नसल्याची त्यांना जाणीव आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही दोन सामने जिंकले तर एटीकेला गाठू. त्यामुळे सारे काही संपलेले नाही. या स्पर्धेत तुम्ही पहिले आला की चौथे हे महत्त्वाचे नाही. पहिल्या चार संघांत येऊन उपांत्य फेरी गाठणे महत्त्वाचे असते. आम्ही त्यावरच लक्ष केंद्रीत केले आहे. एटीकेचा संघ चांगला आहे. त्यांचा धडाका रोखण्यासाठी आम्ही सर्वस्व पणास लावू. एफसी गोवा संघ स्थिरावल्यासारखा वाटत नाही. त्यामुळे झिको यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. यात गोलरक्षकाचा मुद्दा त्यांच्या प्राधान्ययादीत सुरवातीलाच असेल. लक्ष्मीकांत कट्टीमनी गेल्या मोसमाच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन सामन्यांत तितका प्रभावी ठरलेला नाही. शुभाशिष रॉय चौधरी तंदुरुस्तीसाठी झगडतो आहे. सुखदेव पाटील हा तिसरा गोलरक्षक आहे. खेळाडू घडविण्याचा कोटा म्हणून त्याला करारबद्ध करण्यात आले आहे. झिको त्याला खेळविणार का हे पाहावे लागेल. झिको यांनी सांगितले की, आम्हाला खेळावे लागणारे सर्व सामने खडतर असतील. परिस्थिती बदलण्याची क्षमता आम्हाला दाखवायलाच हवी. त्यातही एटीकेसारख्या भक्कम संघाविरुद्ध याची गरज असेल.]]>