विशाखापट्टनम: कसोटी मालिकेसोबतच एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघाला पराजित करीत तमाम क्रिकेट प्रेमींना दिवाळीची भेट दिली. भारतीय संघाने पाचव्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाला १९० धावांनी पराभूत करीत मालिका ३-२ अशी जिंकली. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने घेतलेल्या १८ धावांत ५ गड्यांच्या मोबदल्यात किवींचा संघ अवघ्या ७९ धावांत गारद झाला. भारताने दिलेल्या २७० धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्याच षटकात उमेश यादवने गप्तील करवी धक्का देत विजयाची सुरुवात केली. यादवने या मालिकेत ५ पैकी ३ वेळा गप्तीलला बाद करण्याची कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने लॅथमला बाद करीत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्यानंतर किविंसाठी अनुभवी असलेली टेलर व कर्णधार विल्यम्सन यांच्या जोडीने काही काळ जम धरला परंतु अक्षर पटेलने विल्यम्सनचा महत्वपूर्ण बळी मिळवत भारताच्या विजयाला मोठ योगदान दिलं. भारताचा अनुभवी गोलंदाज अमित मिश्राने आपल्या फिरकीच्या जोरावर न्यूझीलंडच्या मधल्या फळीला अक्षरश्या नाचवले. मिश्राने ६ षटकांत २ षटके निर्धाव टाकताना केवळ १८ धावांत किवींचा निम्मा संघ गारद केला. तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी या मालिकेत महत्वपूर्ण कामगिरी करण्यास अपयशी ठरली होती. भरवश्याचा फलंदाज रोहित शर्मा या मालिकेत काही विशेष करू शकला नाही. केवळ ५३ धावा करणाऱ्या रोहितने आज संयमी फलंदाजी करीत ६५ चेंडूत ७० धावा केल्या. विराट कोहली(६५) व कर्णधार महेंद्र सिंघ धोनी(४१) यांनी चांगली भागीदारी करीत भारताला २६९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अमित मिश्राच्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला तर संपूर्ण मालिकेत १५ बळी घेत मालीकाविराचाही पुरस्कार मिळवला. मालीकाविराच्या पुरस्कारासाठी मिश्राला विराट कोहलीची टक्कर होती. परंतु चांगली गोलंदाजी करणाऱ्या मिश्राने सरशी मारली.]]>