पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये संभाव्य विजेता अशी गणना होत असलेल्या बेंगळुरु एफसीने गुणतक्त्यात निर्विवाद आघाडी घेतली. एफसी पुणे सिटीविरुद्ध पूर्वार्धातील पिछाडीनंतर दुसऱ्या सत्रात अनुकुल परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवित बेंगळुरुने 3-1 असा महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. घरच्या मैदानावर एक खेळाडू कमी झाल्यानंतर पुण्याला तीन गोलांचा आणि पर्यायाने तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात व्हेनेझुएलाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मिकू याने दोन गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम टप्यात कर्णधार सुनील छेत्रीने भर घातली. 56व्या मिनिटास पुण्याच्या बलजीत सहानीला दुसऱ्या पिवळ्या कार्डचे लाल कार्डमध्ये रुपांतर झाल्यामुळे मैदान सोडावे लागले. सलग दुसऱ्या सामन्यात पुण्याला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. मागील सामन्यात पदार्पण करणाऱ्या जमशेदपूर एफसीविरुद्ध याचा फटका बसला नव्हता, पण यावेळी बेंगळुरूसारख्या कसलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पुण्याला फटका बसला. त्यामुळे पूर्वार्धातील आघाडी व्यर्थ ठरली. बेंगळुरूने पाच सामन्यांत चौथा विजय नोंदविला. त्यांचे सर्वाधिक 12 गुण झाले. पुण्याला सहा सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. नऊ गुणांसह पुण्याचे चौथे स्थान कायम राहिले, पण घरच्या मैदानावरील हा निकाल पुण्यासाठी निराशाजनक ठरला. पूर्वार्धात 35व्या मिनिटाला पुण्याच्या आदिल खानला मार्किंग नव्हते. इसाक वनमाल्साव्मा याने बॉक्समध्ये क्रॉस पास दिला. त्यावर आदिलने झेपावत हेडिंग केले. हा चेंडू अडविण्याची बेंगळुरुचा गोलरक्षक लालथुआमाविया राल्टे याला शक्य होते. त्याने झेप टाकून प्रयत्न केले, पण चेंडू त्याच्या हाताखालीून गेला. आदिल हा भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. गोव्यातील सेसा अॅकॅडमीत त्याने फुटबॉलचा श्रीगणेशा केला. पुर्वार्धात पुण्याचा खेळ सरस झाला होता. उत्तरार्धात बेंगळुरूने खेळ उंचावला. 51व्या मिनिटाला सुनील छेत्रीचा प्रयत्न थोडक्यात हुकला. 56व्या मिनिटाला बलजीतने ब्राऊलिओ नॉब्रेगाला पाडले. दुसऱ्या पिवळ्या कार्डसह त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर बेंगळुरने पुरेपूर फायदा उठविला. 64व्या मिनिटाला डाव्या बाजूला एदू गार्सियाने सुनील छेत्रीला पास दिला व तो बाजूला धावला. छेत्रीने धुर्तपणे गार्सियाकडे पुन्हा चेंडू सोपविला. गार्सियाने मिकूच्या दिशेने चेंडू मारला. दक्ष मिकूने प्रतिस्पर्ध्यांना चकवित चेंडू नेटमध्ये मारला. मिकूनेच दुसरा गोल केला. उदांता सिंगने उजव्या बाजूने चाल रचली. त्याने गार्सियाला पास दिला. त्याने डावीकडील मिकूच्या दिशेने चेंडू मारला. मिकूने मारलेला चेंडू रॅफेल लोपेझने अडविला. त्यावेळी त्याने हाताने चेंडू अडविल्याचा आक्षेप घेण्यात आला. मिकूने मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. त्याने छातीने चेंडू नियंत्रीत केला आणि डाव्या पायने अचूक फटका मारत पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथला दुसऱ्यांदा चकविले. बेंगळुरने आघाडीनंतरही आक्रमक खेळ कायम ठेवला. अथक प्रयत्न करणारा कर्णधार छेत्री याने डाव्या बाजूने चाली रचल्या. अखेरच्या मिनिटाला टोनी डॉवल याच्या साथीत त्याने चाल रचली. बॉक्समध्ये प्रवेश करीत त्याने चेंडूवर ताबा मिळविला. पुण्याचा बचावपटू गुरतेज सिंगला हुलकावणी देत त्याने अफलातून गोल केला. निकाल एफसी पुणे सिटी: 1 (आदिल खान 35) पराभूत विरुद्ध बेंगळुरु एफसी: 3 (मिकू 64, 78, सुनील छेत्री 90)]]>