दिल्ली, दिनांक 9 नोव्हेंबर 2016: कर्णधार फ्लोरेंट मलुडा याच्या जबरदस्त खेळाच्या बळावर दिल्ली डायनॅमोजने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर 4-1 असा दणदणीत विजय मिळविला. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी पूर्ण तीन गुण मिळवून यजमानांनी गुणतक्यात अव्वल क्रमांकही मिळविला. मलुडा याने दोन गोल नोंदविले आणि दोन “असिस्ट’मुळे तोच “सामनावीर’ ठरला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चेन्नई येथेही दिल्लीने चेन्नईयीनवर 3-1 असा विजय मिळविला होता. आज त्यांनी यंदाच्या स्पर्धेतील चौथा विजय मिळविला. दिल्लीचे नऊ सामन्यांतून 16 गुण झाले आहेत. त्यांनी प्रथम क्रमांक मिळविताना मुंबई सिटी एफसीवर एका गुणाची आघाडी घेतली आहे. चेन्नईयीनचा हा दुसरा पराभव असून आठ सामन्यानंतर दहा गुण कायम राहिले आहेत. ते सहाव्या क्रमांकावर आहेत. सामना रंगतदार ठरला, दिल्लीने खेळावर अधिकांश वर्चस्व राखले. त्यांचा कर्णधार फ्रान्सच्या फ्लोरेंट मलुडा याचा खेळ प्रेक्षणीय ठरला. दिल्लीच्या चारही गोलात त्याचा मोलाचा वाटा राहिला. घानाच्या रिचर्ड गादझे याने 15व्या मिनिटास दिल्लीला आघाडीवर नेले, नंतर मलुडा याने 25व्या मिनिटास आघाडी फुगविली. बर्नार्ड मेंडी याने 37व्या मिनिटाला चेन्नईयीनची पिछाडी एका गोलने कमी केली. विश्रांतीनंतर दोन्ही संघ मैदानात उतरल्यानंतर 54व्या मिनिटास केन लुईस याने दिल्लीच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली. आज लुईस व गादझे यांनी यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा गोल नोंदविला. मलुडा याने सामन्यातील आपला दुसरा गोल 85व्या मिनिटास नोंदविला. सामन्याच्या विश्रांतीला दिल्लीने 2-1 अशी आघाडी घेतली होती. घानाच्या रिचर्ड गादझे याने दिल्लीला 15व्या मिनिटास आघाडीवर नेले. फ्लोरेंट मलुडा याने मध्यक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. नंतर चेंडू घेऊ गोलरिंगणात दाखल झाला, त्याने मारलेला फटका गोलरक्षक करणजितने अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही. या चुकीचा लाभ उठवत गादझे याने रिबाऊंडवर झटक्यात चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. नंतर दहा मिनिटांनी मलुडा याने स्वतः गोल केला. त्याचा हा यंदाच्या आयएसएलमधील पहिलाच गोल ठरला. रिचर्ड गादझे याच्या पासवर मलुडाने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर चेंडूला अचूक दिशा दाखविली. यावेळी गोलरक्षक पूर्णपणे हतबल ठरला. विश्रांतीला आठ मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनने अखेर पिछाडी एका गोलने कमी केली. राफाएल आगुस्तो याच्या पासवर “फ्रेंचमन’ बर्नार्ड मेंडी याने दिल्लीचा गोलरक्षक अंतोनिओ डोब्लास याचा बचाव भेदला. दिल्लीच्या तिसऱ्या गोलमध्ये मलुडा याची कल्पकता प्रशंसनीय ठरली. डाव्या बगलेत मलुडा याने चेंडू नियंत्रित केला. त्याने प्रतिस्पर्धी बचावपटूस गुंगारा देत पुढे धावत आलेल्या लुईसकडे चेंडू पास केला. लुईसने कमी उंचावरून मारलेल्या फटक्याचा गोलरक्षक करणजितला अंदाजच आला नाही. या गोलनंतर लगेच तीन मिनिटांनी गादझे याने दिल्लीच्या खाती चौथ्या गोलची भर टाकण्याची नामी संधी दवडली. डाव्या बगलेत मार्सेलो लैते परेरा याने जागा मिळवत चेंडू नियंत्रित केला. त्याने गोलरिंगणात मोकळा असलेल्या गादझे याला क्रॉस पासद्वारे चेंडू पुरविला, मात्र घानाचा हा खेळाडू निर्णायक क्षणी गडबडला. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना मलुडा याने दिल्लीची आघाडी 4-1 अशी भक्कम केली. बदारा बादजी याच्या “असिस्ट’वर माजी फ्रेंच आंतरराष्ट्रीय खेळाडूने चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजितला चकविले. मार्सेलो लैते परेरा याच्या कॉर्नर किकवर बादजी याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने चेंडू हेड केला. यावेळी गोलपोस्टच्या डाव्या बाजूने तयारीत असलेल्या मलुडा याने अचूक नेम साधत दिल्लीच्या खाती चौथ्या गोलची भर टाकली. त्यापूर्वी 77व्या मिनिटाला मिलन सिंगने उजव्या बगलेतून दिलेल्या क्रॉसपासवर दिल्लीच्या मार्सेलो लैते परेरा याला अचूक हेडर साधता आला नव्हता.]]>