अटीतटीच्या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्सला ७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांचा यंदाच्या मोसमातील एकूण चौथ्या पराभवासह सलग दुसरा पराभव झाला. तर पंजाबने स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवत स्पर्धा रंगात आणली आहे. पंजाबचा ‘पावरप्ले’ स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणे आवश्यक असलेल्या किंग्स XI पंजाबने आज मार्टिन गप्टिलच्या जोडीला वृद्धिमान सहाला सलामीला धाडले आणि कोणताही दबाव न घेता दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच चेंडूपासून आक्रमकता दाखवली. हार्दिक पांड्याकरवी गोलंदाजीची सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हा निर्णय चुकीचा असावा असेच म्हणावे लागेल. पहिल्याच षटकात तीन चौकार चौकार लगावत पंजाबने त्यांचा हेतू स्पष्ट केला. पावरप्लेमध्ये नेहमीच महागडा ठरणार मिचेल मॅकक्लेनघनला पुढच्याच षटकात १६ धावा ठोकत पंजाबने इरादे सिद्ध करण्यास सुरुवात केली. बुमराने तिसरे षटक काहीसे सफल टाकले खरे परंतु चौथ्या षटकात पाचारण केलेल्या लसिथ मलिंगाला १९ धावा कुटत मुंबईच्या गोलंदाजांचा पुरता बाजा वाजवला. केवळ १९ मिनिटांत धावफलकावर ५० धावा लगावत पंजाबने चांगली सलामी दिली. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात फिरकी कर्ण शर्माला पाचारण केले आणि त्याने गप्टिलला (३६ धा. १८ चें. ५ चौ. १ ष.) बाद करीत मुंबईला काहीसा दिलासा दिला. परंतु पावरप्ले अखेरीस पंजाबने जवळजवळ १२ च्या सरासरीने ७१ धावा कुटल्या. वानखेडेवर ‘वृद्धि’ शो सलामीस बढती मिळालेल्या वृद्धिमान सहाने संधीचा पुरेपूर फायदा घेत पंजाबला केवळ चांगली सुरुवातच न देता शेवटपर्यंत किल्ला लढविला. गप्टिल बाद झाल्यानंतर कर्णधार ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावर आला आणि आपल्या खास शैलीत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तर एकीकडे सहाही तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा पेश करत कव्हर ड्राइव्ह, पूल शॉट अगदी सहजतेने मारत होता. भारतीय संघात केवळ कसोटी संघात स्थान असलेल्या सहाने आज एक वेगळीच शैली पेश केली. ११ व्या षटकात मॅक्सवेल (४७ धा. २१ चें. ५ ष.) बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात सहाने हरभजनला मिड-विकेटला षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६२ मिनिटे खेळपट्टीवर उभे राहत ३१ चेंडूंत पन्नाशी गाठली. बुमरा व्यतिरिक्त एकही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना धावांवर अंकुश घालण्यात यश आलं नाही. बुमराने केवळ सहाच्या सरासरीने २४ धावा खर्च करीत १ गडी टिपला तर बाकीच्या पाचही गोलंदाजांना दहाहून अधिक सरासरीने धावा कुटल्या. मुंबईतर्फे बुमराच्या साथीला कर्ण शर्मा व मिचेल मॅकक्लेनघनला एक-एक गडी टिपता आला. पंजाबने साडे काराच्या सरासरीने तीन गडी गमावत २३० धावा केल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्यांचा हा उच्चांक आहे तर यंदाच्या मोसमातही हा उच्चांक ठरला. सिमन्सचा धमाका जर ३१ मार्च, २०१६ तारीख कोणाला आठवत असेल तर पहिला चेहरा समोर येतो तो लेंडी सिमन्स. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान भारताचे १९० हुन अधिक धावांचे आव्हान अगदी सहजरित्या पेलणाऱ्या वेस्ट इंडिजला ‘मॅच विनिंग’ खेळी करून देणाऱ्या सिमन्सने आजही तश्याच परीचे उदाहरण पेश केले. २३१ धावांचे आव्हान पार करण्यास उतरलेल्या पार्थिव पटेल-सिमन्स जोडीने पंजाबप्रमाणे आक्रमक सुरुवात करत पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या. सहाव्या षटकात सिमन्सने मोहित शर्माला दोन खणखणीत षटकार खेचत पावरप्ले पर्यंत मुंबईची धावसंख्या बिनबाद ६८ अशी आणली. सातव्या षटकात अक्षर पटेलच्या रूपात पहिला स्पिनर्स पंजाबने आणला परंतु खेळपट्टीवर टॅग धरून बसलेल्या सिमन्सने त्याचेही स्वागत दोन षटकार खेचत केले. आठव्या षटकात आणखी एक प्रयोग करीत खुद्द मॅक्सवेलने चेंडू आपल्या हाती घेत केवळ पाच धावा खर्च केल्या आणि मुंबईच्या धावगतीवर ब्रेक लावण्यास सुरुवात केली. दरम्यान नवव्या षटकात मोहित शर्माला सलग चौथा चौकार मारण्याच्या नादात पार्थिव पटेल ३८ धावांवर बाद झाला. त्याने २३ चेंडूंचा सामना करत ७ चौकार खेचले. पुढच्याच षटकात मॅक्सवेलला षटकार मारण्याचा नादात लॉन्ग-ऑनला मार्टिन गप्टिलने सिमन्सचा अप्रतिम झेल पकडत मुंबईला दुसरा धक्का दिला. सिमन्सने ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचत ५९ धावा केल्या. पोलार्डची अपयशी झुंज दहाव्या षटकात सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या ओव्हर्समध्ये मुंबईच्या खेळाडूंना धावा करण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागला. रोहित शर्मा (५ धा. ७ चें.) व नितीश राणा (१२ धा. १२ चें.) हे भरवशाचे स्वस्तात परतल्यानंतर पोलार्डने सूत्रे आपल्या हाती घेतली. पोलार्डने तेवटियाला १४ व्या षटकात दोन षटकार लगावत पाठलाग करण्यास आपण सज्ज आहोत असे स्पष्ट केले. पांड्याच्या साथीने पोलार्डने पाचव्या गड्यासाठी २१ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी रचली. यात सोळाव्या षटकातील हेन्रीच्या एकाच षटकांत खेचलेल्या ४ चौकरांचा मोठा हातभार लागला. पोलार्डला शेवटपर्यंत हवी तशी साथ न लाभल्यामुळे अशक्य असा पाठलाग पूर्ण करण्यास मुंबई केवळ ७ धावांनी मागे पडली आणि पंजाबचा यंदाच्या मोसमातील आव्हान काही अंशी टिकून राहिले. त्यांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता आणि त्यांनी अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अव्वल मुंबई इंडियन्सला पराभवाची चव चाखवली. संक्षिप्त धावफलक किंग्स XI पंजाब २३०/३(२०) – सहा ९३*(५५), मॅक्सवेल ४७(२१) । बुमरा १-२४(४), कर्ण शर्मा १-३२(३) मुंबई इंडियन्स २२३/६(२०) – सिमन्स ५९(३२), पोलार्ड ५०(२४) । मोहित शर्मा २-५७(४), मॅक्सवेल १-८(२) किंग्स XI पंजाब ७ धावांनी विजयी]]>